विभाग- सातवा : अर्थशास्त्र–आफ्रिका
अलंप्रभु - याला अल्लमप्रभु व प्रभुलिंग असेंहि म्हणतात. हा आराध्य जातीय तैलंग ब्राह्मण होता, अशी समजूत आहे. पण हा पुरूष एतिहासिक आहे याविषयींच खात्री नाहीं. लिंगाइत धर्माचा संस्थापक जो बसव त्याच्याहि अगोदरचा हा पुरूष होता, असें वीरशैव समजतात. ‘प्रभुलिंग लीले’ म्हणून जो कानडी भाषेंत चामरस कवीनें षट्पदीवृत्तांत रचलेला ग्रंथ आहे त्यांत याचें वर्णन आढळतें. या काव्यांत प्रभुलिंगास गणपतीचा अवतार मानिलें आहे व प्रत्यक्ष पार्वतीनें याची परिक्षा पाहण्याकरितां आपल्या अंशानें एक वनवासी राजकन्या उत्पन्न केल्याची कथा दिली आहे. हा अत्यंत पवित्र वर्तणुकीचा, शांत, पुष्कळ प्रवास केलेला व जागोजाग अनेक चमत्कार दाखविल्यामुळें लोकांत प्रख्यातीस आलेला असा होता. कोल्हापूर संस्थानांतील अळतें गांवीं जें अलंप्रभूचें देवालय आहे, तें याचें नसून अवरंगजेबाच्या स्मरणार्थ देवीला हें नांव दिलें आहे (कोल्हापूर गॅ. पहा). याची सांप्रदायिक कथा देणें म्हणजे प्रभुलिंगलीलेचा गोषवारा देणें दोय. प्रभुलिंगलीला पहा.