विभाग- सातवा : अर्थशास्त्र–आफ्रिका
अर्हत् - वेदोत्तरकालीं ब्राह्मणवर्गाशीं आध्यात्मिक उच्चतेमार्फत सामाजिक उच्चतेसाठीं हक्क उत्पन्न करणारे लोक स्वत:स अर्हत् म्हणून घेऊं लागले. अर्हत् हें अग्निविशेषण म्हणून वेदांत ( ऋ. १. ९४, १,) येऊन हा शब्द अगोदरच सोंवळा झाला होता. त्यामुळें ब्राह्मणस्पर्धीवर्गाने हें विशेषण घेतलें आणि खरे ब्राह्मण अर्हत् हेच होत अशा प्रकारची मीमांसा सुरू झाली. जैन व बौध्द या दोन्ही संप्रदायांनीं अर्हत् शब्दाचा उपयोग केला आहे. तथापि या शब्दाचें महत्त्व दोन्ही संप्रदायांत फार दिवस टिकलें नाहीं. बौध्दमतानुसार निर्वाणाची शेवटची पायरी दाखविणारा पाली भाषेंतील ‘अर्हत्’ शब्द अगदीं आरंभींच्या बौध्द धर्मग्रंथांत आढळतो, व त्यांत तो दोन अर्थांनीं वापरलेला दिसतो, एक बौध्दधर्मी अर्हत्, व दुसरा इतर संप्रदायांतील अर्हत्. इतर संप्रदायांत त्याचा अर्थ, त्या संप्रदायांतील मताप्रमाणें धार्मिक माणसाला योग्य अशी जी उच्च ध्येयात्मक अवस्था त्या अवस्थेप्रत पोहोंचलेला मनुष्य असा आहे. या अर्थानें हा शब्द बुध्दपूर्व वाङ्मयांत आढळत नाहीं; पण आरंभींच्या बौध्दधर्मीं लोकांनीं त्या शब्दाचा जो उपयोग केला आहे त्यावरून तो बौध्दधर्म स्थापन होण्यापूर्वी उत्तर हिंदुस्थांनांत जे उपासनासंप्रदाय स्थापन होत होते त्या संप्रदायांनीं त्या शब्दाचा उपयोग केलेला असला पाहिजे, असे स्पष्ट दिसते. पण बोध्द ग्रंथांतच या शब्दाचा उपयोग विशेष केलेला आढळतो. त्याचा बोध्द सांप्रदायिक अर्थ. ज्यानें अष्टांगिक मार्ग पूर्ण आक्रमण करून त्यापासून प्राप्त होणारें फल उपभोगिले आहे असा मनुष्य (मग्गफलत्था) असा आहे. अशा माणसानें अष्टांगक मार्गांपैकीं प्रत्येक अंगांत म्हणजे (१) सम्यक् दृष्टि (२) सम्यक् सकल्प (३) सम्यक् वाक् (४) सम्यक् कर्मान्त, (५) सम्यक् आजीव (६) सम्यक् व्यायाम (७) सम्यक् स्मृति व (८) सम्यक् समाधि यांत परिपूर्णता मिळाविलेली असते ( संयुत्त ४. ५१: पुग्गल, ७३ ) त्याने इंद्रियभागेच्छा, पुनर्जन्म व अज्ञान हीं तान आसवे जिंतलेली असतात. अर्हत् हा दुष्ट मनोविकारापासून फार दूर असतो ( मज्झिम. १. २८०.) पहिल्या पांच शिष्यांनां जेव्हां सचेतन प्राण्यांमध्ये वास करणार्या पांच शारीरिक व मानसिक गुणसमूहांमध्यें अनात्मता दिसली तेव्हांच ते अर्हत् पदाप्रत पावले ( विनय. १. १४ ). बुध्दाचा पुत्र राहुल यानें आसवांवर विजय मिळविला म्हणून तो अर्हत् झाला व त्याला पुनजन्म येणार नाहीं ( थेर गाथा, २९६;). प्रत्येक अर्हताला संबोधि प्राप्त झालेलें असतें. या संबोधीचे सात भाग असतात ते:-स्मृति, धर्मविजय, बल, प्रीति, शांति, एकाग्रता व समाधि हे होत.
