विभाग- सातवा : अर्थशास्त्र–आफ्रिका
अलखनामी - यास अलखगीर किंवा अलखिया अशींहि नांवें आहेत. अलखनामी हा शब्द अलक्ष्यनामन् या शब्दावरून व अलखगीर हा शब्द संस्कृत अलक्ष्यागिरि या शब्दावरून निघाला असावा. हें दसनामी शैवपंथांतील गोसाव्यांच्या जातींचें नांव आहे. अलखिया हें हिंदुस्थानी अलख शब्दापासून बललेलें नांव असून त्याचा अर्थ अलखाचा अनुयायी असा आहे.
उत्तर हिंदुस्थानांतील अनेक शैव बौराग्यांनां हीं नांवें योजतात. अलखिया हें नांव सर्वांनां लावितात, पण दसनामी पंथांतील पुरी वर्गांच्या एका पोटवर्गांतील लोकांनांच फक्त अलखनामी म्हणतात व गीरवर्गांतल्यांनां अलखगीर या नांवानें संबोधितात. हे बैरागी ‘अलख’ असें ओरडतात. म्हणून या सर्वांनां ‘अलखको जगानेवाले’ (अलक्ष्याला जागे करणारे) अशा शब्दांनीं साधारणपणें ओळखण्यांत येतें. शैवसंप्रदायाच्या इतर पंथांतील लोकसुध्दां आपणास अलखिया म्हणवितात; पण खरे अलखिया आपली एक अगदीं निराळीं जात मानून, गोरखपंथ्यांप्रमाणें कान फाडणें वगैरे कांहीं जातिविशिष्ट चाली पाळीत नाहींत.
परमेश्वर अगोचर आहे (अलखियांच्या शब्दांत “अलक्ष्य” आहे) या मुख्य कल्पनेवर सर्व अलखियांचीं धार्मिक मतें उभारलेलीं असून, त्यांतील बहुतेक एकमेकांची जुळतात. बिकानेरचा अलखगीरपंथ एका चांभारानें स्थापन केला असें सांगतात ( गॅझेटीयर ऑफ बिकानेर, मेजर पौलेट कृत, १८७९ ). त्याच्या अनुयायांनीं त्याला लाल-गीर अशी पदवी दिली होती. त्यानें मूर्तिपूजेचा इनकार करून, केवळ अलक्ष्याला भजण्याविषयीं आपल्या अनुयायांनां उपदेश केला. त्याची सर्व उपासना अलखनामस्मरणांत सांठविलेली असे, दानधर्माकडे प्रवृत्ति असे. हे हिंसा करणें व मांसाचा अन्नाच्या कामीं उपयोग करणें निषिध्द मानतात. साधुवृत्ति धारण करतात. परलोक किंवा मरणोत्तर अवस्था मुळींच मानीत नाहींत. शरीराबरोबर सर्व नाश पावतें व शेवटीं शरीरहि महाभूतांत विरून जातें असें याचें मत होतें. आपल्या शिष्यांच्या नजरेपुढें त्यानें जें अंतिमध्येय ठेविलें होतें, त्याची प्राप्ति या जन्मींच पावित्र्य, स्थिर समाधि व शांति यांचा लाभ घडून येण्यानें होतें असें तो मानीत असे. मृत्यूनंतरच्या जीविताचा अभाव असल्यानें स्वर्ग आणि नरक किंवा सुख आणि दु:ख मनुष्याच्याच ठिकाणीं व याच आयुष्यांत असतात असें तो मानीत असे.
अलखियांचा पोशाख विचित्र असतो. अंगांत एक लांब धोंगडीसारखा पायघोळ अंगरखा व डोक्यावर एक वाटोळी किंवा उंच निमुळती टोपी असते. ते भिक्षेकरी असतात तरी उघड भिक्षा मागत नाहींत. ते एखाद्याच्या दाराशीं जाऊन “अलख कहो; अलख-को लखो” असें ठराविक आवाजांत ओरडतात. जर त्यावेळीं भिक्षा वाढली तर घेतात, नाहींतर एकदम निघून जातात. हा एक शांत निरूपद्रवी भिक्षेकर्यांचा वर्ग आहे असें समजण्यांत येतें.
