प्रस्तावनाखंड : विभाग चवथा - बुद्धोत्तर जग

प्रकरण १७ वें.
खलीफत व इस्लामाचा प्रसार.

पूर्वीं तेराव्या प्रकरणांत महंमदाचें पूर्व चरित्र थोडक्यांत देऊन त्याच्यावर संप्रदाय स्थापन करण्याच्या सुमारास कोणतीं संकटें आलीं व त्यांतून त्यानें वाट कशी काढली व आपले अनुयायी हळूहळू कसे जमविले व ज्या मक्केंतून त्यास एका रात्रीं पळून जावें लागलें त्या मक्केवरच स्वारी करून त्यानें तें शहर कसें हस्तगत केलें ती हकीकत दिली आहे. व कुराणांतील निरनिराळे भाग कसकसे उत्पन्न झाले व निरनिराळ्या बाबतींत कुसणाचे नियम कसे आहेत हें सांगितलें. आतां या प्रकरणांत महंमदी संप्रदायाचा त्याच्या मरणानंतर निरनिराळ्या प्रांतात कसकसा प्रसार झाला, निरनिराळ्या महंमदी खलीफांनीं कोठकोठें सत्ता गाजवली त्याची माहिती देऊन सध्यां महंमदी संप्रदायाचें अस्तित्व जगाच्या कोणकोणत्या भागांत आहे तें दाखविलें आहे.

खलीफत.- जगाच्या संस्कृतीला व इतिहासाला मुसुलमानांनीं जें वळण दिलें तें ध्यानांत आणणे अत्यवश्य आहे. इस्लामी धर्माचा पगडा सर्व जुन्या खंडांवर केव्हां ना केव्हांतरी पूर्णपणें बसलेला दिसून येतो. खलीफ (मागाहून येणारा प्रतिनिधि) हा या धर्मीयांचा धार्मिक व व्यावहारिक बाबतींतला सर्वश्रेष्ठ सत्ताधारी पुरूष असून, तो बहुधा महंमद पैगंबराच्या कुळांतला असे. खलीफ ही पदवी प्रथम अबूबकरपासून सुरू झाली. ती महंमदानंतरचे अबूबकर आदिचार आरब लोकसत्ताक राज्याचे अधिपती उमईदवंश आब्बासीवंश, स्पेनचा उमईदवंश, फातिमाईदवंश, इजिप्तचा आब्बासीवंश, व इतर यांकडे चालत आलेली होती. इ. स. १५१७ मध्यें इजिप्तच्या आब्बासीवंशांतील शेवटच्या खलीफाकडून ही पदवी तुर्की राजघराण्यांत आली. ती अद्यापि चालत आहे. परंतु नुकत्याच झालेल्या महायुद्धानंतर यूरोप, मध्यें ग्रीस व तुर्क यांमध्यें लढे चालले होते व मित्रसंघानें जे अधिकच बिकट केले त्यांत सत्ताधारी खलीफ मित्रसंघास अनुकूल दिसून आल्यामुळें तरूण तुर्क पक्षानें त्यास राजकीय सत्तेवरून पदच्युत करून सध्यां त्याकडे फक्त धार्मिक सत्ता ठेविली आहे, म्हणजे आज त्याची किंमत इकडील निर्बल मठाधिष्ठि शंकराचार्यांपेक्षां जास्त नाहीं. या खलिफांच्या राज्याचा म्हणजे खलीफतचा संकोचविकास कसकस होत गेला. हें पुढें थोडक्यांत दिलें आहे.