विभाग- सातवा : अर्थशास्त्र–आफ्रिका
अलंकार - अलंकाराचा प्रधान हेतु शरीमंडणाचा होय. आपलें शरीर चांगलें शोभिवंत दिसावें ही इच्छा सर्व मनुष्यप्राण्यांत स्वभावत: वास करिते. पुरूषांपेक्षां स्त्रियांमध्यें ही इच्छा प्रबळ असल्याकारणानें त्यांनां दागिन्याचा फार हव्यास सर्व काळीं सर्व राष्ट्रांत दृष्टीस पडतो. दागिने म्हटले म्हणजे बहुधां ते स्त्रियांचेच असावयाचे. या दागिन्यांत पुष्कळसा पैसा गुंतून पडला असल्यानें देशी व्यापाराला पाहिजे तितका पैसा मिळत नाहीं अशी हल्ली ऐकूं येणारी ओरड अगदींच खोटी नव्हे. साधारणपणें शिलकी पैसा दागिने करण्यांत खर्च होतो. विशेषत: जेथें बँका नसतात किंवा पैसा सुरक्षित ठेवणें कठिण असतें अशा ठिकाणीं शिल्लक पैसा दागिन्यांत अडकवून ठेवतात. याला गरीब लोक अपवाद नाहींत. श्रीमंती दागिने थोडे पण मौल्यवान् आणि सुबक; तर गरीबाचे दागिने पाटीभऱ व हलक्या धातूचे असतात. आपल्याकडील मराठ्यांच्या बायका किती तरी चांदीचे दागिने घालतात. गोंड वगैरे लोक तर पितळेचे लठ्ठ दागिने घालतात. मारवाडी दनोगी तर सुप्रसिध्दच आहेत. आज सुशिक्षित स्त्रिपुरूषांत व राजेरजवाड्यांत दागिन्यांची हौस कमी होत चालली आहे. नाहीं तर हिंदी संस्थानिक म्हटला म्हणजे नखशिखांत अलंकारांनीं मढविलेला असावयाचा. त्याची नक्कल पाश्चात्य रंगभूमीवर व चित्रपटावर करण्यांत येत असते.
अलंकारांमध्यें देशकालानुसार पुष्कळ वैचित्र्य दृष्टीस पडतें. तेव्हां त्यांच्या सर्व तर्हांचें वर्णन येथें करणें शक्य नाहीं; म्हणून थोडक्यांत प्राचीन व अर्वाचीन अलंकारांची पौरस्त्य व पाश्चात्य लोकांतील महिती या लेखांत खालीं दिली आहे.
- Prev
- Next >>