विभाग- सातवा : अर्थशास्त्र–आफ्रिका
अलवार संस्थान - अलवार हें राजपुतान्याच्या पूर्वभागांतील एक देशी संस्था असूनन याचें क्षेत्रफळ सुमारे ३१४१ चौरस मैल आहे. ’ हें उत्तर अक्षांश २७०३’ ते २८० १३’ व पूर्व रेखांश ७६० ७’ ते ७७० १३’ यांच्या दरम्यान आहे.
सी मा.- याच्या उत्तरेस पंजाबमधील गुरगांव जिल्हा, जयपूरपैकीं कोटकासीम व नाभापैकी बावल हे आहेत. वायव्येस पतियाळा संस्थानांतील नरनाळ हें आहे. पश्चिमेस व दक्षिणेस जयपूर संस्थान आहे. याचा आकार बरोबर एखाद्या चतुष्कोनाकृतीसारखा असून उत्तर व दक्षिण यांची सर्वोत मोठी लांबी सुमारें ८० मैल आहे व दक्षिणोत्तर रूंदी जास्तीत जास्त ६० मैल आहे. या संस्थानांत विशेष नजरेस येणारी गोष्ट म्हणजे येथील खडकाळ, चढणीचे व बहुतेक एकमेकांस समांतर असलेले डोंगर होत. तरी पण ह्या संस्थानचा उत्तरेकडील व तसाच पूर्वेचा भाग मोकळा व सखल आहे. यांतील मुख्य डोंगर अरवली पर्वताचा एक फांटा हा असून तो या संस्थानच्या बरोबर मधून दक्षिणोत्तर अलवार शहराजवळून जयपूर सीमेला जाऊन भिडला आहे. त्याची लांबी सुमारें ५६ मैल आहे. पश्चिमेकडे तर या डोंगरामुळें एक स्वाभाविक व सामान्यत: अगम्य असा तटच झाला आहे. या संस्थानामधील मुख्य नदी म्हणजे साबी. दुसरी मोठी नदी म्हटली म्हणजे बार्हा किंवा लासवारी. अलवार व भरतपूर या दोन संस्थानांमध्यें या नदीच्या पाण्याबद्दल नेहमी तंटे उपस्थित होतात. ह्या नदीच्या पाण्यावर दोन्ही संस्थानची सारखी मालकी आहे. थोड्या वर्षांपूर्वी अलवार संस्थानच्या फायद्याचा असा ह्या प्रकरणाचा निकाल लागला आहे.
दिल्लीच्या आसमंतांत व अलवार संस्थानांत जो स्फटिकासारखा दगड ( क्वार्टझ ) सांपडतो त्यास अलवारवरूनच नांव पडलें आहे. यांचा रंग करडा असून यांवर सुंदर रवे दिसतात. याखेरीज शिस्ट व स्लेट जातीचा दगडहि येथें सांपडतो व तो खालच्या थरांत असतो. दरीबा वगैरे कांहीं भागांत तांबें सांपडतें; पण गाझी जिल्ह्यांत शिसेंहि आढळतें.
हरिण व सपाट प्रदेशांत सांपडणार्या लहान शिकारी प्राण्यांशिवाय डोंगराळ प्रदेशांत वाघ, तरस, सांबर, व बहुतेक सर्व ठिकाणी चित्ता आढळून येतो. रानडुकर व लांडगा यांचीहि भेट कधी कधी होते.
बहुतेक ठिकाणीं हवा कोरडी व निरोगी आहे. उत्तरेंकडील भागांतील प्रदेश उघडा व जमीन भुसभुशीत असल्यामुळें हवा उन्हाळ्यांत डोंगराळ प्रदेशापेक्षां जास्त थंड असते.
एकंदर संस्थानांत पावसाचें सरासरी मान २२ इंच असते व त्यांतील सुमारें ४/५ पाऊस जुलै ऑगस्ट व सप्टेंबर महिन्यांत पडतो. पश्चिम प्रदेशापेक्षां पूर्वेकडील प्रदेशांत पाऊस जास्त असतो.
