प्रस्तावना खंड  

   

सूची खंड  

   
Banners
   

प्रस्तावनाखंड : विभाग चवथा - बुद्धोत्तर जग

प्रकरण १७ वें.
खलीफत व इस्लामाचा प्रसार.

आब्बासी घराणें [इ. स. ७५०-१२५८]. - या नवीन घराण्याच्या अमदानींत इस्लामी सत्ता कळसास पोंचली. पैगंबराचा एक आब्बास नांवाचा चुलता होता, त्याच्यावरून या घराण्यास हें नांव पडलें. मोआवियाचा वंश व अल्लीचा वंश यांत वांकडे असे. ते एकमेकांनां पाण्यांत पाहात, तेव्हां उमईद घराण्याचा अमदानींत अल्लीवंश वर येण्याची खटपट करीत होता हें सांगावयास नकोच. शेवटीं ७५० त त्यानें खलीफत बळकाविली व त्याची गादी बगदादला नेली.

उमईद घराणें जाऊन हें जें नवीन घराणें आलें तें सुखानें कांहीं बंड किंवा रक्तपात न होतां आलेलें नाहीं बयानिया आणि हौरान, उत्तर सिरिया, मेसापोटेमिया आणि इराक खोरासान या प्रांतांतील बंडाळी मोठे घातपात करून मोडावी लागली. अबुल आब्बास या नवीन खलीफानें जे प्रांत आपल्या अनुयायांनां वांटून दिले त्यांची यादी दिल्यास त्यावेळची खलीफत कोठवर पसरली होती हें दिसून येईल:- मेसॉपोटेमिया, अझरबैजान अर्मेनिया; सिरिया; हेजाझ येमेन आणि यमामा (येममा) कुफा; बेहेरिन आणि ओमानसह बसरा; अहवाझ, खेरासान आणि ट्रॅन्सऑक्सियाना; फार्स, (इराण), इजिप्त, सिंध; या यादींतून आफ्रिका व स्पेन वगळला आहे याचे कारण आब्बासी घराण्याला त्यावरचा अधिकार प्राप्त झाला नाहीं हें होय. या सुमारास हे देश पूर्व खलीफतीच्या ताब्यांतून निसटले. आफ्रिका काहीं काळपर्यंत पण स्पेन अजीबात कायमचा दुरावला. अफ्रिकेचा सुभेदार अबदुल रहमान यानें खलीफाविरुद्ध बंड पुकारलें पण पुढें त्याचा पराभव होऊन ७६१ पासून पुन्हां हा मुलूख पूर्व खलीफतीच्या कह्यांत आला. इ. स. ८०० पासून आफ्रिका केवळ नांवापुरतीच आब्बासी घराण्याकडे राहिली कारण हरून अल रसीदच्या कारकीर्दींत इब्राहिम बिन अल्-अघलब या अफ्रिकेच्या सुभेदारानें त्या ठिकाणीं एक स्वतंत्र घराणें स्थापिलें.

आफ्रिकेंत वरील बंड झाल्यावेळीं तिकडे स्पेनमध्यें पश्चिम उमईदांची निराळी खलीफत स्थापन झाली. खलीफ हिशमचा नातू अबदुल रहमान हा तेथील पहिला खलीफ निवडला गेला (७५५). या खलीफतीवें केंद्र कॉर्डोव्हा हें होतें.

आब्बासी घराण्याचा दुसरा खलीफ मनसूर यानें वरील नुकसानीची भरपाई करण्याकरितांच कीं काय, ७५७ त एक मोठें सैन्य उत्तर सरहद्दीवर बायझँशिअमच्या लोकांशीं टक्कर देऊन गेलेला मुलूख परत घेण्याकरितां पाठविलें. या मोहिमेंत मुसुलमानांनां फारसें यश आलें नाहीं. मनसूरनें आपलें राहाण्याचें ठिकाण कुफाच्या आसंमतांतून बगदादला नेलें. तेव्हांपासून बगदाद शहराची वाढ होऊन जगांतील अत्यंत प्रेक्षणीय स्थानांपैकीं ते एक होऊन राहिले खलीफान तेथें आपला जंगी तटबंदी वाडा बांधिला व तो मोठ्या राजवैभवांत राहूं लागला. उमईद खलीफ अरब असल्यानें त्यांना मोठ्या वाड्यांची किंवा किल्ल्यांची जरूरी नसे. प्रत्येकजण खलीफ होण्यापूर्वीं ज्या खेड्यांत राहात असे त्याच ठिकाणीं पुढेंहि वास्तव्य करी. पण आब्बासी खलीफ हे इराणी बीजाचे असल्यानें त्यांनां मानमरातब आवडत असे. तेव्हां त्यांच्यावेळेपासून खलीफांचा वैय्यक्तिक दर्जा वाढला व त्यांचे प्रतिस्पर्धींहि पण त्यांच्याच बरोबरीचे त्यांच्या घराण्यांतील असत.

