प्रस्तावना खंड  

   

सूची खंड  

   
Banners
   

प्रस्तावनाखंड : विभाग चवथा - बुद्धोत्तर जग

प्रकरण १७ वें.
खलीफत व इस्लामाचा प्रसार.

मोंगल सत्ता.- १२ व्या शतकांत जेंगीझखनाचा उदय होऊन त्यानें पूर्व तुर्की टोळ्यांच्या (तार्तर कींवा मोंगल यांच्या) मदतीनें चीनचा उत्तरेकडील मुलुख काबीज केला व ट्रॅन्सऑक्सियानाच्या सरहद्दीपर्यंत आपली सत्ता वाढविली. तो रव्वारिझमच्या राजावर हल्ला करण्याकरितां पुढें चालून येत होता. १२२७ मध्यें जेंगीझखान वारला तरी मोंगलांचें पाऊल एक सारखें पुढें पडत होतें. १२५६ मध्यें जेंगीझखानाचा भाऊ हुलकू किंवा हूलगू हा ऑक्सस नदी ओलांडून इस्माईलींचे सर्व तटबंदीचे प्रदेश उध्वस्त करण्याच्या मार्गास लागला. नंतर तो बगदादकडे वळला. त्यावेळीं मोस्तासीम खलीफ गादीवर होता. त्यानें खानाशीं तहाचें बोलणें लाविलें पण व्यर्थ. तेव्हां मान व शौर्य अजींबार गुंडाळून तो हूलकूला शरण गेला. पण हुलकूनें त्याला त्याच्या इष्टमित्रांसह ठार मारिलें व बगदाद शहरांत लोकांची कत्तल करून अगणित संपत्ति लुटली. या प्रमाणें आब्बासी खलीफतीचा अंत झाला (१२५८).

अखेर.- आब्बासी वंशांतल्या एका पुरूषानें इजिप्तमध्यें पुन्हां खलीफत स्थापण्याचा प्रयत्न केला. तो अलहाकीम बी अमरइल्ला हें नांव धारण करून केरो येथें खलीफ म्हणवून घेंऊ लागला. त्याचीं मुलेंहि नांवाचे खलीफ बनून ईजिप्तमध्यें राहिलीं. तुर्की सुलतान पहिला सेलिम ईजिप्त जिंकून ही पदवी आपणाकडे घेईपर्यंत ही नांवाची खलीफत तेथें टिकली (१२०७). पुढें ती तुर्कस्थानांत आली. तेव्हां पासून तुर्कस्तानचे सुलतान आपणाला खलीफ म्हणवून घेतात.

गेल्या नोव्हेंबरांत अंगोराच्या नॅशनल अँसेंब्लीनें सुलतान महंमद यास खलीफाच्या गादीवरून दूर करून त्याच्या जागीं अबदुल मजीद यास खलीफ निवडलें. या नवीन खलीफाच्या हातीं राजसत्ता न ठेवतां केवळ धार्मिक बाबींतच त्याचा अधिकार मानला आहे. हें नियंत्रण निःसंशय मुसुलमानांत मोठी खळबळ उडवून सोडण्यासारखें असूनहि केवळ तें केमालिस्टांनीं म्हणजे त्यांच्याच धर्मानुयायांनीं केलें म्हणून निमूटपणें सोसण्याखेरीज गत्यंतर मुसुलमानांनां राहिले नाहीं. हल्लीं खलीफाची स्थिति आपल्या इकडील शंकराचार्यांप्रमाणें झाली आहे असें म्हटल्यास वावगे होणार नाहीं.

ईजिप्तमधील फातिमाईद खलीफत ९०९ पासून ११७१ पर्यंत टिकली. हिची राजधानी ट्यूनिस नजीक महदिया म्हणून शहर आहे तेथें होती. स्पेनमधील खलीफतीचा अंत इ. स. १०३३ मध्यें झाला. व तेथें पुन्हा ख्रिस्ती राज्य सुरू झालें.

आतां आपण निरनिराळ्या प्रदेशांत महंमदाचा संप्रदायाच प्रसार कसा झाला व तेथील स्थिति कशी आहे तें पाहूं.

   

पुजासॉफ्ट, मुंबई द्वारा निर्मित
कॉपीराइट © २०१२ --- यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई - सर्व हक्क सुरक्षित .