प्रस्तावना खंड  

   

सूची खंड  

   
Banners
   

प्रस्तावनाखंड : विभाग तिसरा. बुद्धपूर्वजग (उत्तर भाग)

प्रकरण ९वें
आर्य-असुर-संबंध.

खाल्डियन व भारतीय संस्कृतींच्या समकालीनत्वाबद्दल पुरावा.-'ओरायन किंवा वेदांचें प्राचीनत्व' या ग्रंथांत वैदिक संस्कृति निदान इ. स. पू. ४५०० च्या सुमाराची म्हणजे ज्या वेळीं वसंतसंपात मृग नक्षत्रांत होता त्या वेळची असली पाहिजे असें दाखविलें आहे. यावरून वैदिक व खाल्डियन संस्कृतीचें लोक समकालीन असल्याचें ठरतें. आणि ख्रि. पू. ४ थ्या किंवा ५ व्या सहस्त्रकांतील या दोन संस्कृतींच्या लोकांत दळणवळण चालू होतें ही गोष्ट सिद्ध करण्याकरितां त्या दोन लोकसमाजांतील वेदांत आलेले शब्द व कल्पना यांमधील साम्य दर्शविणारीं उदाहरणें खालीं दिलीं आहेत.

बाबिलोनियामधील कपड्यांची एक प्राचीन यादी सांपडली आहे. तींत सिंधु असें नांव आहे. सिंधु म्हणजे विणलेलें कापड. असा शब्द योजण्याचें कारण असें कीं, सिंधु नदीच्या कांठच्या प्रदेशांतून या जातीचें कापड खाल्डियामध्यें जात होतें. (कालिकत शहरांतील कपड्याला कॅलिको म्हणतात त्याप्रमाणें हा शब्द आहे.) जादूचे व सर्पादिकांचे मंत्र खाल्डियन वेदांतून अथर्ववेदांत घेतल्यासारखे दिसतात. सर्पाच्या मंत्रांसंबंधीं पुढील ॠचा पहा:-

असितस्य तैमातस्य बभ्रोरपोदकस्य च।
सात्रासाहस्याहं मन्योरव ज्यामिव धन्वनो वि मुञ्चामि रथाँ इव॥६॥
आलिगी च विलिगी च पिता च माता च॥
विद्म व: सर्वतो बन्ध्वरसा: किं करिष्यथ ॥७॥
उरुगूलाया दुहिता जाता दास्यसिक्न्या ॥
प्रतंकं दद्रुषीणां सर्वासामरसं विषम् ॥८॥
ताबुवं न ताबुवं न घे त्त्वमसि ताबुवम्
ताबुवेनारसं विषम् ॥१०॥
        अथर्व ५.१३; ॠचा ६ ते ८ व १०

तैमात. - तियामत, उरुगूल, आलिगी विलिगी, ताबुव वगैरे सर्पांची व देवांचीं नांवें परकीय म्हणजे खाल्डियन असून तिकडून अथर्ववेदांत घेतलेलीं दिसतात.

बायबलमधील जेहोवह् व खाल्डियन यव्हे हे शब्द भारतीय वेदांतील यहु, यव्हे वगैरे शब्दांवरून घेतलेले आहे. खाल्डियन शब्द अप्सु किंवा अब्झु हा वेदांतील अप्सु. जित्, अप्सुमत्, अप्सु-क्षित् या शब्दांतून घेतलेला दिसतो. वेदांतील अप्सु हें रूप अप्=पाणी यांचें सप्तमीचें अनेकवचन मानतात; परंतु ती चूक असून अप्सु=जलमय पोकळी असाच मूळ शब्द आहे. एका खाल्डियन काव्यामध्यें अप्सु व तियामत हीं पतिपत्नी असून वृत्राप्रमाणें असुर किंवा सर्प जातीचीं आहेत व त्यांनां खाल्डियन इंद्र मार्दुक यानें मारलें असें वर्णन आहे.