लालगीरचा काल सांपडत नाहीं व त्याचप्रमाणें या संप्रदायाला मूलभूत असणारा विशिष्ट सिध्दान्त केव्हां उगम पावला हेंहि माहीत नाहीं. परमेश्वर विचारबाह्य, निर्गुण व अतर्क्य आहे, हा सिध्दान्त सर्व मतांतून दृष्टीस पडतो; पण भक्तिमार्गाच्या प्रसारामुळें गेल्या हजार वर्षांत या सिध्दान्ताला चांगलें मूर्त स्वरूप दिलें गेलें आहे. शिवाय भक्तिमार्गानें याला एका कल्पनेची जोड दिली ती ही कीं, परमेश्वराला मनुष्याचा कमकुवतपणा व दोष यांविषयीं दया येऊन तो दृश्य स्वरूपांत प्रगट झाला आहे, तेव्हां सगुणदेवतेची आपण उपासना केली पाहिजे. भक्तिमार्गाचा श्रेष्ठ पुढारी म्हणजे तुलसीदास (१५२३-१६२३). यानें परमेश्वराची ज्ञानातीतता पुष्कळ वर्णिली असून, या मनोवाक्कमगोचर अशा परमेश्वराला आळविण्याचा व मोक्ष मिळविण्याचा एकच मार्ग आहे असें वारंवार सांगितलें आहे. तो मार्ग म्हणजे रामस्वरूपांत परमेस्वरूपांत परमेश्वरानें घेतलेल्या पुरूषावताराची उपासना करणें होय, अलखियांचीं मतें या विरूध्द आहे. ते मूर्त देवतेला मानीत नसून, अद्वैतवेदान्ताचाच जणूं काय पुरस्कार करितात असें वाटतें. शंकराचार्यांनां गुरू समजणारें शैव “गीर” हें उपपद लावीत असल्यानें, या संबंधांत ‘लाल-गीर’ अलख-गीर यांतील “गीर” हा शब्द अत्यंत महत्त्वाचा आहे. यांवर कदाचित् जैन मताचा पगडा बसला असेल; कारण राजपुतान्यांत बरेचसे जैन आहेत. बौध्दमतांशीं तर लालगीरचीं तत्त्वें जास्त जुळतात, पण तो धर्म हिंदुस्थानांत ज्या वेळीं भरभराटींत होता त्यावेळीं लालगीर जिवंत होता असें म्हणण्याला आपणापाशीं कांहीं पुरावा नाहीं. तुलसीदासाच्या नांवानें प्रसिध्द असणार्या एका छोट्या पद्यांत जो अलखियांचा उल्लेख आहे तोच पहिला असावा असें वाटतें. एका अलखियाशीं त्याचा जेव्हां वादविवाद झाला त्यावेळीं तुलसीदासानें असें प्रतिपादलें कीं, अलखाला पाहण्याचा जो एकच मार्ग तो म्हणजे त्याला रामस्वरूपांतून पाहाणें हा होय.
अलखियांशीं सदृश असणारा एक अर्वाचीन पंथ मुकुंददास नांवाच्या एका साधूनें १८५० च्या सुमारास ओरिसांत स्थापन केला. मुकुंददासाला त्याचे अनुयायी अलखचा अवतार समजत. पण स्वत: मुकुंददास आपल्याला या अलखशीं विशेष संबंध असणारा एक असें मानीत असे; व त्याच्या मतें अलख निराकार सर्वव्यापी व चिद्रूप असा होता. इतर बाबतींत त्याचीं मतें उत्तरहिंदुस्थानांतील अलखियांसारखी असत. १८७५ त मुकुंददास वारल्यावर त्याच्या पंथाला ओहटी लागली. तथापि अद्याप ओरिसाच्या पश्चिमेस संबलपुर जिल्ह्यांत यांचें अस्तित्व दृष्टीस पडतें. [ ‘गोसावी’ दसनामी पाहा ]
[ सं द र्भ ग्रं थ-कूक-दि ट्राईब्स अँड कास्टस ऑफ दि नॉर्थ वेस्टर्न प्राव्हिन्सेस अँड औध ( १८९६ ). एच्. एच्. विल्सन-एसेज ऑन दि रिलिजन ऑफ दि हिंदूज. इं. अँ. पु. २२ ( नोट्स ऑन तुलसीदास ). प्रोसीडिंग्ज ऑफ दि बेंगॉल एशियाटिक सोसायटी; १८८२. ग्रीयरसनचा एरिए मधील ‘अलखनामी’ लेख. ]