विभाग- सातवा : अर्थशास्त्र–आफ्रिका
अर्दोबिल ( आर्दाबिल ) - हें इराणच्या वायव्य भागांतील अझरबैजन नांवाच्या प्रांतांतील एका अर्दोबिल नांवाच्याच जिल्ह्याचें ठिकाण आहे. तें उत्तर अक्षांश ३८० ४’ आणि पूर्व रेखांश ४८० २१’ यांवर असून त्याची उंची ४५०० फूट आहे. या शहराची लोकसंख्या सुमारें १०००० असून तेथे पोस्ट व तार आफीसें आहेत. इराण व रशियां या दोन देशांमध्यें चालणार्या व्यापाराच्या वाहतुकीच्या मार्गावरील एक मोठें ठाणें या नात्यानेंहि या शहराला फार महत्त्व आहे. या शहराभोंवतीं एक मातीची पडकी भिंत असून तिला बुरूज आहेत. जवळच पूर्वेच्या बाजूला पाव मैलावर एक दगडमातीनें बांधलेला किल्ला आहे, व त्याची तटबंदी यूरोपीय पध्दतीची आहे. शहरामध्यें शेख सफीउद्दिन व त्याचा वंशज पहिला शहा इस्मायल ( १५०२-२४ ) सफवी घराण्याचा संस्थापक यांचीं थडगीं व स्मारकें आहेत. मध्ययुगांत या शहरीं पुष्कळ यूरोपीय व चिनी व्यापारी राहात. कारण ताब्रिझ, ट्रेबिझोंड, काळासमुद्र, या मार्गानें, तसेंच काकेशसपर्वत व व्होलगानदी या मार्गानें अशियाचा यूरोपबरोबर व्यापार चालत असे. १६ व्या शतकांत इराणवर सफवी घराण्याचा अम्मल सुरू झाल्यापासून या शहरांतील शेख सफीच्या कबरीच्या दर्शनार्थ पुष्कळ यात्रेकरू येऊं लागले: या स्मारकस्थानाला एक कॉलेज व एक उत्तम ग्रंथालय जोडलेलें असून त्यांत पुष्कळ दुर्मिळ व बहुमोल हस्तलेख होते पण ते हस्तलेख १८२८ मध्यें रशियनांनीं नेऊन लेनिलग्राड ( सेंट पीटर्सबर्ग ) येथील लायब्ररींत ठेविले. एका मशिदींत तीन शतकें जमीनीवर अंथरलेला एक मोठा गालीचा एका प्रवाशानें १८९० च्या सुमारास १०० पौंडाला विकत घेतला व तोच पुढें साउथ केनसिंगटन म्यूझियमकरितां पुष्कळ हजार पौंड देऊन घेण्यांत आला. हा सुंदर गालीचा ३४ फूट लांब, व १७ फूट ६ इंच रूंद आहे.