प्रस्तावना खंड  

   

सूची खंड  

   
Banners
   

प्रस्तावनाखंड : विभाग चवथा - बुद्धोत्तर जग

प्रकरण ३ रें.
इराणचें सत्तावर्धन

पूर्व व पश्चिम यांमधील बौद्धिक देवघेव - बुद्धाचा काल ज्या एका कारणामुळें महत्त्वाचा आहे तें कारण म्हटलें म्हणजे या काळापासून पुढें ऐतिहासिक माहितीची अधिक विपुलता आहे हें होय. बुद्धपूर्व कालामध्यें निरनिराळ्या देशांच्या इतिहाससंगतीसाठीं जितकें कल्पनेवर जावें लागतें तितकें बुद्धोत्तर कालामध्यें जावें लागत नाहीं. बुद्धाच्या अगोदर १०० वर्षांपासून ख्रिस्तापर्यंतचा काल म्हटला म्हणजे निरनिराळ्या राष्ट्रांच्या संपर्काचा काल होय. या कालाचा इतिहास लिहितांना वैदिक कालापेक्षां आपण अधिक परिचयाच्या क्षेत्रांत आहों असें वाटतें. या कालांत निरनिरा़ळ्या राष्ट्रांचा संबंध आल्यामुळें एखाद्या राष्ट्राविषयीं देश्य माहिती जर कमी पडली तर ती दुसर्‍या राष्ट्रांतील पुराव्यानें भरून काढतां येते. हा काल निरनिराळ्या राष्ट्रांच्या केवळ युद्धविषयक संपर्काचा काल नसून बौद्धिक देवघेवीचाहि काल होता. इराणी लोकांनीं ग्रीस, इजिप्‍त व हिंदुस्थान हे प्रदेश एका साम्राज्याखालीं आणून त्यांच्या बौद्धिक देवघेवीस खरी सुरुवात केली. इजिप्‍त, बाबिलोनिया या साम्राज्यांनीं आपली हद्द हिंदुस्थानपर्यंत मुळींच आणली नाहीं. इराणी लोकांनीं जें कार्य सुरू केलें तेंच ग्रीकांच्या व रोमन लोकांच्या कारकीर्दीत अधिक वाढलें. इराणी राष्ट्रानें आपल्या संस्कृतीच्या विकासासाठीं ग्रीक व हिंदू तत्त्ववेत्ते, भारतीय संगीतज्ञ यांस आश्रय दिला. ग्रीकांच्या आशियांतील स्वारीनंतर ग्रीकांनीं आपली संस्कृति या खंडांत पसरविण्याचा प्रयत्‍न केला; आणि भारतीय लोकहि आपल्या पांडित्यामुळें, लढाईंत मदतीसाठीं आणि व्यापारासाठीं चोहोंकडे जात होते. या दळणवळणाचा परिणाम निरनिराळ्या लोकांत सादृश्य उत्पन्न होण्याकडे व्हावयाचाच. कांहीं अंशीं निरनिराळ्या लोकांच्या संपर्काने, तर कांहीं अंशीं प्रत्येक देशांतील स्वतंत्र पण एकाच दिशेनें झालेल्या विकासांत ग्रीसपासून वंगापर्यंत आणि रोमपासून चोडापर्यंत निरनिराळीं राष्ट्रें एकमेकांशीं सदृश होऊं लागली होतीं. त्यांच्यांतील सादृश्य उपासनाविषयक, ज्ञानविषयक आणि कलाविषयक होतें. त्या काळच्या बौद्धिक परिस्थितीचें साकल्यानें अवलोकन केलें असतां आपणांस कांहीं अनेक राष्ट्रव्यापी प्रवृत्ती आढळून येतात. आणि त्यामुळें प्राचीन जगाच्या बौद्धिक इतिहासास एक तर्‍हेचे एकत्व येतें. कांहीं कांहीं राष्ट्रांतील सादृश्य पितृमूलक होतें पण कांहींचें नवीन प्रयत्‍नांचें फळ होतें. तो नवीन प्रयत्‍न पृथकत्वानें सदृश विकास आणि देवघेव या दोन्ही क्रियांनीं अंकित झालेला हाता. निरनिराळ्या राष्ट्रांतील बौद्धिक चळवळींतींल सादृश्य, देवघेवीचा तसाच सामान्य विकासाचा परिणाम आहे.

   

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान निर्मित महत्वपूर्ण संकेतस्थळे  

   

पुजासॉफ्ट, मुंबई द्वारा निर्मित
कॉपीराइट © २०१२ --- यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई - सर्व हक्क सुरक्षित .