प्रस्तावना खंड  

   

सूची खंड  

   
Banners
   

प्रस्तावनाखंड : विभाग चवथा - बुद्धोत्तर जग

प्रकरण १३ वें.
सेमेटिक संस्कृतीची जगदव्यापकता

यहुद्यांचा ख्रिस्तपूर्व धर्म.- हिब्रू समाजाच्या प्राथमिक कालांतील लोकांचा धर्म इतर सेमेटिक जातींच्या धर्मांपेक्षां भिन्न नव्हता. त्यांच्या वाङ्‌मयांतील कथा पारमार्थिक दृष्टीनें अत्यंत प्राथमिक स्वरूपाच्या होत्या. अनेक प्रकारचे विधिनिषेध मानवस्वरूपी देव, पूजनाचे प्राथमिक स्वरूपाचे अनेक प्रकार, जादुटोणा, भविष्यवाद, स्थानदेवता, कुलदेवता यांहीं तो मिश्र होता. यांतच हळू हळू प्रवक्त्यांच्या परिश्रमानें उच्च प्रकारच्या पारमार्थिक भावना व उच्च प्रकारच्या नीतिकल्पना यांची भर पडली. प्रवक्त्यांनीं शिकविलें, कीं, ईश्वरास अर्चनविधींची, यज्ञियपशूंची किंवा नैवेद्याची आवश्यकता नाहीं. ईश्वर काम्यवाणीनें किंवा स्तवनानें संतोष पावत नाहीं, तर तो आत्म्याच्या शुद्धीची व सत्याची अपेक्षा करतो. तो मनुष्यानें मनुष्याशीं वागतांना विनयपूर्वक, दयापूर्वक आणि धर्मपूर्वक वागणें इच्छितो. तो सर्वांकडून दया, क्षमा आणि सप्रेम स्वार्थत्याग हें अपेक्षितो. ईश्वर आपल्या लाडक्या इस्त्राएल लोकांनां ते त्याचे आवडते लोक आहेत व ते अब्राहामापासून जन्मले आहेत म्हणून, मुक्त करील असें मुळींच नाहीं. उलट, इस्त्राएल हे मनुष्यश्रेष्ठ असल्यामुळें त्यांनीं पापाचरण केल्यास ते अधिक कठोर शिक्षेस पात्र आहेत; कां कीं, ते आपल्या पापाचरणानें ईश्वरास अमान्य करतात. तथापि इस्त्राएल लोकांचा नाश होणार नाहीं. कारण त्यांच्यांत उच्चभावनाप्रेरित, ईश्वराची आज्ञा मानणारे व त्यावर प्रेम करणारे असे कांहीं लोक आहेत. प्रवक्त्यांनीं जे वाङ्‌मय तयार केलें त्याचा यहुदी राष्ट्रावर परिणाम झाला आणि राष्ट्रीय वाङ्‌मयाविषयीं आणि धर्माविषयीं त्यांच्या मनांत बळकट श्रद्धा उत्पन्न झाली. त्यांचा जरी पुढें स्वातंत्र्यनाश झाला, तरी त्यांचें एकत्व राष्ट्रधर्मावरील श्रद्धेनें उत्पन्न झालेल्या एकीमुळें जें टिकलें तें आजपर्यंत कायम आहे; आणि ते सर्व जगभर पसरले तरी त्यांच्यामध्यें यहुदीपणाची भावना अद्याप आहे. यहुदी लोकांचें सर्वच वाङ्‌मय पारमार्थिक नव्हतें, त्यांत कांहीं ऐतिहासिक वाङ्‌मय आहे. व कांहीं ललितवाङ्‌मय या नांवास शोभेल असेंहि आहे. उदाहरणार्थ शलोमोनचें गीत उत्कृष्ट प्रकारचें शृंगारिक काव्य आहे. याशिवाय कांहीं प्रासंगिक प्रार्थना नीतिसूत्रें मनोरम भाग त्यांत आहेत. त्याची पुढें दिलेल्या उता-यांवरून कल्पना येईल.

   

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान निर्मित महत्वपूर्ण संकेतस्थळे  

   

पुजासॉफ्ट, मुंबई द्वारा निर्मित
कॉपीराइट © २०१२ --- यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई - सर्व हक्क सुरक्षित .