प्रस्तावना खंड  

   

सूची खंड  

   
Banners
   

प्रस्तावनाखंड : विभाग चवथा - बुद्धोत्तर जग

प्रकरण २१ वें.
मुसुलमानांची हिंदुस्थानावर सत्ता.

अलेक्झांडर दी ग्रेटच्या अधिका-यांनीं हिंदुस्थानच्या परिस्थितीचें जें वर्णन केलें आहे तेंच वर्णन पुढें दोन हजार वर्षानंतरच्या हिंदुस्थानच्या परिस्थितीलाहि बरोबर लागू पडत हे पाहून अर्वाचीन काळच्या परकी लेखकांनां मोठें आश्चर्य वाटतें. लोकांची नाजूक व सडपातळ शरीरयष्टि त्यांचा काळासांवळा वर्ण, त्यांचे काळे केंस, त्यांचीं कापसाचीं वस्त्रें, त्यांचा शाकाहार, त्यांची लढाईकरितां हत्ती तयार करण्याची पद्धति, त्यांच्यांतील अनेक जातिभेद, त्यांच्यांतील जातीजातींतील मिश्र विवाहास बंदी, त्यांच्यांतील पुरोहितवर्गाचें ब्राह्मण हें नांव, त्यांच्यांतील विधवांनीं पतीच्या चितेवर स्वतःस जाळून घेण्याची पद्धति, वगैरे अँरिअन यानें लिहून ठेवलेल्या प्राचीन हिंदू लोकांविषयींच्या सर्व गोष्टी अर्वाचीन काळांतील हिंदू लोकांनांहि अगदीं तंतोतंत लागू पडतात.

अलेक्झांडरचा हिंदुस्थानांत पंजाबप्रांताच्या अलीकडे आंत फारसा शिरकाव झाला नाहीं. अलेक्झांडरच्या स्वारीनंतर ब-याच शतकांनीं मुसुलमानांच्या स्वा-यांची लाट हिंदुस्थानावर आली. मुसुलमानांनीं इराण पादाक्रांत केल्यावर ते हिंदुस्थानाकडे वळले. या नव्या धर्माच्या लोकांच्या जोराच्या हल्ल्यांनां तोंड देण्यास शांत स्वभावी हिंदू लोक चांगले तयार नव्हते. तरीहि विशेष ध्यानांत ठेवण्यासारखी गोष्ट ही आहे कीं, कुराणी धर्माचे भक्त हिंदुस्थानांत जरी फार मोठ्या प्रमाणांत पसरले तरी जित हिंदू व जेते मुसुलमान यांचें संमिश्रण कधीहि झालें नाहीं- जुना हिंदु धर्म व नवा मुसुलमानी संप्रदाय यांचें संयोगीकरण होऊं शकले नाहीं. मुसुलमानांनीं जे जे इतर देश जिंकले त्यांतील बहुतेक प्रत्येक इसम त्यांनीं आपल्या संप्रदायांत ओढून घेतला. पण उलटपक्षीं हिंदुस्थानांत अनेक ठिकाणीं त्यांचीं राज्यें होतीं व अनेक वर्षें राजसत्ता त्यांच्या हातीं होती तरी सर्व हिंदूलोकसंख्येच्या एक पंचमांशाहून अधिक मुसुलमानांची संख्या पूर्वीं कधी नव्हती व आतांहि नाहीं.

हिंदुस्थानांत बौद्ध संप्रदायाचा नायनाट होऊन पुन्हां हिंदुधर्माचा सर्वत्र पगडा बसत होता, त्याच काळांत अरबस्तानांत एक नवा संप्रदाय स्थापन होत होता. त्यानंतर लवकरच या नव्या संप्रदायाचे ताजेतवाने अनुयायी संप्रदायप्रसाराच्या नांवाखालीं हिंदुस्थानांत शिरून हिमालयापासून कन्याकुमारीपर्यंत, व अरबी समुद्रापासून बंगालच्या उपसागरापर्यंत धुडगूस घालूं लागले. या नव्या मुसुलमानी संप्रदायाचा संस्थापक महंमद पैगंबर हा इ. स. ६३२ मध्यें मदिना येथें मरण पावला, व त्यानंतर बत्तीस वर्षांनींच म्हणजे इ. स. ६६४ मध्यें मुसुलमानांची हिंदुस्थानावर पहिली स्वारी झाली. या स्वारींत पंजाबमध्यें कांहीं नासधूस व लुटालूट करून अरब मुसुलमान परत गेले. त्यानंतर इ. स. ७११ त दमास्कसच्या खलीफाचा सेनापति महंमद कासीम यानें अरब सैन्यानिशीं हिंदुस्थानवर स्वारी करून सिंध प्रांत जिंकून घेतला. मुसुलमानांच्या भक्ष्यस्थानीं पडलेला हा पहिला प्रांत होय. याच वर्षीं तिकडे स्पेनमध्यें गोंथ लोकांचा शेवटचा राजा रॉडरिक पराभव पावून तो सर्व देश सारासन लोकांनीं (तुर्की मुसुलमानांनीं) जिंकला. पण इकडे हिंदुस्थानांत रजपूत लोकांच्या शौर्यामुळें व ब्राह्मण जातीच्या धर्मनिष्ठेमुळें मुसुलमानांनां भयंकर अडथळा आला. तशा प्रकारचा अडथळा करणाचे लोक पश्चिम यूरोपमधील देशांत नव्हते, यामुळें यूरोप पादाक्रांत करण्याचें काम मुसुलमानांनां बरेंच सोपें गेलें. उलट हिंदुस्थानांत इ.  स. ७५० मध्यें हिंदूंनीं जुलमी मुसुलमानी सत्तेविरुद्ध बंड करून मुसुलमानांनां स्वदेशांतून पार हांकून लाविलें, व त्यानंतर अडीचशें वर्षे हिंदुस्थानाला मुसुलमानांपासून बिलकूल त्रास झाला नाहीं.

   

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान निर्मित महत्वपूर्ण संकेतस्थळे  

   

पुजासॉफ्ट, मुंबई द्वारा निर्मित
कॉपीराइट © २०१२ --- यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई - सर्व हक्क सुरक्षित .