बुध्दाच्या ह्यातींतच अर्हत पदाप्रत पोंचलेले पुरूष व स्त्रिया होत्या व अर्हत् पुरूषांनीं लिहिलेलीं २६४ सूक्तें आणि अर्हत् स्त्रियांनीं लिहिलेलीं ७३ सूक्ते इतक्या सूक्तांचा संग्रह हल्लीं अस्तित्वांत आहे. अशा अर्हतांपैकीं पंधरा जणांनां तीन विज्जा (ज्ञानाचे प्रकार) प्राप्त झाल्या होत्या, त्या म्हणजे स्वत:च्या व इतर माणसांच्या पूर्व जन्मांचें ज्ञान आणि इतर माणसांच्या विचारांचें ज्ञान. संसारी माणसांनांहि अर्हत् होतां येत असे. बुध्दाच्या ह्यातींतच अर्हत् पद पावलेल्या अशा इसमांची यादी अंगुत्तर, ३. ४५१ मध्यें दिली आहे. जो बुध्द बनला तो अर्हत् असे. अगदीं आरंभींच्या लेखांत ज्या सात बुध्दांची माहिती आहे त्यांपैकीं प्रत्येकाचें जें वर्णन आहे त्यांत हा शब्द येतो. बर्याचशा संवादांत अर्हताच्या मानसिक व नैतिक गुणाचें व त्या स्थितींत येणार्या अनुभवांचें वर्णन आहे. दीर्घ नियकांतील पहिल्या संवादांत अष्टांगभागांपैकीं पहिल्या अंगाची, दुसर्या संवादांत धार्मिक रीतीनें आयुष्यक्रम चालविण्यापासून होणार्या फायद्याची व तिसर्या संवादांत सामाजिक दर्जाची चर्चा असून अर्हतपद हा सर्वांत उच्च दर्जा असल्याचें सांगितलें आहे. चवथ्यांत अर्हत हाच खरा ब्राह्मण असें असून पांचव्या संवादांत यज्ञाबद्दल वादविवाद असून त्यांत अर्हतपदप्राप्ति हाच सर्वोच्च यज्ञ असें म्हटलें आहे. याप्रमाणें तेरा संवादापैकीं दहांमध्ये अर्हताबद्दलच विवेचन आहे. यांपैकी बुध्दाच्या शेवटच्या संवादाचा गोषवारा पुढीलप्रमाणें आहे: “भिक्षूहो, मला जीं सत्यें ज्ञात झालीं तीं मीं तुम्हांस सांगितलीं आहेत. तीं सत्यें तुम्हाला अवगत झालीं म्हणजे तीं तुम्ही आचरा, त्यांच्यावर विचार करा, आणि सर्व लोकांच्या कल्याणाकरितां व सुखाकरितां हा शुध्द धर्म चिरकाल टिकावा म्हणून त्या सत्यांचा प्रसार करा....हीं सत्यें कोणतीं ? तीं सत्यें हीं: वस्तु स्मृत्युपस्थान, चासूसम्मप्पधान, चतु:ऋध्दिपाद, पंच अभिज्ञा, पंच इंद्रिय, पंचबल, सप्तबोधि व अष्टांगमार्ग.
विनयपीटक, २. २४०मध्यें ह्या सात समुदयांनां धम्म विनयाचीं रत्नें म्हटलें आहे. हीं सर्व मिळून सदतीस गुण असून व तेच अर्हतपदाप्रत पोहोंचलेल्या माणसाच्या अन्तर्ज्ञानाचे भाग होत.
अर्हत् याचा अर्थ वाढत चालला व त्याबरोबर तशा माणसाबद्दल पूज्य भावहि वाढत गेला. जुन्या ग्रंथांत अशी एक चाल सांगितली आहे कीं, एखाद्या भिभूला स्वत:अर्हत् बनलों आहों असें वाटे तेव्हां तो त्याप्रमाणें जाहीर करी. मज्झिमनिकायांतील ११२ व्या संवादांत अशा नव्या अर्हतपदेच्छु भिक्षूला जे सहा प्रश्न विचारीत असत ते दिले आहेत. त्या प्रश्नांनां त्यानें बरोबर उत्तरें दिलीं, तर त्याचा अर्हत् पदावरील हक्क मान्य करण्यांत येत असे. पुढें भाष्यकारांच्या काळांत ही चाल नामशेष झाली होती. त्या भाष्यकारांच्या काळांत कोणी अर्हत् झाल्याबद्दलचा नामनिर्देश नाहीं. तसेंच ख्रिस्तोत्तर तिसर्या शतकानंतर कोणी अर्हत् झाल्याचे उल्लेख कोठेहि आढळत नाहींत. अर्हत् पदाबद्दलच्या कल्पना इतक्या उच्चतर बनल्या कीं, तें पद प्राप्त करून घेण्यास प्राचीन काळांतील थोर पुरूषच लायक होते. अलीकडील काळांत तसा पुरूष असणें शक्य नाहीं, असा समज प्रचलित झाला.
संस्कृत भाषेंतील अर्हत् शब्दाचा इतिहास वरच्याहून अगदीं विरूध्द आहे. बौध्दधर्मप्रस्थापनेनंतर कांहीं शतकांनीं जे बौध्दधर्मी विद्वान संस्कृतमध्यें ग्रंथ लिहूं लागले त्यांपैकीं कांहींनींच त्याचा प्रथम उपयोग केला व तो उपयोग बौध्द धर्मांत अर्हत् पदाऐवजीं बोधिसत्त्व हें अंतिम ध्येय साध्य करावयाचें असतें अशी कल्पना पुढें मांडणारांनीं केली. या काळांतील वाङ्मयांत अर्हतपद ही उन्नतीची परा कोटी असें मानण्याचें बंद पडलें होतें, इतकेंच नव्हे तर प्रत्यक्ष बुध्दाच्या मुखांतून निघालेल्या उपदेशांत अर्हतबद्दलचा विषयहि नाही. ललितविस्तर किंवा महावस्तु या ग्रंथांत हा शब्द कोठेंच सांपडत नाहीं, फक्त बुध्दाचें किंवा त्याच्या आरंभींच्या शिष्यांचें एक विशेषण या अर्थांनें तो आलेला आहे. दिव्यवदान ( गोष्टींचा संग्रह ) या ग्रंथांत बुध्दकालीन व्यक्तींच्या गोष्टी आहेत, त्यांत अर्हत् शब्द जुन्या अर्थानेंच वापरलेला आहे, व तोच अर्थ अशोकाचा भाऊ वीताशोक याच्या गोष्टींत आहे.
संध्दर्मपुंडरीक या ग्रंथांत अर्हत् हा शब्द पंधरावीस वेळां आला आहे, पण अर्हत् ही स्थिति बुध्दापेक्षां कमी दर्जाची असें त्यांत स्पष्ट म्हटलें आहे.
[ सं द र्भ ग्रं थ.-र्हीस डेव्हिड्स-डायालॉग्स ऑफ बुध्द. आपटे-बौध्दपर्व कर्न-मॅन्युअल ऑफ बुध्दिझम्. बौध्द धर्मग्रंथ ( त्रिपिटक ). ए. रि. ए. मधील ( ‘अर्हत्’ हा लेख ). ]