विभाग- सातवा : अर्थशास्त्र–आफ्रिका
अर्हेनिअस, स्वान्टे आगस्ट-हा एक स्वीडिश पदार्थावज्ञानशास्त्रवेत्ता आणि रसायनशास्त्रज्ञ तारीख १९ फेब्रुआरी १८५९ रोजीं शॉसविज्क येथें जन्मला. सन १८७६ ते १८८१ सालापर्यंत उप्साला येथें आणि १८८१ ते १८८४ सालापर्यंत स्टॉकहोम येथें त्यानें अभ्यास केला. सन १८८६ ते १८८८ हीं दोन सालें त्यानें प्रवासांत घालवून रिगा येथील विविधकला शाळा आणि वुइर्झबर्ग, ग्राझा, अँम्स्टरडॅम आणि लाइप्झिग येथील विश्वविद्यालयें त्यानें अवलोकन केलीं. पुढें कांहीं काळानें तो स्टॉकहोम येथें प्रोफेसर झाला. विद्युद्विश्लेषणाचा सिध्दान्त ( थिअरी ऑफ इलेक्ट्रोलिटिक डिसोसिएशन ) परिणत अवस्थेस आणला म्हणून त्याची ख्याति झाली आहे. सन १८८३ सालीं त्यानें या विषयावर एक लेख लिहून तो स्टॉकहोमच्या शास्त्रीय अँकॅडेमीस सादर केला. विद्युद्विश्लेषणाखेरीज त्यानें जीवनशास्त्रासंबंधानें एक सिध्दांत मांडला; त्याचें असें म्हणणें होतें कीं, अत्यंत सूक्ष्म बीजकणांस गति आहे; हीं बीजें दशदिशेनें सर्व विश्वांत गमन करितात; यांतील बहुतेक सारीं तेजस्वी तार्यांच्या दाहक उष्णतेनें जळून जातात परंतु कांहीं बीजें योग्य परिस्थिति असलेल्या खस्थ गोलकांवर जातात आणि तेथें त्यांचीं वाढ होते.