विभाग- सातवा : अर्थशास्त्र–आफ्रिका
अलफॉन्सी - हें नांव अनेक पोर्तुगीझ व स्पॅनिश राजांचें होतें.
पोर्तुगीज राजे, पहिलाअलफान्सो ( १०९४-१.१८५ ) हा फार शूर व स्वतंत्र बाण्याचा असे. त्यानें लिऑनचें मांडलिकत्व झुगारून दिलें व मूरलोकांचा पराभव करून त्यांचा प्रदेश जिंकला. पुढें लिऑनच्या राजानें त्याचा पराभव केला व गॅलिशिया घेऊन त्याला बंधमुक्त केलें. पोर्तुगीज लोक याला अद्यापहि साधु व स्वराज्यसंस्थापक म्हणून भजतात.
२ रा ( ११८५-१२२३ ) यानें धर्माधिकार्यांची सत्ता संपुष्टांत आणण्याचा प्रयत्न केला. आपल्या राज्याचे कायदे बदलून नवे केले.
३ रा ( १२१०-१२७९ ) यानें भूरलोकांशी युध्द सुरूं ठेविलें. याच्या अमदानींत अलसेगार्व्ह पोर्तुगालला जोडण्यांत आला.
४ था ( १२९०-१३५७ ) याच्या मुलानें जें बंड केलें त्याला कारण अलफान्सोनें त्याच्या बायकोचा ( सुनेचा ) खून करविला हें होय.
५ वा ( १४३२-१४८१ ) आफ्रिकेंतील मूरलोकांच्या प्रदेशावर चाल केल्यामुळें “दि आफ्रिकन” हें उपपद याला मिळालें. यानें कॅस्टाईल व लिऑन यांचा स्वामी होण्याची महत्त्वाकांक्षा धरली. शेवटीं उदास होऊन राज्य त्याग केला व सिंत्राच्यां मठांत जाऊन रांहिला.
६ वा ( १६४३-१६७५ ) याच्या दुर्वर्तनामुळें याच्या बायकोनें व भावानें यांस इ. स. (१६६७) मध्यें पदच्युत केलें.
स्पॅ नि श रा जे - स्पेन देशांत ७३९ पासून १०२८ पर्यंत अलफान्सो या नांवाचे सहा राजे झाले. यांच्या कारकीर्दींची विशेष माहिती उपलब्ध नाहीं. त्यांची शकावली अशी: पहिला अलफॉन्सो ७३९-७५७. दुसरा:-७८९-८४२. तिसरा:-८६६-९१४. चवथा:-९२४-९३१. पांचवा:-९९९-१०२८. सहावा अलफान्सो (१०६५-११०९):-हा बराच प्रसिध्द असून. अनेक कवींनीं याला आपला काव्यनायक बनविलें आहे. स्पेनमध्यें यानें भिन्न संस्कृतीचा प्रवेश करविला. अरब लोकांना चांगलें वागविलें व ख्रिस्ती व मुसुलमान संप्रदाय एकत्र आणिले.
७ वा. (११२६-११५७) हा ११३५ त गादीवर बसला. यानें आपल्या देशांत एकी करण्याचा प्रयत्न केला. हा ख्रिस्ती धर्माचा पुरस्कर्ता असून आपल्या राज्यांतील मुसुलमानांचाहि चाहता होता.
८ वा. कॅस्टाईलचा राजा ( ११५८-१२१४)यानें ख्रिश्चन राजे व परराष्ट्रीय धर्मयोध्दे यांचा अध्वर्यू होऊन अल्मोहेड लोकांचा ( १२१२ ) पराभव केला. यानेच स्पेन देशांतील पहिलें विद्यापीठ स्थापन केलें.
९ वा. लिऑनचा राजा ( १२३०-१२८८ ) आपल्या जवळच्या नात्यांत दोनदां लग्नसंबंध केल्यामुळें पोपनें याच्यावर बहिष्कार घातला.
१० वा. ( १२५२-१२८४ ) यानें ज्योतिष शास्त्रास उत्तेजन दिलें. राजा या दृष्टीनें कायदेकानू करण्यांत यानें बरेंच कौशल्य दाखविलें. यानें फ्युरो रिअल व सायेट पार्टीडास या नांवाचे कायद्याचे दोन ग्रंथ लिहिले. यांपैकीं दुसरा अपुरा राहिला होतां.
११ वा. ( १३१२-१३५०-यानें आपल्या क्रूर वर्तनाचा कित्ता आपला मुलगा पीटर दि क्रुएल ( क्रूर पीटर ) याला घालून दिला असें म्हणण्यास हरकत नाहीं.
१२ वा. ( १८५७-१८८५ ):-हा दुसर्या एसाबेलेचा मुलगा. १८६८ ची राज्यक्रांति झाल्यावर हा आपल्या आईबापाबरोबर पॅरिसला गेला. तेथून त्याला व्हिएन्ना येथें शिकण्याकरितां पाठविलें. पुढें १८७० त याच्या आईनें आपला राज्यावरील हक्क सोडला. तेव्हां हा गादीवर बसला. यानें १८७४ त “स्पेनची राजसत्ता माझ्यांत एकवटली आहे” असें जाहीर केलें. १८७६ त यानें कालींस्ट पक्षाचा पाडाव केला. १८७८ मध्यें त्यानें मराया डी लॅस मर्सेंडेस इच्याशीं लग्न केलें. पुढें ही मेल्यावर (१८७९) ऑस्ट्रियाची राजकन्या मराया ख्रिश्चनिया इच्याशीं विवाह लावला.
१३ वा. [ १८८६ ] हा बाराव्या अलफाँसोचा मुलगा होता. १९०२ मध्यें यानें राज्यसूत्रें आपल्या हातीं घेतलीं. १९०६ मध्यें याचें इंग्लंडच्या ७ व्या एडवर्डची पुतणी व्हिक्टोरिया एजिनायज्युशिआएना मराया ख्रिश्चनिया इच्याशी लग्न झालें
अरेगॉनमध्येंहि पांच अलफान्सो नांवाचे राजे होऊन गेले. पैकीं पहिला (११०४-११३४) स्पेनच्या सहाव्या अलफान्सोचा जांवई असून फार शूर व धार्मिक होता त्याची बायको एक कृत्याच होती. या घराण्यांतला पांचवा अलफॉन्सो ( १४१६-१४५८ ) फार मोठ्या योग्यतेचा व विद्वद्वर्य असा होता. १५ व्या शतकांतील यूरोपांतील पुनरूज्जीवनाचें कार्य यानें कांहींसें आपल्या अंगावर घेतलें होतें (ए. ब्रि.)