प्रस्तावना खंड  

   

सूची खंड  

   
Banners
   

प्रस्तावनाखंड : विभाग चवथा - बुद्धोत्तर जग

प्रकरण ७ वें.
बुद्धजन्मकालीन वैचारिक चळवळ.

ज्ञानकांड व कर्मकांड यांतील संबंध - मागच्या प्रकरणांत वासुदेवप्रणीत नारायणीय धर्माचा उद्गम दिला आहे. या विचारसंप्रदाय उपनिषन्मूलक तथापि श्रौत धर्माशीं अविरुद्ध आहे, अशी भावना सर्वत्र असल्यामुळें तो बराच टिकला. परंतु तो टिकण्याचें कारण एवढेंच नाहीं. देशांतील राजघराण्यांचे इतिहास व सूतसंस्कृतीच्या कर्तृत्वाचें संहितीकरण श्रौत धर्मापासून वासुदेव धर्माकडे प्रयाण करणा-या समुच्चयाकडून झालें ही गोष्ट या धर्माच्या लोकप्रियतेस तितकीच कारणीभूत झाली. त्या वेळेस दुसरे अनेक संप्रदाय प्रचलित होतेच. वेदकालीं ज्या देवता आपणांस दृष्टीस पडतात त्या सर्व एकदम मृत झाल्या नाहींत. सर्व देवतांपैकी कांहीं देवतांस प्रामुख्य देऊन इतरांस बाजूस ठेवावयाचें ही क्रिया श्रौत धर्मांत झाली. ब्रह्माचें - म्हणजे विश्वव्यापी तत्त्वाचें-प्रामुख्य गाऊन सर्वच देवतांस तेजोहीन करावयाचें ही ज्ञानकांडाची पद्धत होय. परंतु निराकार निर्गुण ब्रह्माचें तत्त्व सर्व लोकांस पचण्यासारखें नव्हतें; त्यामुळें ज्ञानकांडांतील बहुतेक तत्त्व मान्य करून, परंतु सर्वव्यापी ईश्वरास भौतिक स्वरूप देऊन, लोकांच्या मनांतील पारमार्थिक भावनेस उत्तेजन देणारें नारायणीय धर्माचें स्वरूप अस्तित्वांत आलें. तथापि अनेक देवतांची पूजा चालूच होती, आणि दुस-या प्रकारचे नीतिविषयक विचारहि चालू होते. त्या विचारांचें स्वरूप उपनिषदांत तसेंच महाभारतांत दिसून येत आहे. त्या विचारसंप्रदायांपैकीं ज्या संप्रदायांनीं शिष्य गोळा करणें, द्रव्य जमविणें, आचार्यपद स्थापन करणें इत्यादि खटपटी केल्या आणि विद्वान् लोकांस वगळून सामान्यांस प्राकृत वाङ्‌मयानें आपल्याकडे ओढण्याची खटपट केली, त्यांचें स्वतंत्र वाङ्‌मयामुळें, आचार्यपरंपरांमुळें व अनुयायांच्या ब्राह्मणेतरत्वामुळें पृथक्त्व राहिलें. असें संप्रदाय जैन व बौद्ध हे होत.

   

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान निर्मित महत्वपूर्ण संकेतस्थळे  

   

पुजासॉफ्ट, मुंबई द्वारा निर्मित
कॉपीराइट © २०१२ --- यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई - सर्व हक्क सुरक्षित .