विभाग- सातवा : अर्थशास्त्र–आफ्रिका
अलकबुकर्क अलफॉन्सो डी ( १४५३-१५१५ ) - याचा जन्म इ.स. १४५३ त लिस्बनजवळ अलेक्झांड्रिया शहरीं झाला. त्याचा बाप गोन्झाव्हो हा पोर्तुगालच्या राजघराण्यांतील एक अनौरस वंशज असून पोर्तुगालच्या दरबारी तो बहुमानाच्या जागेवर काम करीत होता. अलबुकर्कचें सर्व शिक्षण पांचव्या अलफान्सो राजाच्याच दरबारीं झालें होतें, व त्या राजाच्या मरणानंतर त्यानें कांहीं दिवस आफ्रिकेंत काम केलेलें दिसतें. तेथून परत आल्यावर त्यास दुसर्या जॉनच्या मुख्य एक्करी ( अश्वधिकारी )चें काम मिळालें. १५०३ मध्यें तो पूर्वेकडे पहिल्या प्रथम पर्यटनास निघाला, व केप ऑफ गुड होपला वळसा घालून हिंदुस्थानांत आला. येथें कोचीनच्या राजास गादीवर बसविण्याच्या कामी मदत करून कोचीन येथें पोर्तुगीजांचा किल्ला बांधण्याची त्यानें राजापासून परवानगी मिळविली. अशा रीतीनें पोर्तुगालच्या पूर्वेकडील साम्राज्याचा पाया घातला गेला. १५०४ मध्यें तो स्वदेशीं परत आला ( जुलै ). तेथें त्याचें एमॅन्युएल राजानें चांगलें स्वागत केलें, व आपल्या १६ जहाजांच्या आरमारापैकीं पांच जहाजें त्याच्या ताब्यांत दिली. हा जहाजांचा तांडा सन १५०६ त ट्रिस्टनड कुन्हा याच्या अधिपत्याखाली हिंदुस्थानाकडे यावयास निघाला. मार्गांत आफ्रिकेच्या पूर्व किनार्यावरील अरब लोकांच्या शहरावर हल्ले चढवून जय मिळविल्यानंतर अलबुकर्क कुन्हापासून वेगळा होऊन इराणच्या आखातातील ऑर्मझ बेटावर चाल करून गेला. हें बेट त्या काळीं पूर्वेकडील देशातील व्यापाराचें एक मुख्य केन्द्र समजलें जात होतें. २५ सप्टेंबर १५०७, रोजी तो ऑर्मझ येथें आला व त्यानंतर लवकरच त्यानें तें बेट हस्तगत करून घेतलें. तथापि त्याला तें फार दिवस आपल्या ताब्यांत ठेवतां आलें नाहीं. इ. स. १५०८ च्या अखेरीस तो आणखी तीन जहाजें घेऊन मलबार किन्यार्यावर आला, व तेथील सुभेदार फ्रान्सिस्को डी आलमिडा याच्या जागी राजाकडून आपली नेमणूक झाली असल्याचें त्यानें जाहीर केलें. परंतु अलबुकर्कच्या हाती अधिकारसूत्रें न देतां फ्रान्सिस्कोनें त्यास पकडून तुरूंगात टाकलें. येथून त्याची तीन महिन्यांनी पोर्तुगालच्या सेनापतीनें मोठ्या आरमारासह येऊन सुटका केली. १५०९ च्या नोव्हेंबर महिन्यांत म्हणजे अरबी समुद्रातल्या मोहिमीहून हिदस्थानात आल्यावर जवळ जवळ एक वर्षांनें अलबुकर्क सुभेदारीच्या कामावर रूजू झाला. अलबुकर्कच्या हाती अधिकारसूत्रे येताच आपल्या नेहमीच्या तडफीस अनुसरून १५१० च्या जानेवारी महिन्यांत त्यानें कालिकतवर हल्ला चढविला. ह्या हल्ल्यांत त्यास अपयश येऊन एक जबर जखम झाली असताहि त्यानें त्यानंतर लवकरच गोवें शहरास वेढा घालून विजापुरच्या राजापासून तें हस्तगत केलें. परंतु तें शहर ताब्यात ठेवण्यास पुरेसें सैन्य जवळ नसल्यामुळें आगस्ट महिन्यांत तो तें