विभाग- सातवा : अर्थशास्त्र–आफ्रिका
अर्बथनॉट जॉन. - हा इंग्रजी वैद्य व ग्रंथकार १६६७ च्या एप्रिल महिन्याच्या २९ व्या तारखेस जन्मला. १६९१ सालीं बाप मरण पावल्यावर, जॉन अर्बथनॉंट लंडन शहरीं जाऊन, गणित विषय शिकवून आपली उपजीविका करूं लागला. १६९२ सालीं, ख्रिश्चन ह्युजेनच्या डच ग्रंथाच्या लॅटिन भाषांतराच्या आधारें यानें संभवनियम (लॉज ऑफ चॅन्स) हें पुस्तक लिहिलें. त्याच सालीं त्यानें ऑक्सफर्ड विश्वविद्यालयांत प्रवेश करून १६९६ सालीं अँन्ड्रझ विश्वविद्यालयाची एम्. डी. ची पदवी घेतली. १६९७ सालीं “वुडवर्डच्या प्रलयावरील ग्रंथाची परीक्षा” (अँन एक्झॅमिनेशन ऑफ डॉ. वुडवर्डस आकाउंट ऑफ दि डेल्यूज) या पुस्तकांत, यानें डॉ. वुडवर्डच्या मताचें चांगलें खंडन केलें व १७०१ मध्यें “गणित विषयाची उपयुक्तता” (एसे ऑन दि युसफूलनेस ऑफ मॅथेमॅटिकल लर्निग) या विषयावर निबंध लिहिला. तो १७८४ सालीं “रॉयल सोसायटी” या संस्थेचा सभासद झाला. १७०५ सालीं अँन राणीचा खास वैद्य नेमला जाऊन, १७१० मध्यें रॉयल कॉलेज जाफ फिजिसिअन्स या सभेचा सभासद निवडला गेला. त्याची समयसूचकता व दांडगें वाचन यामुळें तो टोरीपक्षाचा आधारस्तंभ होऊन बसला होता. जोनाथन स्विफ्ट, आलेक्झाँडर पोप आणि लॉर्ड चेस्टरफील्ड हे त्याचे जिवलग मित्र असून त्यांवर त्यानें अनंत उपकार केले. आपल्या ग्रंथकर्तृत्वगैरवाचें ह्याला कधीं कौतुक न वाटतां तो आपल्या अगाध कल्पनाशक्तीनें मित्राचें मनोरंजन करीत असे. यानें १७१२ मध्यें कायद्यावर एक औपरोधिक लेख लिहिला (लॉ इझ ए बॉटमलेस पिट). त्यानें “जान बुल” चें जें चित्र रेखाटलें आहे तें आजसुध्दां मनोरंजन केल्याशिवाय राहाणार नाहीं. हे औपरोधिक लेख स्विफ्ट लिहीतो असा एकदां समज होता, परंतु ते अरबथनॉटनेंच लिहिले असें पोपनें लिहून ठेविलें आहे. राजनीतींतील असत्यभाषणाच्या कलेवरील ग्रंथ (ए ट्रीटाइज ऑन दि आर्ट ऑफ पोलिटिकल लाइंग) या नांवाचा दुसरा औपरोधिक लेख यानें लिहिला होतां. अँन राणीच्या मरणानंतर अरबथनॉटचें दरबारांतील वर्चस्व बरेंच कमी झालें. १७२७ मध्यें त्यानें “रॉयल सोसायटी ऑफ फिजिसिअन्स” या संस्थेपुढें एक व्याख्यान दिलें. १७३१ सालीं अरबथनॉटचा कनिष्ठ मुलगा मरण पावल्यामुळें त्याला जो धक्का पोंचला त्यामुळें त्याची प्रकृति खालावली, आणि १७४५ मध्यें लंडन शहरीं हा मरण पावला. प्राचीन नाणीं वजनें व मापें यांचें कोष्टक ( टेबल ऑफ एन्शंट कॉइन्स वेटस अँड मेझर्स), लग्नानंतरचे तीन तास (थ्री अवर्स आफ्टर मॅरेज) अशीं उपयुक्त व विनोदात्मक पस्तकें अरबथनॉटनें लिहून ठेविलीं आहेत. याची वृत्ति सभ्य व स्वभाव मनमिळाऊ होता. याच्याबद्दल स्विफ्टला फार आदर वाटे. यानें स्विफ्टचीच लेखनशैली उचलून तिची इतकी हुबेहुब नक्कल केली कीं त्याचे लेख स्विफ्टचेच समजले जात. तथापि याच्या लेखांत स्विफ्टची तडफ नसे. [ सं. वाङ्मय.जॉर्ज ऐटकेन दी लाईफ अँड वर्कस ऑफ जॉन अर्बथ नॉट (१८८१). बायाग्रॉफिकल डिक्शनरी ऑफ इंग्लिश लिटरेचर-एव्हेरिमन लायब्ररी. ए. ब्रि. ]