प्रस्तावना खंड  

   

सूची खंड  

   
Banners
   

प्रस्तावनाखंड : विभाग चवथा - बुद्धोत्तर जग

प्रकरण १ लें.
चोविसशें वर्षांतील जगद्विकास

साधनसामुग्री, व्याप्ति व लेखनहेतु - बुद्धानंतरचा जगाचा इतिहास लिहावयास प्रारंभ करणें म्हणजे अधिक परिचित विषयाकडे वळणें होय. या कालाचा थोडक्यांत इतिहास देणें ही क्रिया करणारास माहिती तुटपुंजी आहे ही सबब आणतां येणार नाहीं. हें काम कठिण असल्यास तें इतकी प्रचंड माहिती थोडक्या जागेंत कशी आणावी हाच प्रश्न आपल्या पुढें येणार यामुळें आहे. सर्व जगाच्या प्रचंड माहितीचें अवलोकन करून तिचा गोषवारा थोडक्यांत कसा द्यावा हाच प्रश्न आपण सोडविला पाहिजे. केवळ निवेदनात्मक इतिहासच नव्हे तर, जे इतिहास समाजशास्त्रीय किंवा विकासवादात्मक नियमांनीं सांगतां येतील असे अनेक इतिहास या क्षेत्रांत मोडतात. ग्रीस रोमसारख्या प्राचीन यूरोपीय राष्ट्रांचा इतिहास, तसाच आजच्या यूरोपांतील राष्ट्रांचा सर्व इतिहास, तसाच बौद्ध, मुसुलमानी व ख्रिस्ती संप्रदायांचा इतिहास याच कालांत मोडतो. जगांत चोहोंकडे लहान लहान राष्ट्रें पसरलीं आहेत अशा कालापासून राष्ट्रसंघानें जग एकसूत्रित झालें आहे अशा कालापर्यंत सर्व घडामोडी, पारमार्थिक संप्रदायांनीं राष्ट्रांचें स्वातंत्र्य हिरवण्याचा प्रयत्‍न, त्या प्रयत्‍नापासून झालेली राष्ट्रांचीं सुटका, नवीन जगाचा म्हणजे पश्चिम गोलार्धाचा शोध आणि जगांतील बर्‍याचशा भागावर यूरोपीय राष्ट्रांचें स्थापन झालेलें स्वामित्व या गोष्टी, या कालांतच येतात जगांतील कांहीं प्राचीन भाषंचा उदय, विकास व विनाश हा या इतिहासाचा भाग आहे. प्राचीन भाषांचा विनाश झाल्यानंतर अर्वाचीन भाषांचा उद्‍भव आणि विकास हाहि या कालांतला महत्त्वाचा विषय आहे. अशा सर्व विविध गोष्टी आपल्यापुढें असतां त्यातील अधिक महत्त्वाच्या गोष्टी कोणत्या हें पाहून अनेक शतकें आणि अनेक विस्तृत भूभाग यांवर होणार्‍या घडामोडी पाहून त्यांमधून कांहीं इतिहासविकासाचे सामान्य नियम निघत असतील तर ते शोधून त्या नियमांनुसार जगाचा इतिहास लिहिण्याचें कार्य येथें करावयाचें आहे.

   

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान निर्मित महत्वपूर्ण संकेतस्थळे  

   

पुजासॉफ्ट, मुंबई द्वारा निर्मित
कॉपीराइट © २०१२ --- यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई - सर्व हक्क सुरक्षित .