सोडून गेला; व पुढें नोव्हेंबर महिन्यांत सैन्य घेऊन येऊन त्यानें तें शहर पुन्हां हस्तगत केलें. यानंतर तो मलाक्कावर स्वारी करून गेला. तेथे निकराची लढाई होऊन तें ठिकाण त्यानें काबीज केलें. या शहराचा बंदोबस्त करून तेथें पोर्तुगीजांची सत्ता कायम करण्याकरितां अलबुकर्क जवळ जवळ एक वर्ष त्या ठिकाणी राहिला. १५१२ त तो मलाक्काहून पुन्हां मलबार किनार्याकडे यावयास निघाला. परंतु वाटेंत एक मोठें तुफान झालें, व या तुफानांतून अलबुकर्क जरी कसा बसा जीव बचावून पार पडला तरी त्यानें आपल्या बरोबर मलाक्काहून जी अपार संपत्ति आणली होती, ती सर्व जहाज फुटून समुद्रार्पण झाली. याच वर्षाच्या सप्टेबर महिन्यांत तो गोवें येथें आला व इदांल्कन यानें उभारलेलें बंड मोडून त्याने त्या शहराचा इतका चांगला बंदोबस्त केला कीं, यापुढे गोवें हें पोर्तुगीज लोकांचें एक भरभराटीचें शहर होऊन बसलें. यानंतर पोर्तुगाल सरकारच्या हुकुमावरून अलबुकर्कनें तांबड्या समुद्रावरील स्वारींचें काम हातीं घेतलें. तांबड्या समुद्रांतील दळणवळण सर्वस्वी पोर्तुगीज लोकांच्या हातीं रहावें असा ही स्वारी करण्यांत पोर्तुगीज सरकारच हेतु होता. या हुकमावरहुकूम अलबुकर्कनें १५१३ त एडनला वेढा घातला, परंतु तो निष्फळ होऊन त्यास मागें परतावें लागलें. असें म्हणतात की, इजिप्तची सत्ता नष्ट करण्याकरितां नाइल नदीचा प्रवाह तांबड्या समुद्राकडे फिरवून सर्व इजिप्तदेश ओसाड करण्याचा अलबुकर्कचा बेत होता. त्याचप्रमाणें पॅलेस्टाइन परत मिळविण्याकरितां मोहीम कोणीकडून व कशी करावी याचीहि त्यानें रूपरेषा आखली होती. १५१५ त त्यानें ऑर्मझ शहरावर दुसर्यांदा हल्ला केला हीच त्याची शेवटची मोहीम होती. या प्रसंगी ऑर्मझ येथील लोक कांहीं प्रतिकार न करतांच अलबुकर्कच्या स्वाधीन झाले. हें बेट १६२२ पर्येंत पोर्तुगीजाच्या ताब्यात राहिलें. अलबुकर्कचे अखेरचे दिवस अतिशय काळजीत व संकटांत गेले. पोर्तुगालच्या दरबारी त्याचे कित्येक वैरी असून ते त्याच्याविरूध्द राजाचें मन कलुषित करण्याची एकहि संधिवाया जाऊं देत नसत. स्वत: अलबुकर्कच्या अदूरदर्शी व अरेरावी वर्तनांमुळें त्याच्या वैर्यांस आपला कावा साधण्यास कित्येक वेळां मदतच झाली. ऑर्मझहून परत येत असतांना गोवें बंदराच्या तोंडाशीं यूरोपहून आलेलें जें एक जहाज त्याच्या दृष्टीस पडलें त्यांतच त्याला काढून त्याच्या जागी त्याचा खाजगी वैरी सुआरेन याची नेमणूक झाल्याच्या हुकुमाचे कागद होते. हें वर्तमान कळतांच त्याच्या मनास इतका धक्का बसला की तो समुद्रावरच १६ डिसेंबर १५१५ रोजीं मरण पावला. मरणापूर्वी त्यानें आपल्या राजाच्या नांवानें एक पत्र लिहून त्यांत आपल्या कामगिरीचें सविस्तर वर्णन केलें, व तिचा मोबदला स्वत:स मिळाला नाही तरी आपल्या मागून आपल्या मुलास तरी मिळावा अशी इच्छा दर्शविली.
