विभाग- सातवा : अर्थशास्त्र–आफ्रिका
अलबा लांगा. - इटलीमधील लॅटिअम प्रांतांतील जुनें शहर. हें “अलबानस् लाकस” या सरोवराच्या पश्चिम किनार्यावर असून रोमच्या आग्नेयदिशेस १२ मैलांवर आहे. आसकानिअस यानें हें शहर वसविलें असून तें लॅटिन शहरांमध्यें सर्वांत जुनें शहर होतें अशी दंतकथा आहे. टलस हॉस्टिलिअस यानें हें शहर उध्वस्त केल्यावर लॅटिन शहरांचें धूरीणत्व रोमला प्राप्त झालें. अलबानस मॉन्स व अलबानस् लाकस यांमध्यें हें शहर वसलेलें असावें असें कांहींचें मत आहे परंतु लिव्ही व सिसेरो यांच्या वर्णनांवरून पहातां, हें शहर “अलबानस् लाकस याच्या पश्चिमेस सध्याच्या “कॅसल गांडाल्फो” याच्या जागेवर असावें असें स्पष्ट दिसतें. सध्या या शहराचा अवशेष फक्त स्मशानभूमी असून तीमध्यें असलेली थडगी ज्वालामुखीतून निघालेल्या रसानें आच्छादलेली आहेत. डोमिटिअन नांवाचा राजा या शहराजवळच्या सरोवराच्या काठी रहात असे. “ कॅसल गाँडोल्फो” मधील सध्याच्या “व्हिला बारबिरिनीच्या” ठिकाणीं जुनी राजमंदिरें व उपवनगृहें होता. या उपवनगृहांचे कांहीं अवशेष अद्याप तेथें आहेत. या शहरी रोमच्या पलटणीतील लोकांच्या कांही थडग्यांत मॅक्झेंटिअस याचीं नाणीं सांपडलेली आहेत. या शहरांत ज्वालामुखीतील रसापासून झालेले दगड इमारतीच्या कामी उपयोगांत आणितात. ( ए. ब्रि. )