प्रस्तावना खंड  

   

सूची खंड  

   
Banners
   

प्रस्तावनाखंड : विभाग चवथा - बुद्धोत्तर जग

प्रकरण १७ वें.
खलीफत व इस्लामाचा प्रसार.

मेसापोटेमिया : सातव्या शतकांत इराणीलोकांनीं ईजिप्त व सीरिया जिंकून पूर्वरोनसाम्राज्याची मर्यादा कांस्टंटिनोपलपर्यंत मागें हटविली होती. पण नंतर हिरॅक्लिअसनें मोठा पराक्रम करून इराणचें साम्राज्य धुळीस मिळविलें. या दोन साम्राज्यांच्या झुंजीमुळें अरबांनां आयती चांगलीच संधी मिळून त्यांनीं खाल्डिया- ज्यानें एक हजार वर्षें ग्रीक व रोमन सत्ताधीशांच्या भयंकर मा-यालाहि दाद न देतां टिकाव धरला होता तो- प्रांत पांच सहा वर्षांच्या अवधींत हस्तगत करून घेतला. कित्येक शतके मोठें बलाढ्य असलेलें इराणचें साम्राज्य शेवटीं अगदीं अल्पावधींत विलयास गेलें. त्याचीं कारणें देशाची खालावलेली स्थिति, लोकांत वाढलेला नेभळटपणा, जमीनदारांचा जुलूम व राज्यांत माजलेली बेबंदशाही हीं होत. खाल्डियांतील लोक मूळ अरब जातीचे असल्यामुळें तो देश जिंकण्यास अरबांस सोपे गेलें. मेसापोटेमियांत तघलिब, आय्याद, निमार व केल्व या जातींचे लोक असून ते ख्रिस्ती झालेले होते. पण या जाती मूळ अरब वंशांतल्या असल्यामुळें अरब मुसुलमानांनीं स्वारी करतांच हें लोक फारसा विरोध न करतां मुसुलमान होऊन अरबांनां मिळाले. सर्व मेसापोटेमिया लवकरच अल्पायासानें मुसुलमानी बनला, इतकेंच नव्हे तर तो तीन शतकें मुसुलमानी जगाचें धार्मिक व बौद्धिक बाबतींत केंद्र बनून राहिला होता. लवकरच दमास्कसच्या ऐवजीं बगदाद शहर मुसुलमानी साम्राज्याची राजधानी झालें. मेसापोटेमियाचे दोन प्रांत पडतात; दक्षिणेकडचा इराक व उत्तरेकडचा जझीरा. पैकीं धार्मिक चळवळीच्या इतिहासांत इराक प्रांतच फार गाजलेला आहे. धार्मिक बाबतींतील अनेक मतभेद व तंटेबखेडे या प्रांतांतच झालेले असून आजहि हा प्रांत अल्लीच्या शियापंथाचा अनुयायी आहे. पण खुद्द अल्ली हा जिवंत होता त्या वेळीं त्याला विरोध करून ख्वारिज नामक स्वतंत्र पंथ येथें उपस्थित झाला होता. या पंथाचा ईश्वरैकसत्ताक पद्धतीच्या नांवाखालीं प्रचलित सामाजिक व राजकीय व्यवस्थेंत बखेडा माजवून सर्वत्र बेबंदशाही व विध्वंसन सुरू करण्याचा उद्देश होता, त्यामुळें खलीफांनां अनेक वर्षें त्रास सोसावा लागला. ९ व्या शतकाच्या पूर्वार्धांतल्या तीन अब्बासी खलिफांनीं तर मतस्वातंत्र्यवादी पंथाचा पक्ष स्वीकारून पुराणमताभिमानी पुरुषांचा फार छळहि केला. पुढें खलीफांनीं स्वसंरक्षणार्थ ठेवलेल्या तुर्की शिपायांनींच शिरजोर होऊन बगदादच्या खलीफाची सत्ता संपुष्टांत आणली व अखेर मोंगलांनीं स्वारी करून बगदादची सत्ता नष्ट करून टाकली.