हिंदुस्थानांतील मुलूख काबीज करण्यांत पोर्तुगीजांचा व्यापार हाच एक केवळ मुख्य उद्देश असल्यामुळें ते किनार्यापासून दूर असलेला प्रदेश पादाक्रान्त करण्याच्या भानगडींत पडले नाहींत.परंतु अलबुकर्कचें धोरण इतकें संकुचित नव्हतें. आशिया खंडांत पोर्तुगीज साम्राज्याचा भक्कम पाया घालावा अशी त्याची महत्त्वाकांक्षा होती. अलबुकर्कच्या हातून गोंव्याच्या वेढ्यांत हाती लागलेल्या कैद्यांचे हाल हाल करणें, तांबड्या समुद्रांतील निराश्रित कोळ्यांचे नाक कान कापणें, रैसअहमद याचा खून करण्याची मसलत करणें वगैरे कांहीं आक्षेपार्ह कृत्यें झाली होती, तरी त्याच्या कारकीर्दींत हिंदु लोकांस धर्मांतरासंबंधी मुळींच त्रास झाला नाहीं. आसपासच्या हिंदी संस्थानिकांशीहि त्याचें गोडीगुलाचेंच वर्तन होतें. त्यानें आपल्या सुस्वभावानें इतकी लोकप्रियता संपादन केली की, पुढील सुभेदाराच्या कारकीर्दीत हिंदी लोकांचा छळ होऊं लागला तेव्हां ते भाविकपणानें त्याच्या कबरीस नवस करण्यास जात असत, आपल्या प्रजेस न्याय मिळावा म्हणून अलबुकर्कनें गोवे, चौल व वसई येथें फौजदार नेमले होते व हेच सर्व दिवाणी व फौजदारी खटल्यांचा निकाल लावीत. व्यापार हा सर्वस्वी सरकारनेंच आपल्या हाती ठेवला असल्यामुळे अलबुकर्कनें प्रत्येक बंदरांत जकातीची नाकी बसविली. हिंदुस्थानांतील जी सतीची चाल इंग्रज १८२९ पर्यंत बंद करूं शकले नाहीत ती यानें आपल्या मुलूखांत १६ व्या शतकाच्या आरंभासच बंद केली होती. तथापि त्यानें ग्रामपंचायती वगैरे खेडेगांवांतील उपयुक्त संस्था पूर्वीप्रमाणें जशाच्या तशाच राहूं दिल्या. पोर्तुगालसारख्या थोड्या लोकवस्तीच्या राज्यांत यूरोपियन लोकांच्या मदतीवर नुसती बंदरें देखील कबजांत ठेवणें शक्य नव्हतें. यासाठीं अलबुकर्कनें एकद्देशीय स्त्रियांस ख्रिस्ती धर्म देऊन त्यांच्याशीं विवाह लावण्यास आपल्या लोकांस उत्तेजन दिलें. व अशा रीतीनें ज्यांच्यावर विश्वास टाकून राज्यकारभार करतां येईल अशी एक मिश्र रक्ताची नवीन जात निर्माण केली. अलबुकर्कच्या मृत्यूनंतर पोर्तुगालच्या राजाची त्याच्या राजनिष्ठेबद्दल खात्री पटली व अलबुकर्कचा दासीपुत्र आफोन्सो याजवर बहुमानांचा वर्षाव करून त्यानें अलबुकर्कशीं घडलेल्या कृतघ्नपणाच्या वर्तनानें लागलेला डाग धुवून टाकण्याचा प्रयत्न केला. अलबुकर्कच्या पुत्रानें ‘कॉमेंटरिऑस डो ग्रांडे आफोन्सो डी अलबुकर्क’ या नावांखालीं आपल्या बापाच्या कागदपत्रांचा निवडक भाग प्रसिध्द केलेला आहे. [ ब्रिटानिका; अलबुकर्क, रूलर्स ऑफ इंडिया सीरिज; इ. ]