प्रस्तावना खंड  

   

सूची खंड  

   
Banners
   

प्रस्तावनाखंड : विभाग चवथा - बुद्धोत्तर जग

प्रकरण ११ वें.
तिपिटक अथवा पाली धर्मशास्त्र.

या ग्रंथाचें सविस्तर विवेचन आपणांस चीन, जपान सिलोन व ब्रह्मदेश यांतील वैचारिक परंपरा लक्षांत येण्यासाठीं अवश्य आहे. वेदविद्या आणि सूतवाङ्‌मय यांचें जे महत्त्व भारतीयांस आहे तितकेंच बौद्ध लोकांस तिपिटक नामक वाङ्‌मयाचें आहे. शिवाय वैदिक आणि सूतवाङ्‌मय यांचे संयुक्त परिणाम पहाण्यास जसें अर्वाचीन हिंदूंच्या आयुष्याकडे पाहिलें पाहिजे तसेंच त्या दोन्ही वाङ्‌मयाचें परिणामस्थान म्हणून बौद्ध वाङ्‌मयाकडेहि अवलोकिले पाहिजे. ज्या बौद्ध वाङ्‌मयाचा आपण मागें इतिहासार्थ उपयोग केला त्या वाङ्‌मयाचें स्थूल स्वरूप आपणांस ज्ञात झालें पाहिजे.

गौतम ख्रि. पू. ४८० च्या सुमारास निर्वाणाप्रत गेला व त्या वेळीं त्याचें वय ८० वर्षांचें होतें अशी विश्वसनीय सांप्रदायिक परंपरा आहे. तो २९ वर्षांचा असतांना ''मोक्षाचा मार्ग शोधून काढण्याकरितां'' यतिवेषानें भ्रमण करूं लागला असें दिसून येते. बरेसचे मानसिक श्रम करून बुद्धीस प्रगल्भता आल्यावर तो आपण शोधून काढलेल्या तत्त्वांचें प्रतिपादन करूं लागला. यावरून तो आपल्या मताचा प्रचार अजमासें ख्रि. पू. ५२५ व ४८० यांच्या दरम्यान करीत असावा असें वाटतें. याच वेळीं त्यानें पुढें सर्व जगांत अत्यंत प्रमुख अशा पारमार्थिक संप्रदायांमध्यें महत्त्वाचें स्थान मिळविणा-या एका भारतीय संप्रदायाचा पाया घालून त्याचा प्रसार केला. बुद्धाचें कार्यक्षेत्र भारतवर्षाच्या ईशान्य भागांतील गंगा नदीच्या कांठचा प्रदेश हे होतें. या प्रदेशांत म्हणजे त्या वेळच्या मगध (बहार) आणि कोसल (अयोध्या) या राज्यांत त्यानें ठिकठिकाणीं भ्रमण करून आपल्या तत्त्वांचा उपदेश केला, व त्याला अनेक अनुयायीहि मिळत गेले.

   

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान निर्मित महत्वपूर्ण संकेतस्थळे  

   

पुजासॉफ्ट, मुंबई द्वारा निर्मित
कॉपीराइट © २०१२ --- यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई - सर्व हक्क सुरक्षित .