इराक प्रांत धर्मद्रोह व राजद्रोह दोन्ही बाबतींत अग्रणी असल्यामुळेंच उलटपक्षीं तेथे पुराणमताभिमानी पक्षाचा व राजकीय सत्तेचा जोर अधिक होता. कारण येथील बिलंदर लोकांवर राज्य करण्याकरितां खलीफांनां अट्टल, हुषार व कावेबाज अधिकारी नेमावे लागत. तसेंच येथील लोक मोठे स्वतंत्रपणें विचार करणारे असल्यामुळें मुसुलमानी संप्रदायाला पूर्ण विकसित स्वरूप येथेंच प्राप्त झालें. या प्रांतांवरील सुभेदारहि बहुतेक उत्तम उत्तम असत. हसन-अलबास्त्री हा कुराणावरचा प्रसिद्ध टीकाकार इराक प्रांतांत जन्मला. धर्माच्या अनेक मतमतांतरांतून अखेर एक निश्चित धर्मपंथ चालू करणारा अबुल-हसन-अल अशरी हा या प्रांतांतलाच होय व त्याचाच पंथ अद्याप येथें चालू आहे.

इ. स. ६३८ मध्यें मेसापोटेमिया जिंकून घेतल्यावर येथें लवकरच अरबांनीं बसरा व कुफा हीं दोन लष्करी ठाणीं वसविलीं. पण त्यांचें लष्करी महत्त्व थोडक्याच दिवसांत नाहीसें होऊन तेथें दोन इस्लामी विद्यापीठें सुरू झाली. ह्यांची ऑक्सफोर्ड व केब्रिज युनिव्हर्सिटीशीं तुलना करतां येण्यासारखी आहे. दोघांची एकमेकांशीं स्पर्धा व कुराणाच्या अर्थासंबंधानें विरोधी मतें असत. त्यांत बसरा हें विचार स्वातंत्र्याचें पुरस्कर्तें असें. येथें परकी विचारांनां व लोकांनां मुक्तद्वार असल्यामुळें हें शहर प्रगमनशील राहून व्यापारी दृष्टीनेहि आज भरभराटींत आहे. उलट कुफा शहर पुराणप्रिय व दुराग्रही असल्यामुळें कायमचें नष्ट झालें. तिसरें प्रसिद्ध शहर हरन. याची प्रसिद्धी अशी आहे कीं, मूर्तिभंजक मुसुलमानी धर्म येथें चालू असतांहि जुन्या धर्मांतले मूर्तिपूजाविधी व उत्सव होत असत. ह्या शहरांत सोम (चंद्र) देवतेची उपासना चालत असे. मुसुलमान सुभेदार लांच घेऊन तिकडे दुर्लक्ष करीत. ८३० मध्यें मामून खलीफाला प्रथम ती गोष्ट कळली. तेव्हां त्यानें कुराणानें मान्य केलेला ख्रिस्ती, ज्यू वगैरे धर्म स्वीकारण्यास हुकूम सोडला व तो अमान्य केल्यास कत्तल करण्याची भीति घातली. तेव्हां हरण येथील रहिवाशांनीं आपण ख्रिस्ती असल्याचें जाहीर केलें. येथेंहि बरेच प्रसिद्ध लेखक होऊन गेले.

आब्बासी खलीफ इराणी जातीचे होते. ७६२ मध्यें बगदाद शहर वसविलें गेले व लवकरच तेथें राजधानी गेली. येथील लोक सुनी पंथाचे होते. १०५५ पासून तेथें सेल्जुक खलीफांचा अम्मल होता. १२४२ मध्यें मोगलांनीं बगदादची सत्ता नष्ट केली. नंतर कांहीं वर्षे इराणच्या ताब्यांत राहून अखेर गेलीं चारशे वर्षें तो ओटोमन तुर्कांच्या ताब्यांत आहे. अल्ली व त्याचा मुलगा हसन यांचें दफन येथें झालेलें असल्यामुळें इराणांतले शिया मुसुलमान या भूमीला मदीनापेक्षांहि अधिक पवित्र मानतात. त्यामुळें तेथें तुर्की व इराणी मुसुलमानांतला तंटा पूर्ववत् चालू आहे. या भांडणामुळें जगांतील अत्यंत सुपीक व श्रीमंत देश असूनहि हल्लीं येथें शेतकीकडे पूर्ण दुर्लक्ष्य झालेले आहे. महायुद्धापासून येथें ब्रिटिश सरकारचा बराच हात शिरकला असल्यामुळें आतां सुधारणा होण्याची बरीच आशा आहे.

   

पुजासॉफ्ट, मुंबई द्वारा निर्मित
कॉपीराइट © २०१२ --- यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई - सर्व हक्क सुरक्षित .