रजपुतांत ( कच्छवाह ) म्हणून एक जात आहे. जयपूरचे महाराज याच जातीचे आहेत. त्यांतून निघालेल्या नरूक या पोटजातीच्या लालावत शाखेपैकी हें अलवारचें घराणें आहे. चवदाव्या शतकाच्या उत्तरार्धांत अंबर येथें उदयकरण नांवाचा राजा राज्य करीत होता. त्याचा वडील मुलगा जो बारसिंग तो अलवार घराण्याचा मुळ पुरूष मानला जातो. बारसिंग आपल्या बापाशी भांडून राज्यावरचा हक्क सोडून जयपूर संस्थानांत नोकरीस राहिला. तेथें त्यानें व त्याच्या वंशजानी सुमारें ३०० वर्षें नोकरी केली. कल्याणसिंगला कामगिरीबद्दल जयसिंगाकडून माचेरीची जहागीर मिळाली. चार पांच पिढ्यांनंतर प्रतापसिंह यानें अलवार संस्थान मिळविलें. वयाच्या सतराव्या वर्षीं जयपूर संस्थानात सैन्यांत नोकरी धरून उनिगारा येथील उपद्रवी नरूक लोकांनां धाकांत आणून त्यानें मराठ्यांनीं रणथंबोरच्या किल्ल्याला वेढा दिला असतां तरवार गाजवून नांव लौकिक मिळविला; परंतु लवकरच त्याला लोकांच्या द्वेषामुळें जयपूर सोडून जावें लागलें. मग तो सुरजमल जाट व त्याच्या मरणानंतर त्याचा मुलगा जव्हारसिंग यांच्या नोकरीस भरतपूर संस्थानांत राहिला. जव्हारसिंगाचा जयपूरच्या राज्यातून ससैन्य पुष्कराला जाण्याचा बेत त्याला पसंत पडला नाही व तो परत आपल्या जुन्या मालकाकडे गेला. अशी वदंता आहे कीं, प्रतापसिंहामुळें जव्हारसिंगाच्या सैन्याची परत येतांना फार खराबी झाली. ह्या वेळेस त्यानें राजगड किल्ला बांधून पुढें येणार्या बालराजाच्या वेळीं पुष्कळ प्रांत मिळविला. दुसर्या शाहअलमला मदत केल्याबद्दल त्याला माचेरीची सनद मिळाली. पुढें अलवारच्या सैन्याला पगार मिळत नसल्यामुळें व एकंदर जाटांच्या झालेल्या नुकसानीमुळें त्यांचा धीर खचून तो किल्ला जाटानें प्रतापसिंहाच्या ताब्यांत दिला. तेव्हांपासून त्याचे नरूका जातीचे लोक त्याला राजा मानूं लागले. त्याच्या मागून बखतावरसिंग गादीवंर आला. त्यानें आपला मुलूख आणखी वाढविला. मराठ्यांशी झालेल्या लढायांत तो इंग्लिशांच्या बाजूनें लासवारीच्या लढाईंत हजर होता. बखतावरच्या मरणानंतर १८१५ त गादीबद्दल तंटा सुरू झाला. बखत्यारच्या मनांत आपला पुतण्या बन्निसिंग यास दत्तक घेऊन त्याला गादीचा मालक करावा असें होतें. परंतु दत्तविधान होण्यापूर्वीच तो वारला. दुसरा वारस राखीपुत्र बलवंतसिंह हा होता इंग्रजांनीं अशी युक्ती काढली कीं बन्निसिंगानें राजा ही पदवी धारण करावी पण सर्व अधिकार बळवंतसिंगाच्या हातांत असावा. पण ही व्यवस्था कधीच अमलांत आली नाहीं. इ. स. १८२४ मध्ये बन्निसिंगानें अधिकारसूत्रें आपल्या हातांत घेतली व आपल्या भावाला तुरूंगांत टाकलें. व त्याचा साह्यकर्ता अहमदबक्ष याचा जीव घेण्याचा प्रयत्न केला. इंग्लिशांनीं मध्यें पडून बन्निसिंगाला बलवंतसिंगाला अर्धा मुलुख व अर्धी दौलत : वंशपरंपरा देण्यास लावलें. पण तें सर्व बन्नीसिंगाकडे परत आलें. यानें आपल्या राज्यांत पुष्कळ सुधारणा घडवून आणली. बेबंदशाही मोडून शांतता स्थापन केली. जमिनीचा वसूल पैशांत घेण्याचें सुरू केलें. इ. स. १८५७ च्या बंडांत त्यानें इग्लिशांना चांगली मदत करून आपली राजनिष्ठा चांगली प्रत्ययास आणली बन्निसिंगाच्या मागून त्याचा मुलगा शिवदानसिंग लहान असल्यामुळें मुसुलमानी प्रधानाच्या तंत्रानें वागूं लागला तेव्हां रजपुतांनीं १८५८ मध्यें बंड केलें. तेव्हां मुखत्यार नेमून इ. स. १८६३ मध्यें त्याला गादीवर बसविलें.
