प्रस्तावना खंड  

   

सूची खंड  

   
Banners
   

प्रस्तावनाखंड : विभाग चवथा - बुद्धोत्तर जग

प्रकरण ८ वें.
बुद्धाचें चरित्र.

गौतमाचा वंश.- गौतम हा बापाच्या बाजूनें 'कीकट' होता व त्याचे मातुल 'कोळी' होते. 'कुनाल' जातकांत जी कथा दिली आहे तिच्या व इतर ग्रंथांत दिलेल्या हकीकतीच्या आधारे गौतम वंशाची हकीकत अशी आहे.

ओक्काक म्हणून एक राजा (राजा हा शब्द सद्यःकालीन रूढार्थी नाहीं) होता. त्यास चार मुलें व पांच मुली होत्या. संततीची अशी समृद्धि असूनहि त्यानें पुन्हां नूतन वधू केली. त्यामुळें पूर्वींची संतति सहजच देशोधडीस लागलीं. ही भावंडें कपिलाश्रमाच्या शेजारच्या अरण्यांत गेलीं, व तेथें आपल्यापैकीं वडील बहिणीस माता म्हणून ठरवून बाकीच्या चार बहिणींशीं चौघा भावांनीं लग्न केलें. कदाचित् हीं भावंडें सावत्र असावीं. माता म्हणून जी सर्वांत वडील बहीण होती तिला रक्तदोष होता, म्हणून तिला एका झाडाच्या ढोलींत ठेविली होती. तेथें कोळी वंशांतील - शाक्यच - राम नांवाचा कोणी आला. त्यासहि रक्तदोष होता. त्यानें या वडील बहिणीस पाहून तिला बाहेर आणली व तिच्याशीं विवाह केला. पुढें कीकटांनीं आपसांत व कोळी यांच्याशीं परस्परविवाह केले आहेत. दोन्ही कुलें रोहिणी नदीच्या दोन तीरांवर शेजारीं शेजारीं त्या नदीच्या पाण्यावर शेती पिकवून रहात असत.

एके समयीं अवर्षण पडलें असतां पाण्यावरून या दोन्ही कुलांत तंटा उपस्थित झाला; व दोघेहि हातघाईवर आले. कोळ्यांनीं कीकटांचा तुम्ही व्यभिचारी, जारकर्मी, आपल्या बहिणींशीं जार कर्म करणारे आहां, असा अधिक्षेप केला. ककिटांनीं तुम्ही कुष्टी वन्यपशूप्रमाणें झाडाच्या ढोलींत राहणा-यापासून झाला आहांत अशी कोळ्यांची निर्भर्त्सना केली. गौतमानें हा तंटा मिटविण्याचा प्रयत्न केला. परंतु तो फारसा यशस्वी झाला नाहीं.

बुद्धघोषानें ज्या कथा वर्णन केल्या आहेत, त्यांतील २६ व्या अध्यायांत या दोन वंशांचीं जी हकीकत वर्णन केलेली आहे, ती वृक्षरूपानें खाली देतों,  म्हणजे या दोन कुटुंबांचा परस्पर संबंध कसा होता हें समजणें सुलभ होईल.

   

गौतमाच्या वंशाची ही अशी हकीकत आहे. गौतम शाक्य खरा; परंतु तो मल्ला, लिच्छवी, नाग, बलि अथवा कोळी नव्हता. त्याचें कुल औदिच्य किंवा आदिच्य म्हणजे कदाचित् 'कीकट' होतें. या 'कीकटांची' - ओक्काकाच्या वेळीं काय असेल तें असो, परंतु गौतमाच्या वेळीं जो व्यभिचार गणला आहे अशा संबंधापासून उत्पत्ति झालेली होती; कदाचित् हे चातुर्वर्ण्यबाह्य असल्यानें यांचे हे विवाह त्यांच्या धर्माच्या दृष्टीनें निंद्यहि नसावेत. गौतमानें तर अशा प्रकारें आपली उत्पत्ति झाली याबद्दल कस्सपसुत्तांत प्रौढी मारली आहे.

अशा चालीरीतीचे 'कीकट' हे आजचे 'कैकाडी' होत असें निर्णीत झालेलें आहे [असें रा. चांदोरकर समजतात. याला पुरावा खात्रीलायक नाहीं. रा. वि. का. राजवाडे यांनीं कीकट व कैकाडी हे एकच म्हणून म्हटलें आहे त्यावरून त्यांचे एकत्व सिद्ध झालें आहे अशी रा. चांदोरकर यांची भावना झाली असावी असें दिसतें]. गौतमाचीं पितृ व मातृकुलें कैकाडी व कोळी होतीं, असलें हें विधान ऐकून आज कोळी, कैकाडी यांची संस्कृति व त्यांचा समाजांतील दर्जा पाहिला म्हणजे कसेंसेंच वाटतें; परंतु इतिहासदृष्ट्या विचार केला तर तसें वाटण्याचें कांहीं कारण नाहीं.

   

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान निर्मित महत्वपूर्ण संकेतस्थळे  

   

पुजासॉफ्ट, मुंबई द्वारा निर्मित
कॉपीराइट © २०१२ --- यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई - सर्व हक्क सुरक्षित .