विभाग- सातवा : अर्थशास्त्र–आफ्रिका
अर्नेज - (मुंबई इलाखा), अमदाबाद जिल्हा धोलका तालुक्यांतील हें खेडें, धोलका शहराच्या नैऋत्येस सुमारें पंधरा मैलांवर आहे. सध्यां हें जरी खेडेगांवापेक्षां फार मोठें व महत्त्वाचें नाहीं, तथापि एके काळीं, राधनपुर, कडी, पाटण, अहमदाबाद आणि खेडा या ठिकाणांहून धोलेरा व काठेवाड प्रांताकडे होणारी व्यापारी वाहतूक या गांवावरूनच होत असे. या गांवचें सबंध उत्पन्न भूतभवानी दैवस्थानाकडे खर्च होतें. जमाबंदीची सर्व व्यवस्था सरकारनें नेमलेल्या पंचांकडून होते. या उत्पन्नांतून एक सदावर्त चालविलें जातें. भरवाड गुराखी यात्रेकरूंनां गोंवर्या पुरवितात. हें त्याचें कर्तव्य आहे असें समजलें जातें (मुं ग. पु. ४. १८७९).