परंतु त्याच्या कित्येक कृत्यांनीं राज्यांत बंडाळी सुरू झाली तेव्हां इंग्लिशांनां पुन्हां कारभारांत हात घालावा लागला. शिवदानसिंगाच्या हातून कारभार काढून घेऊन एक व्यवस्थापक मंडळ नेमण्यांत आलें. शिवदानसिंग इ. स. १८७४ मध्यें औरस किंवा दत्तक वारस मागें न ठेवतां मरण पावला. तेव्हां सर्व राज्य इग्लिशांच्या हातांत गेलें पण त्यांनीं राजघराण्याच्या दुसर्या शाखेंतून गादीला मालक निवडण्याचा अधिकार नरूक लोकांना दिला व त्या प्रमाणें त्यांनीं ठाण्याच्या ठाकूर मंडळसिंगला पसंत केलें व सरकारनें त्याला अलवारचा राजा मान्य केलें. हा इ. स. १८९२ मध्यें मरण पावला. त्याच्या मागून त्याचा एकुलता एक मुलगा जयसिंग यास इ. स. १९०३ मध्यें तो वयांत आल्यावर अधिकार देण्यांत आला. अलवारच्या राजांना १५ तोफांच्या सलामीचा मान आहे.
या संस्थानांत एकंदर खेडीं व शहरें मिळून १७६२ आहेत व लोकसंख्या इ. स. १९२१ मध्यें ७,०१,१५४ होती.
संस्थानचे १२ तहशिली व १ जाहगीर मिळून तेरा भाग आहेत व त्यांत ७ मोठीं शहरें असून तेथें म्युनिसिपालिट्या आहेत. त्यांत मुख्य अलवार व राजगड या होत. इ.स. १९०१ मध्यें हिंदूंची संख्या शेंकडा ७४ पेक्षां जास्त म्हणजे ६,१८३७८ असून त्यांतील बहुतेक वैष्णव पंथाचे होते. मुसुलमानांची संख्या २०४९४७ म्हणजे शेकडा २४ होती. बहुतेक लोक सुनीपंथाचे होते. जैनांची संख्या ४९१९ होती. १९११ सालीं दर दहा हजारी ७४३० हिंदु २५१५ मुसलमान व ५१ जैन होते. येथील मुख्य भाषा हिंदी व मेवाटी आहेत.
मेउलोकांची संख्या जास्त म्हणजे शेंकडा १३ अथवा एकंदर ११३००० आहे. हे मुसुलमानी धर्माचे असून त्यांचा मुख्य धंदा शेतकी आहे. ह्यांच्या बायकांची ह्यांनां शेतकीच्या कामांत फार मदत होते. त्यांच्यांत पडदा मानीत नाहींत. दुसरे लोक म्हणजे चांभार हे शेतकी, कातडी कमावणें, व दुसरी मोलमजुरीची कामें करणारे आहेत. ब्राह्मण लोक गौड सारस्वत किंवा कनोज वर्गातील आहेत. मिनाजातीचे दोन वर्ग आहेत. एक जमीनदार व दुसरा चौकीदार. या दुसर्या वर्गांतील लोक पूर्वी लुटारू असून आतां ते चांगल्या मार्गाला लागले आहेत, तरी त्यांचे पूर्वीचे गुण कधी कधी उचल खातातच. तसेच जाट, राजपुत, गुजर व महाजन वस्ती पुष्कळ आहे.
