विभाग- सातवा : अर्थशास्त्र–आफ्रिका
अर्धांगवायु , ल क्ष णें. -अर्धोंगवायु अथवा पक्षाघात म्हणजे डाव्या अथवा उजव्या बाजूचें अर्धं अंग लटकें पडणें;एक हात व त्याच बाजूचा एक पाय लटका पडणें. मेंदूंत फाजील रक्तसंचय होऊन विकृत धमन्यांपैकीं एखाददुसरी धमनी फुटून त्यामुळें रोगी एकदम बेशुध्द पडतो व कांहीं वेळानें शुध्दींवर आल्यावर एका बाजूच्या हाताची व पायाची चलनशक्ति नष्ट झाल्याचें आढळतें. कित्येक रोगी बेशुध्द न होता हळू हळू त्यांचा एक हात व पाय जड पडत जाऊन शेवटीं लुला पडतो. अगर कित्येकजण झोपेंतून जागे होतात तों अर्धांगाचा झटका आलेला त्यांस आढळतो. याशिवाय एकच हात अगर फक्त एकच पाय किंवा एका बाजूचा हात आणि त्याच्या उलट बाजूचा पाय हेहि पण या रोगांत लुले पडल्याचे प्रकार आढळतात. लटका पडलेला हात अगर पाय मृत मनुष्याच्या हातपायाप्रमाणें ताठ व जड होतो. रोग्यास तो हलवितां अगर उचलतां येत नाहीं. त्याचें स्पर्शज्ञान प्रथम कमी अथवा नष्ट होऊन कांही दिवसानंतर पुन:येतें. अगर कधीं, तें अर्ध्या भागांतून पूर्णपणें नाहींसें होतें, आणि मग जीभ, नाक, कान आणि डोळे हीं ज्ञानेद्रियेंहि कार्यहीन होतात. त्यांस हात लाविला असतां दुसर्या बाजूच्या अंगापेक्षां हात पाय अंमळ गार लागतात. कधीं कधीं चेहरा जशाचा तसाच रहातो; परंतु बहुतकरून चेहर्याचा उजव्या अगर डाव्या बाजूकडील मांसल भाग वर ताणल्यासालखा अगर ओढल्यासारखा दिसतो. चेहर्याची जी बाजू लटकी पडलेली असते त्या बाजूचा गाल सैल व गोळ्यासारखा दिलतो. दोन्ही ओठांमधील कोंपरा खालीं लोंबल्यासारखा दिसून त्यांतून लाळ गळते. व याचें कारण त्या बाजूचे ओंठ रोग्यास नेहमींप्रमाणें मिटून धरितां येत नाहींत. शीळ घालावयास अगर गाल फुगविण्यास सांगितलें असतां रोग्यास तसें करतां येत नाहीं व जीभ दाखविण्यास सांगितलें असतां ती वाकडी झालेली व जी चेहर्याची बाजु लुली आहे तिकडे वळलेली नजरेस पडते. डोळ्याची विकृत बाजूची पापणी सदां अर्धवट उघडी रहाते. कारण ती त्यास मिटतां येत नाहीं व नेत्रांतून पाणी गळत असतें. अगर याच्या उलट असें होतें कीं, रोगी पापणी जी एकदां मिटून धरितो ती त्यास उघडतांच येत नाहीं. आंतील बाहुली विस्तृत झालेली दिसल्यास मेंदूंतून निघणार्या तिसर्या मज्जातंतूस इजा पोचली आहे असे समजावें व पापिणी सदा उघडी रहाणें म्हणजे सातव्या मज्जातंतूची विकृति होय. जेव्हां उजव्या बाजूचें अर्धांग लुलें पडतें तेव्हांच बहुतकरून तोंड वांकडें होतें व त्या विकृतीस अर्दितवायु म्हणतात.
