प्रस्तावनाखंड : विभाग तिसरा. बुद्धपूर्वजग (उत्तर भाग)

प्रकरण ९वें
आर्य-असुर-संबंध.

बाहेरच्या जगाशीं भारतीयांचा संबंध एकवंशमूलक जो आहे त्याचें विवेचन येथवर झालें. तथापि जे मनुष्यसमूह निराळ्या वंशांतील होते त्यांशी प्राचीन वेदभाषी लोकांचा कांहीं संबंध होता कीं काय हें आतां पाहिलें पाहिजे. असुरांचा उल्लेख वेदांत फार येतो. तर असुरांशीं व खाल्डियन लोकांशीं काय संबंध येतो याची स्थूल कल्पना देण्यासाठीं दोन लेखकांच्या लेखांचे गोषवारे येथें देतों.

भारतीय संस्कृतीचा इतिहास लिहितांना वैदिक आणि इराणी शब्दांची आणि त्याप्रमाणेंच इतर आर्यन् राष्ट्रांच्या शब्दांची तुलना करणें हें महत्त्वाचें साहित्य होय. कां कीं, या पद्धतीनें जुनें कोणतें आणि किती या विषयावर बराच खोल शोध केला असें होईल. तथापि आपलें तौलनिक अभ्यासाचें क्षेत्र सदृशतुलनेइतकें आकुंचित करून उपयोगी नाहीं. सदृश आणि विसदृश् संस्कृतीची आणि भाषांची तुलना कधीं कधीं अनंत इतिहासदायक असते. दोन भिन्न संस्कृतींतील सामान्य अंगे दळणवळण सुचवितात आणि परस्पर देवघेवीसंबंधी विचार संशोधनास स्फूर्ति देतात.
आर्यन् राष्ट्रें हिंदुस्थानांत आलीं त्याअगोदर त्यांची परिभ्रमणें निश्चित नाहींत. या परिभ्रमणांचा पत्ता वैदिक संस्कृतींतील पितृमूलक आणि परकीय अंगे यांचे पृथक्करण केलें असतां लागण्यास सोपें जाईल. या दृष्टीनें अभ्यासास नुकतीच सुरुवात झाली आहे. एशियाटिक टर्की म्हणून समजल्या जाणाऱ्या प्रदेशाचा आणि आर्यन् राष्ट्राचा कांहीं सबंध होता काय हा प्रश्न महत्त्वाचा आहे. या विषयावर विचार इतके नुकतेच सुरू झालेले आहेत कीं, त्यांची संगति लावण्यांत आज अर्थ नाहीं. या प्रकारच्या संशोधनाचें स्वरूप लक्षांत यावें म्हणून यासंबंधीं दोन लेख येथें देतों.