जमीन तीन प्रकारची आहे ( १ ) चिकनाट, ( २ ) मट्टियार व ( ३ ) भुर. या ठिकाणीं मुख्यत्वेकरून बाजरी, जवार, हरबरा, कापूस, गहूं, मका, तीळ कमीजास्त प्रमाणांत होतो. त्याचप्रमाणें कांहीं थोड्या जागीं तमाखु, ऊंस, नीळ, भात व अफू होते. अलबारचीं जनावरें विशेष चांगली नसतात. मेंढ्या व बकरी यांची निपज पुष्कळ होते.
इ. स. १९०३-४ साली एकंदर २१२ चौरस मैल जमीन लागवडीस आली. तीतील शेकडा १५ मैलच पाटाच्या पाण्यावर केली होती. एकंदर विहिरीची संख्या खालसा मुलखांत १५००० असून १७५ बंधारे आहेत. पिकें मोटेच्या पाण्यावर करतात.
सुमारें ३६७ चौरस मैल जमीन जंगल आहे व ती संयुक्तप्रांत सरकारनें नेमलेल्या एका अमलदाराच्या व्यवस्थेखालीं आहे. झाडांच्या उत्पत्तीच्या दृष्टीनें ह्याचे चार भाग केलेले आहेत. डोंगर माथा व उतरणी हा एक भाग होय. ह्यांत सालर व बांबूची लहान जात विशेष आढळून येते तसेंच उम, धामण, गोल वगैरे झाडेंहि दृष्टीस पडतात. दुसरा भाग म्हणजे डोंगरपायथ्यापर्येत. तिसरा भाग सपाट प्रदेश; ह्यांत धाक व खैर हीं झाडे आढळतात. व चवथ्या भागांत जामुन, करमाल, बेहडा वगैरे रूंद पानांचीं व छाया देणारी झाडें आहेत. येथें बांबूचें उत्पन्न विशेष आहे. संस्थानाच्या उपयोगाकरितां सुमारें २०००० बांबू लागतात बाकींच्या पासून दरवर्षी जवळ जवळ रू. २००० मिळकत होते. शिवाय गवताचें उत्पन्नहि दांडगें आहे संस्थानची भरती झाली म्हणजे रयतेची गुरें चरण्याला मोकळीक असते. येथील डोंगरामध्यें तांबें, लोखंड व शिसें पुष्कळ सांपडण्याजोगें आहे पण खाणी कोणी चालवीत नाहीं. तसाच उत्तम संगमरवरी दगड येथें मिळतो व तो मूर्ति करण्यास लागणार्या, हिंदुस्थानांत सांपडणार्या दगडापेक्षां कोणच्याहि तर्हेनें कमी दर्जाचा नसतो.
येथें तयार होणार्या मालांत विणलेल्या कापडास प्राधान्य आहे. तिजार येथें कागद तयार होतो. जमिनींतून काढलेल्या क्षारापासून हलक्या दर्जाची कांच होते, तिचा उपयोग बांगड्या व कुप्या करण्याकडे होतो. दगडाचें कोरींव काम करणारे लोकहि आहेत. ते दगडाच्या मूर्ती, पेले, जाळीचे पडदे वगैरे करतात. येथें एक निळीचा कारखाना आहे.
येथून बाहेर जाणारा माल म्हटला म्हणजे कापूस, गळिताची धान्यें, बाजरी, तूप, गांवठी कापड, डोक्याचे रूमाल व जोडे हे होत, व बाहेरून आंत येणारा माल साखर, मीठ, गहूं, चणा, लोखंड व स्वयंपाकाचीं भांडीं हे आहेत. मालाची सर्व नेआण राजपुताना-माळवा रेल्वेनें होते.
ह्या संस्थानांत २८ टपाल ऑफिसें आहेत. रेल्वेस्टेशनच्या तार ऑफिसाशिवाय राजधानीच्या शहरीं ब्रिटिश तार ऑफीस आहे.