उरू-क्रम, उरु-गाय, उरु-क्षय यांतील उरु=पाताळ हा शब्द मूळ खाल्डियन भाषेंतून घेतलेला आहे. तसेंच उर्वशी म्हणजे उरू-अशी म्हणजे पाताळ-देवता किंवा जल देवता=अप्सरा असा खाल्डियन 'उरू' पासून बनलेला शब्द आहे.

इतु=महिना हा खाल्डियन शब्द ॠतु या वैदिक शब्दावरून घेतलेला दिसतो. या वरील एकंदर उदाहरणावरून कित्येक शब्द भारतीय व खाल्डियन लोकांनीं परस्परांपासून घेतलेले आहेत असें ठरतें.

आतापर्यंत शब्दांच्या देवघेवीचीं उदाहरणें दिलीं. आतां खाल्डियन ग्रंथ व वेद यांतील कथांत काय साम्य आढळतें याचा विचार करावयाचा. हें साम्य विश्वाचें मूळ जलमय स्वरूप व त्याचें ठिकाण व त्यांत उत्पन्न झालेली गति, इंद्र किंवा मार्दुक व या प्रकाशदेवतांनीं त्यावर मिळविलेला विजय तसेंच विश्वरचनेसंबंधी दोन्ही राष्ट्रांतील कल्पना, वगैरे बाबींसंबंधाच्या कथांत आढळते. बाबिलोनियन ग्रंथांत संस्कृत पुराणांतल्याप्रमाणेंच पृथ्वीवर एकंदर सात खंड असल्याचें वर्णन आहे. खाल्डियन पौराणिक ग्रंथांतहि सप्तस्वर्ग व सप्तपाताळ या कल्पना आहेत; इतकेंच नव्हे तर, मार्दुकनें ज्या तिआमत नामक सर्पाला मारिलें त्याला सात शिरें होतीं असें वर्णन आहे. इकडे वेदामध्येंहि इंद्राला सप्तहन् सातांनां मारणारा असें म्हटलें आहे. आणि ज्या बंद असलेल्या जलनिधीचे दरवाजे इंद्र व अग्नि यांनीं आपल्या पराक्रमांनीं उघडून मोकळे केले तो जलनिधि सप्त-बुध्न (साततळ असलेला) असल्याचें वर्णन आहे. शिवाय खाल्डियन वाङ्मयांत हिवाळ्यांतल्या सर्व रात्रमय अधिकमासाचा व सूर्याला एक प्रकारचा त्वचारोग होत असल्याचा किंवा वर्षांतील कांहीं भाग सूर्य अजीबाद नाहींसा होत असल्याचा उल्लेख आढळतो व त्यावरून भारतीयांबरोबर खाल्डियन लोकहिं एके काळीं उत्तरध्रुवाजवळ एकत्र राहात होते, या सिद्धांताला पुष्टि मिळते.

याप्रमाणें खाल्डियन व भारतीय वेदांचा तुलनात्मक अभ्यास केल्यास अनेक उपयुक्त माहिती मिळून परस्परांच्या संबधाविषयींचे प्रचलित सिद्धान्त बरेच बदलावे लागणार आहेत. वर दिलेल्या थोडक्या उदाहरणावरूनहि इहेरिंगचें एकतर्फी विधान चुकीचें ठरत आहे. दोन समान दर्जाच्या संस्कृतींचे लोक समकालीन असल्याचें ठरल्यावर एका संस्कृतीच्या लोकांनी सर्वस्वी दुसऱ्या संस्कृतीच्या लोकांपासून सर्व गोष्टी उचलल्या असें म्हणण्यापेक्षां परस्परांनीं परस्परांबरोबर देवघेव केली असली पाहिजे, असें मानणेंच अधिक सयुक्तिक होय (भांडाकर मेमोरियल व्हाल्यूममधील लो. टिळकांचा लेख).

   

पुजासॉफ्ट, मुंबई द्वारा निर्मित
कॉपीराइट © २०१२ --- यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई - सर्व हक्क सुरक्षित .