मनसूरनंतर महादी खलीफ झाला. त्याच्या अमदानींत बायझँटाईन लोकांविरुद्ध प्रतिवार्षिंक स्वा-या खळ न पडतां चालू होत्या. त्याचा मुलागा हारून (भावी खलीफ हरून अल-रसीद) यानें मोठैं शौर्य गाजवून ग्रीक बादशहाला जेरीस आणिलें व तह करणें भाग पडलें; यायोगें हारूनचा जिकडे तिकडे बोलबाला झाला व महादी खलिफानेंहि आपलण वडील मुलगा मूसा याच्या अगोदर हारून हा गादीवर बसावा असें निश्चित करून टाकिलें; पण मूसाला हें मान्य झालें नाहीं. महादीच्या मृत्यूनंतर तोच गादीवर बसला व हरूननेहि त्याचा अधिकार कबूल केला. असो. महादीच्या कारकीर्दींत जिकडे तिकडे सुबत्ता होती; शेतकी व व्यापार यांची भरभराट झाली. इस्लामी सत्ता अगदीं पूर्वेकडेहि मानण्यांत येऊं लागली. चीनचा बादशहा, तिबेटचा राजा व बरेचसे हिंदुस्थानांतील राजे यांनीं खलीफाशीं तह करून सख्य राखिलें.

यानंतरच्या खलीफाचें हारून अल-रसीद हें नांव अरबी खलीफांत अत्यन्त मोठें व सर्वश्रुत आहे. पूर्वखंडांतच नव्हे तर पश्चिम खंडांतहि ''आरेबिनय नाईट्स'' या चटकदार कादंबरीमुळें या खलीफाचें नांव फार लोकप्रिय झालेलें आहे. हारुननें सैन्यांची व सरहद्दीवरील शहरांची नीट व्यवस्था ठेविली व आशियामायनरवर हल्ला चढविला. इ. स. ७९७ मधील प्रत्येक स्वारी यशस्वी झाली. कान्स्टंटिनोपलच्या निसेफोरस बादशहाचा त्यानें अनेक वेळां पराभव केला, व ८०८ मध्यें त्याला आपल्या सर्व अटी कबूल करण्यास लाविल्या. हारून अल-रसीद व शार्लमेन यांच्यामध्यें दळण वळण सुरू असे. याच्याच कारकीर्दींत बगदाद येथें कागदाचे कारखने प्रथम निधाले. हारून ७८६-८०९ पर्यंत गादीवर होता. हा मुसुलमानांच्या अंमलांतील अत्यंत भरभराटीचा काळ होय.

हारून नंतर त्याचा मुलगा अमीन खलीफ झाला. तो ८१३ त मारला गेला तेव्हां त्याचा भाऊ मामून गादीवर आला. त्याच्या आश्रयाखालीं वाङ्मय,  शास्त्र व कला यांचें तेज सर्व जगाला दिपवून टाकण्यासारखें वृद्धिंगत झालें. त्यानें बगदाद येथें एक शास्त्रगृह नांवाचें विद्यापीठ स्थापन केलें. गणित, ज्योतिष व वैद्यक आणि तत्त्वज्ञान या विषयांवर पुस्तकें तयार करविली; पृथ्वीच्या परिघाच्या एका अंशाची मोजणी करण्याकरितां दोन विद्वान गणिती पाठविली. धार्मिक बाबींतहि तो लक्ष घालीत असे. तो आपल्या दरबारीं तरूण तुर्की सरदारांनां ठेऊन घेत असे. त्याच्या मागून आलेल्या खलीफांनीं हा पाठ उचलिला व पुढें एक काल असा आला कीं त्यावेळीं दरबारांत तुर्कांचें प्राबल्य माजलें.

इस्लामचें आनुवंशिक शत्रू जे वायझंटाईन यांनां तो विसंबला नाहीं, तर इ. स. ८३०, ८३१ व ८३२ या तीन वर्षी त्यानें आशियामायनरवर मोहिमा नेल्या व विजयहि मिळविले. मामूननंतर मोटासीम, नंतर वाथीक, नंतर मोटावाक्कील खलीफ झाले. मोटासीमचा काळ राज्यांतील बंडे मोडण्यांत गेला. वाथीक मामूनप्रमाणें विद्याभिलाषी होता. त्यानें लांच घेण्याबद्दल मोठमोठ्या सरदारांनांहि शिक्षा केल्या होत्या. मोटावाक्कीलच्या कारकीर्दींत ग्रीक इजिप्तवर चालून गेले व तेथें लुटालूट करून निघून गेले. नेहेमींप्रमाणें मुसुलमान व ग्रीक यांच्या आशियामायनरच्या सरहद्दप्रांतांवर स्वा-या चालू होत्याच.

   

पुजासॉफ्ट, मुंबई द्वारा निर्मित
कॉपीराइट © २०१२ --- यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई - सर्व हक्क सुरक्षित .