पक्षाघात झाल्यावर रोग्याची वाचा, अक्कल, हुशारी. आणि स्मरणशक्ति यांतहि कांहींसा फरक झाल्याचें दिसून येतें. बोलण्यास तीन साधनांती जरूरी असते. मेंदूच्या आंत विचार उत्पन्न होतो, नंतर कंठांतून स्वर निघतो, व त्याचा मुखामध्यें शब्द होऊन उच्चार निघतो. मेंदूचा डावा अर्धभाग बिघडून जर पक्षाघात झाला असेल तर उजव्या बाजूचा हात व पाय लुला पडतो, व रोग्याचा शब्दोच्चार नीट होत नाही. यासच ‘अँफेसिआ’ (वाचाभंग) म्हणतात. रोगी अडखळत बोलतो व कधीं कधीं त्याचें बोलणें दुसर्यास समजत नाहीं. यांत पुष्कळ प्रकारचीं बोलण्यांत व्यंगें होऊं शकतात (‘वाचभंग’ पाहा). रोग्याची स्मरणशक्ति मंद होते व त्याची हिंमतहि नाहींशीं होते. सहज बोलतांना त्याच्या डोळ्यांतून पाणी येतें. त्याचा स्वभाव चिडखोर बनत जातो व त्याची प्रकृति बिघडते.
पक्षाघातांतून रोगी बरा होतो अगर कांहीं दिवसांनीं मरण पावतो. कधीं कधीं कित्येक महिने अगर वर्षें त्यास पराधीन स्थितींत खितपत पडून मग मरण येतें. रोगी बरा होणें असेल तर कदाचित थोड्या दिवसांत अथवा आठवड्यांत त्याचे प्रथम चेहरा, नंतर पाय व शेवटीं हात या क्रमानें हे अवयव पुन्हां सुधारतात. कोणाच्या हातापायांत थोडेसें व्यंग आणि कमकुवतपणा कायमचा राहून जातो. पक्षाघात बरा न होण्याचें चिन्ह म्हणजे लुल्या पडलेल्या स्नायूंचें संकोचन सुरू होतें. हाताचीं बोटें वळून तीं थोट्यासारखीं वांकडीं होतात, व कोंपर वांकडें राहतें. रोगी लंगडत व पाय फरपटत चालतो. पुष्कळ दिवसांनीं बोटें, हात आणि पाय आपोआप मधून मधून थरारल्यासारखे हलतात अगर उडतात. कोणाचें तोंड व डोळे एका बाजूसच फिरतात. अर्धांगाचा झटका येतांना मेंदूचा जो अर्धभाग विकृत झालेला असतो, त्या बाजूकडे डोळ्यांची नजर फिरते. लटका पडलेला पाय रोग्यास आपल्या इच्छाशक्तिनें हलवितां येत नाही. पण जर त्याच्या पायाच्या तळव्यास किंचित दाबून धरलें तर पाय थरारून दाब सोडीपर्यंत एकसारखा कंपित होतो.
कारणें - मेंदूंतील विकृत धमनी लहान असो अगर मोठी असो; अतिरक्तसंचयामुळें ती फुटते व त्यामुळें ते नाजूक मज्जातंतू दुखावतात व तारायंत्राची तार तोडल्याप्रमाणें त्यांतून स्नायूंवर हुकमत चालविणारे संदेश इच्छाशक्तीनेंहि पुढें जात नाहींत; व हात, पाय निर्जीव असे दिसतात. या तर्हेचा पक्षाघात एकदम होतो. मेंदू शुध्द रक्ताचे अभावीं नरम झाल्यामुळें, किंवा त्यांत एखादा ‘विद्रधि’ झाल्यानें. अथवा त्यावर एखाद्या नवीन उत्पन्न झालेल्या गाठीचा दाब पडून, किंवा उपदेशानें मेदूंतील मज्जाद्रव्य विकृत होऊन जो पक्षाघात होतो, तो हळू हळू होतो. याशिवाय मूत्रपिंडाचे व वायूचे रोग यामुळेंहि हा रोग होतो. उतारवयांत हा रोग विशेष करून होण्याचे कारण हें आहे कीं, त्या वयांत मेंदूचें शुध्द रक्ताच्यायोगें पोषण बरोबर न झाल्यामुळें त्याचा तो विशिष्ट भाग नरम होऊं लागतो व धमन्या कमजोर होऊन फुटतात. अगर या धमन्यांतील रक्त थिजतें व त्यामुळें त्यांतील प्रवाह बंद पडून मेंदूचा तो भाग नरम पडतो, व पक्षघात होतो मेंदूचा डावा अर्धा भाग येणेंप्रमाणें बिघडला असतां उजव्या बाजूचें अर्धांग व मेंदूचा उजवा अर्धभाग विकृत झाला असतां डाव्या बाजूचें अर्धांग लुलें पडतें. यास थोडे अपवाद आहेत त्यांचा विस्तार येथें करणें शक्य नाहीं ( विद्रधि पहा).
