प्रस्तावना खंड  

   

सूची खंड  

   
Banners
   

प्रस्तावनाखंड : विभाग तिसरा. बुद्धपूर्वजग (उत्तर भाग)

प्रकरण ७ वें.
मूलगृहकालीन उर्फ इंडोयूरोपीय संस्कृति

आतांपर्यंत आपण वेदकालीन व वेदोत्तरकालीन संस्कृतीचें पर्यालोचन केलें. परंतु आपणास त्याबरोबरच अशी जिज्ञासा होणें साहजिक आहे कीं, वेदकालीन किंवा तदुत्तर निरनिराळ्या संस्कृती या कोणत्या तरी प्राचीन अवि कसित संस्कृतीच्या परिणतावस्था असल्या पाहिजेत. तर या अपरिस्फूट अवस्थेंतील पण मोठ्या संस्कृतीच्या जनक संस्कृती कोणत्या होत्या? त्या कोणकोणत्या प्रदेशांत विकसत होत होत्या व त्यांच्या विकासाच्या पायऱ्या आपणांस सांपडणें शक्य आहे किंवा नाहीं? वेदपूर्व काल हा पूर्णपणे अज्ञानमय असणें शक्य नाहीं. तेव्हां आपणांस त्या अज्ञात अशा वेदपूर्व युगांतील मानवजातीची प्रगति कसकशी होत गेली हें जाणणें बरेंच बोधपर व मनोरंजक होईल. वेदपूर्व कालीन मानवी संस्कृतीचे ज्ञान देणारी प्रत्यक्ष प्रमाणें सांपडणें बरेंच कठिण आहे. तत्कालीन संस्कृतीचें ज्ञान आपणांस बहुतेक अनुमानानेंच करून घेतलें पाहिजे. अशा तऱ्हेचीं अनुमानें आजपर्यंत निरनिराळ्या साधनांवरून अनेकांनी केलेलीं आहेत. मानवोत्पत्ति प्रथम कोठें झाली असावी व निरनिराळें मानववंश कोठें व कसें विकसित होऊन त्यांचें परिभ्रमणमार्ग कोणते असावे याविषयीची निरनिराळीं मतें व अनुमानें पूर्वी दुसऱ्या प्रकरणांत दिलींच आहेत. मानवी प्रगतीचे जे पूर्वपाषाणयुग, नवपाषाणयुग, इत्यादि कालकंड पाडिले आहेत तेहि पूर्वी दिलेच आहेत. त्यांत आपणांस काकेशियन व त्यांतल्या त्यांत आर्यन् वंश हाच पुढें विशेष प्रगत झाला ही गोष्ट स्पष्ट झालीच आहे. या आर्यन् वंशाच्या संस्कृतीची जन्मभूमि कोणती, तिचें स्थलांतर कसकसें झाले वगैरें गोष्टींचें ज्ञान आपणांस करून घेतलें पाहिजे. या विषयांवर निरनिराळ्या पंडितांनीं परिश्रम करून आपल्या संशोधनाचे निष्कर्ष जगापुढें मांडले आहेत. जगांत आज आर्यन्वंशेद्भव निरनिराळीं राष्ट्रें आहेत त्यांत आर्यन् मूलसंस्कृतिबोधक अवशेष कोणते आहेत याचाहि भाषाशास्त्रादि शास्त्रांच्या मदतीनें अभ्यास झाला आहे. त्यांचा निष्कर्ष पुढें थोडक्यांत मांडला आहे.

या वेदपूर्वकालीन संस्कृतीचे मुख्य दोन कालविभाग पडतात. पहिला कालविभाग ज्या वेळीं सर्व आर्यन् वंशाचे लोक एकत्र राहात होते तो काल. यास इंडोयूरोपीय अथवा इंडोजर्मानिक किंवा मूलगृहकाल म्हणतात. यानंतर या मुख्य वंशाच्या शाखा निरनिराळ्या दिशांस पसरल्या. त्यांपैकीं  ज्या पश्चिमेस गेल्या त्यांनी अनेक संस्कृति व टयूटन वगैरे संस्कृतींस जन्म दिला. जी शाखा पूर्वेकडे आली ती बरेच दिवस इराणांत राहून तेथें एका संस्कृतीचा विकास झाला. या कालास पर्शुभारतीय काल व संस्कृतीस पर्शुभारतीय कृति म्हणतात. यानंतर वेदभाषी आर्य लोकांच्या पूर्वजांची एक शाखा भरतखंडांत येऊन तिनें भारतीय संस्कृतीचा ऱ्हास केला.

आतां आपण प्रथम जी मूलगृहकालीन इंडोयूरोपीय संस्कृति तिजकडे वळूं.

   

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान निर्मित महत्वपूर्ण संकेतस्थळे  

   

पुजासॉफ्ट, मुंबई द्वारा निर्मित
कॉपीराइट © २०१२ --- यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई - सर्व हक्क सुरक्षित .