प्रस्तावना खंड  

   

सूची खंड  

   
Banners
   

प्रस्तावनाखंड : विभाग तिसरा. बुद्धपूर्वजग (उत्तर भाग)

प्रकरण ८ वें
पर्शुभारतीय संस्कृति.

मागील प्रकरणांत इंडोयूरोपीय ऊर्फ मूलगृहकालीन संस्कृतीबद्दल विवेचन केले आहे. आर्यन् लोक ज्याठिकाणी एकत्र रहात होते त्या ठिकाणची व तत्कालीन संस्कृति कशी काय होती हें त्यावरून बरेंचसे अवगमितां येण्यासारखे आहे. कांही काळानें आर्यन लोकांच्या निरनिराळ्या शाखा निरनिराळ्या प्रदेशांत परिभ्रमण करीत गेल्या. त्यांपैकी एक शाखा कांही काळ सध्यां इराणच्या प्रदेशांत स्थायिक होऊन राहिली होती व या लोकांपैकीच कांही लोक परिभ्रमणवृत्ति आचरीत पूर्वेकडे पुढे येऊन आर्यावर्तीत वसाहत करून राहिले. हे जे आर्यावर्तीत वसाहत करून स्थायिक झालेले लोक त्यांतच आपले वेदभाषी पूर्वज होते. ते आर्यावर्तात येण्यापूर्वी कांही आर्यन्पूर्वी इकडे आले होतेच त्यांच्याशीं या वेदभाषी आर्य लोकांनी युद्धे करून त्यांस पंजाबांतूनच पूर्वेकडे हांकून लाविले, आपण सरस्वतीतांरी  यज्ञयाग करून राहूं लागले व वेदांची रचना करून व यज्ञयागादिकांनी त्यांनी आपल्या संस्कृतीचा प्रसार भरतखंडात केला. पण ज्यावेळी आजच्या इराण्याचे पूर्वज कोणत्यातरी प्रदेशांत कांही काळ वेदभाषी लोकांच्या पूर्वजांसह राहिले होते तेथेहि एका विशिष्ट संस्कृतीचे संवर्धन झालें होतें. ज्या संस्कृतीस पर्शुभारतीय (इंडोइरानियन) संस्कृति व त्या काळास पर्शुभारतीय काळ असे म्हणतात.

या संस्कृतीचे ज्ञान आपणांस पारशी धर्मग्रंथ झेंद अवेस्ता याची वेदांशीं तुलना केली असतां मिळते. आजचे पारशी हे तत्कालीन इराणांत स्थायिक झालेल्या पर्शूचे वंशज होत. त्यांची एक टोळी सुदासास साहाय्य करण्याकरितां त्याबरोबर पृथूंसहित भरतखंडांत आली होतीच. पारशी लोकांच्या धर्मग्रंथांची भाषा वैदिक भाषेशी अगदी निकटची दिसते. त्याप्रमाणेंच त्यांच्या यज्ञयागादि धर्मविधींतहि बरेंच साम्य आहे. सोमाचें हवन करणें हा धर्म दोघांतहि आढळतो. यामुळे वैदिक लोकांचे व पारशी लोकांचे पूर्वज एका काळीं एका ठिकाणी रहात असावे व एकाच संस्कृतीचे असावे याबद्दल शंका रहात नाही.

या संस्कृतीसंबंधी आनुमानिक माहिती आजपर्यंत बरीच उपलब्ध झालेली आहे. या अनुमानांचे मुख्य साधन म्हणजे त्यांच्या भाषेतील शब्द हे होत. तेव्हां त्यांच्या भाषेंतील संस्कृत भाषेशी जुळणारे जे शब्द आहेत त्यांची संस्कृत सद्दश शब्द व मराठी अर्थ यांसह यादी पुढें दिली आहे तीवरून त्याच्या संस्कृतीची बरीचशी कल्पना येईल.

याखेरीज कांही संशोधकांच्या संशोधनाचें फलहि पुढें दिले आहे.

   

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान निर्मित महत्वपूर्ण संकेतस्थळे  

   

पुजासॉफ्ट, मुंबई द्वारा निर्मित
कॉपीराइट © २०१२ --- यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई - सर्व हक्क सुरक्षित .