प्रस्तावना खंड  

   

सूची खंड  

   
Banners
   

प्रस्तावनाखंड : विभाग चवथा - बुद्धोत्तर जग

प्रकरण २७ वें.
मानवी आयुष्यक्रमाचा आणि स्वातंत्र्याचा विकास.

अर्वाचीन लोकशाहींत समता व स्वातंत्र्य या दृष्टींनीं उणीवी.- अर्वाचीन लोकशाहींत समता अधिक आहे असें दाखविण्याचा प्रयत्न वर केला आहे. त्यावरून असें मात्र समजूं नये कीं, आजच्या लोकशाहींत लोकसत्ता खरोखर प्रस्थापित झाली आहे आणि लोकांत समता पूर्णपणें स्थापित झाली आहे. त्या दृष्टीनें अजू सुधारणा व्हावयास जागा पुष्कळ आहे. अमेरिकेंत नीग्रोंनां कान्स्टिट्यूशन कायद्याप्रमाणें गो-या लोकांशीं समतेनें हक्क आहे पण दक्षिणेंतील पुष्कळ संस्थानांनीं ज्यांच्या आज्याला मताचा हक्क होता अशा लोकांनांच तेवढा मतें देण्याचा हक्क ठेवण्याचा ''कायदा'' केला आहे. तो कायदा खरोखर बेकायदेशीर आहे पण त्याचा बेकायदेशीपरणा जेव्हां एखादी नीग्रो व्यक्ति संस्थानाविरूद्ध खटला अनेक वर्षे संयुक्त संस्थानांच्या अत्युच्च कोर्टांत लढेल तेव्हांच उघडणें सिद्ध होईल. नीग्रोंनां नागरिकत्वाचे हक्क मिळूं नयेत, नीग्रो मंडळी निवडून येऊं नयेत, अधिकारी बनूं नयेत, यांविषयीं पद्धतशीर खटपट सर्व गोरे लोक करीत आहेत आणि त्यांस हाणून पाडण्याची नीग्रोंकडून खटपट यशस्वी होत नाही. यामुळें कायद्याच्या तत्त्वानें समता आणि चालू कायद्यांत विषमता आणि व्यवहारांत अतिशूद्रत्व अशी तेथें समाजस्थिति आहे. अनेक राष्ट्रांत जे अल्पसंख्याक लोकसमाज आहेत त्यांवर बहुसंख्याकांकडून जुलूम किंवा उत्तेजनाचा अभाव तरी आहेच. उदाहरणार्थ:- अमेरिकेंत रोमन क्याथोलिक किंवा ज्यू अध्यक्ष होणें शक्य नाहीं. रोमन क्याथोलिक किंवा ज्यू अध्यक्ष होणें शक्य नाहीं. रोमन क्याथोलिक जर महत्वाचें स्थान कोठें पावेल तर तो न्यूर्यार्क शहरामध्येंच. कां कीं, न्यूयॉर्क शहरांत आयरिश क्याथलिक लोकांची वस्ती पुष्कळ आहे आणि यामुळेंच न्यूयॉर्कचा मेअर पुष्कळदां क्याथोलिक असतो. सामाजिक वागवणुकींत जातिभेद आडवा येतोच. यहुदी लोकांनां अनेक ठिकाणीं अमेरिकेंत थोडेबहुत बहिष्कृतांसारखें वागविलें जातें. थोडेसे फरक बाजूस ठेवले तर असें म्हणतां येईल कीं, अमेरिकेंतील गो-या लोकांच्या बाबतींत समतेचें तत्त्व बहुतेक यशस्वी झालें आहे. चिनी व जपानी लोकांनां नीग्रोइतकें दूर ठेवीत नाहींत पण थोडेबहुत दूर ठेवतात. थोडक्यांत सांगावयाचें म्हटलें म्हणजे निरनिराळ्या जातींत समाजबुद्धि ठेवून कार्यक्रम ठेवावा ही भावना अजून लोक शाहीमध्यें चांगल्या त-हेनें जागृत झाली नाहीं. पण गेल्या पन्नास वर्षांत या बाबतींत प्रगति झाली नाहीं असें नाहीं.

   

पुजासॉफ्ट, मुंबई द्वारा निर्मित
कॉपीराइट © २०१२ --- यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई - सर्व हक्क सुरक्षित .