उपाय.- (१) विकार नवीन असल्यास ‘शिर:शोणित मूर्च्छा’ (अपॉप्लेक्सी) या सदरांत वर्णन केल्याप्रमाणें रोग्याची शुश्रूषा ठेवावी. विकार दीड दोन महिन्यांपेक्षां जुनाट होत चालल्यास स्नायू आकुंचन होऊन हात पाय अगर सांधे आंखडून जाऊं नयेत म्हणून त्यांतील शक्ति परत आली नसली तरी दुसर्या माणसानें ते दिवसांतून एक दोन वेळां उचलून हलवीत असावें. पायमोज्यांत वाळू भरून तसली लांबोडी पिशवी रोग्याच्या लुल्या हाताशीं अगर पायाशीं अंगाला चिटकून ठेवावी म्हणजे हातपाय वांकड्या तिकड्या स्थितींत आखडणार नाहींत. औषधोचार डॉक्टर, वैद्य यांचे सल्ल्यानें व्हावा. टरपेंटाईन, अमोनिया अगर मोहरी यांपासून केलेली तेलें चोळून लूल्या हाताची शक्ति वाढवितां येते. विजेची पेटीहि लावून थोडा उपयोग होतो. नियमितपणानें लुल्या अंगास इच्छाक्तीनें सामर्थ्य आणण्याचा प्रयत्न न कंटाळतां करीत जावा म्हणजे उपयोग होतो. हलकें अन्न द्यावें पण तें पौष्टिकहि असावें. मांसाहार, मद्यें व मैथुन हीं वर्ज्य असावींत. मानसिक श्रम, रोग्यास चीड येण्यासरख्या गोष्टी या टाळीत जाव्या. मलशुध्दि होण्याकडे विशेष लक्ष पुरवावें व झोंप नीट लागत नसल्यास झोपेचीं सौम्य औषधें द्यावीं. हातपायादि अर्धोंगांत शक्ति न येतां त्यांत काठिण्य येत चाललें तर विजेची पेटी लावूं नये. पूर्वीं उपदेश झालेला असल्यास तत्संबंधीं औषधयोजना केल्यास अर्धोंग बरें होतें.
आर्यवैद्यकीय निदान. - अतिशय काळजी करण्यानें, अति शीत आहारविहार केल्यानें, ओकारी व रेचक यांचीं औषधें अति प्रमाणांत घेतल्यानें, रक्तस्त्राव झाल्यानें, धातुक्षयानें तसेंच इतर वातवर्धक कारणानीं शरीरांतील वायु अर्ध्या शरीरांत म्हणजे एकाच बाजूच हात, पाय, मांड्या, बरगड्या, कंबर यांमध्यें कुपित होऊन त्याच बाजूच्या शिरा व स्नायु यांस शुष्क करितो. त्यामुळें सर्व सांध्यांचीं बंधनें शिथिल होतात. हातपाय इत्यादि जवळ लांब होण्यास त्रास पडतो व तें अंगहि कांहींसें चेतनारहित होतें (स्पर्श कमी कळतो). या रोगास अर्धांगवायु किंवा पक्षाघात म्हणतात.
