विभाग- सातवा : अर्थशास्त्र–आफ्रिका
अलकनंदा - (अलकनंदा-युवती), ब्रिटिश गहरवाल हद्दीतील एक नदी. ही गंगेला मिळते. हिला बर्याच नद्या मिळत असल्याकारणानें हिच्या मार्गांत बरेच संगम आहेत; तेथें स्नानासाठीं यात्रा भरतात; उदाहणार्थ-नंदाकिनी हिला जेथें मिळते तें नंदप्रयाग; पिंडर जेथें मिळते तें कर्णप्रयाग; मंदाकिनी मिळते तें रूद्रप्रयाग व भागीरथी ज्या ठिकाणीं मिळते तें देवप्रयाग. यापुधें हिच्या प्रवाहाला गंगा असें नांव आहे. आकार व स्थान यांमध्यें अलकनंदा जरी भागीरथीपेक्षां श्रेष्ठ आहे तरी भागीरथीलाच गंगेचा उगम समजतात. हिचें प्राचीन ग्रांथिक नांव अजून टिकलें आहे. हिचें ग्रांथिक स्वरूप असें सांगतां येईल कीं, ही भगवत्पदीच्या चार प्रवाहांतील, आपण रहातो या दिशेकडील प्रवाह. (भाग पंचम अ. १७ गद्य ९) होय. कुबेराची हिमाचलावरील जी अलकानगरी, तिच्या बाह्यप्रदेशीं हाच प्रवाह आहे. अलकनंदेस महानदी असेंहि म्हटलें आहे. (भार. वन. अ. १४२). गंगानदीलाहि हेच नांव (भाग ४. ६; ११. २९ )आहे. ( प्रा. को. )