केवळ वायु दुष्ट होऊन झालेला अर्धांगवायु अतिशय कष्टसाध्य आहे. कफ किंवा पित्त यांचा संबंध असलेला अर्धांगवायु कष्टसाध्य आहे व धातुक्षयाच्या परिणामानें झालेला अर्धांगवायु असाध्य समजावा.
अर्धांगवायु झालेलें अंग जड, थंड व सुजलेलें असेल, तर कफाचा संबंध आहे असें समजावें व दाह, संताप आणि बेशुध्दी हीं लक्षणें असतां पित्ताचा संबंध आहे असें समजावें.
चिकित्सा : - अर्धांगवायूमध्यें शिरा व स्नायु यांचें वाताने शोषण होत असतें, म्हणून या विकारांत तेलें अगर डुकर वगैरे प्राण्यांची चरबी इत्यादि तैलाचें विकृत भागाला मर्दन करणें व शेंकणें हीं आवश्यक आहेत. याकरितां नारायण तेल विषगर्भतेल, रास्त्राफतिकतेल, विजयभैरवतेल इत्यादि तेलें फार उपयोगी आहेत.
शेंकण्याकरितां दोषानुरोधानें स्निग्ध किंवा रूक्ष पदार्थांचा उपयोग करावा. निर्गुडी, करंज इत्यादि वातघ्न वृक्षांचीं पानें तापवून त्यांनींहि शेकावें. जरूरीप्रमाणें अवगाहस्वेद (ऊन पाण्यांत बसणें) हि करावा.
बाह्योपचारांत शिरोबस्ती ही प्रधानचिकित्सा सुश्रुतकारांनीं सांगितली आहे. ती अशी डोक्याच्या भोंवतालीं बारा आंगळे उंचीचा चामड्याचा पट्टा गुंडाळावा. तो बाहेरून केंसाचे दोरीनें घट्ट बांधावा. डोकें व वेष्टण यांमधील सांधा उडदांचे पिठानें भरून काढावा नंतर वातघ्न तेल डोक्यावर ओतावें तें केंस बुडेपर्यंत ओतावें व दहा हजार अंक मोजून होईपर्यंत तसेंच ठेवावें नंतर काढून घ्यावें. अमुतेलाचें नस्यहि उपयोगांत आणावें.
अंतरोपचारां (पोटांत घेण्याचीं औषधें) मध्यें प्रथम स्नेह व स्वेदविधि करून मृदु रेचक द्यावें. एरंडेल, बाहव्याचा मगज, हिरडा हीं मृदु रेचकें आहेत. स्निग्ध पदार्थांचा ( तेल, चरबी ) बस्ती ( अनुवासन ) द्यावा. ही शोधनचिकित्सा केल्यावर दोषनुरोधानें शमनचिकित्सा करावी. रास्त्रादि काढा, दशमूळांचा काढा, सहचरादि काढा इत्यादि काढे व योगराज गुग्गुल्लु, पडशीति गुग्गुलु आणि त्रयोदशांग गुग्गुलु तसेच समीरपन्नग, वातविध्वंस, हेमगर्भ इत्यादि रस याचा उपयोग करावा.
बिब्बा, रास्त्रा व लसुण यांचा रसायन विधिप्रमाणें उपयोग करावा. या विकारांत मानसिक श्रम, जागरण, थंडपाणी पिणें, वेगविधारण, रूक्ष अन्न खाणें, मैथुन, घोड्यावर बसून जाणें इत्यादि वायुवर्धक गोष्टी करूं नयेत.
ज्याचें शरीर फार कृश झालें नाहीं व दूषितभाग विचेतन झाला नाहीं, अशा अर्धांगवायूच्या रोग्याला तीनचार महिने उपचार केला असतां रोग बरा होतो.