ह्या भागांत दुष्काळ फारसे पडत नाहीत. इ. स. १८६० मध्यें दुष्काळ पडला होता, त्यावेलेस धारण ८ शेरांची होती. त्यानंतर इ. स. १८६८-६९ हें वर्ष दुष्काळाचेंच होतें. त्या वर्षी चारार्या टंचाईमुळें पुष्कळ गुरें मेलीं व अशा तर्हेनें मनुष्यांच्यापेक्षां गुरांनांच तो दुष्काळ जास्त जाचला. त्यानंतर इ. स. १८७७ मध्यें अगदीच पाऊस न पडल्यामुळें दुष्काळ पडला. त्यावेळेस दुष्काळपीडित लोकांच्याकरतां संस्थाननें कामें सुरू केली होती. तसेंच शेतकर्यांनां आउताचीं जनावरें व विहिरीची डागडुजी करण्याकरितां ३ लक्ष रूपये देण्यांत आले.
इ. स. १९०३ साली राज्यसूत्रें महाराजांच्यां हातांत गेल्यापासून, तीन मंत्री व इतर खात्यांतील मुख्य माणसांच्या सल्ल्यानें राज्यकारभार चालत आहे. जमीन वसुलाकरितां राज्याचे दोन भाग केले आहेत व त्यांवर एकेक डेप्युटि कलेक्टर नेमला आहे. राज्यांत एकंदर १८ तहशिली असून प्रत्येकीवर एक एक तहशीलदार नेमला आहे.
येथील न्यायकचेरींत खालसा मुलुखांत चालणारा कायदाच अनुसरला जातो. तहशील, फौजदारी, प्रांत व सेशन्स कचेरी अशा एकावर एक वरचढ कचेर्या आहेत.
संस्थानचें उत्पन्न जवळजवळ ३२ लाख आहे व खर्चहि तितकाच आहे. उत्पन्नाच्या मुख्य बाबी जमीनमहसूल, ब्रिटिश तिजोरीत ठेवलेल्या ठेवींचें व्याज, मीठ काढण्यास दिलेल्या परवान्यापासून होणारे व जंगलचें उत्पन्न ह्या आहेत. खर्चाच्या बाबी:- सैन्यखर्च ८ लाख. सरकारी नोकरांचे पगार ४.३,; सरकारी हत्ती घोडे वगैरेकडे २.८ रू.
पैशाच्या दृष्टीनें संस्थानची भरभराट असून ब्रिटिश प्रामिसरी नोटांत ४५ लाख रूपये आहेत. जमीनधार्याच्या पध्दती चार प्रकारच्या आहेत त्या अशा:- ( १ ) खालसा म्हणजे जमीनदार परस्पर सरकारला सारा देतो. ( २ ) इस्तिम्रारी, ह्या सर्व रजपुतांच्या ताब्यांत असून त्यांचा सारा एकदाच ठरविलेला आहे. ( ३ ) जहागीर, ह्या जमिनी उपभोगण्याबद्दल पागा ठेवून सरकारच्या सैन्यांत जावें लागतें. ह्याचाच एक भेद वारदारी हा आहे. ( ४ ) मुआफी आपल्याकडील बलुत्याप्रमाणें आहेत. जमिनीवर जोपर्यंत जमीनदार शेतसारा देतो तोपर्यंत त्याची मालकी समजली जाते. व तशा प्रकारचे कायदे तिकडे आहेत. पंजाबच्या दक्षिण भागांतील व येथील पध्दत एकाच प्रकारची आहे. इ. स. १८३८ पर्येत सारा जिनसांच्या रूपानें देतां येत असे. सध्यां पैसेच द्यावे लागतात.
संस्थानचे ६०० घोडेस्वार व १००० पायदळ एवढें सैन्य असून तात्पुरतें तयार होणारें सैन्य ६८ घोडेस्वार, ५५१ पायदळ व ११३ गोलंदाज आहेत. तोफांची संख्या २७२ आहे. इ. स. १९००-०१ मध्यें चीन देशाशीं झालेल्या युध्दांत येथील पायदळानें चांगली कामगिरी केली.
पोलीसचा भरणा ९४२ असून त्यांच्या प्रीत्यर्थ खर्च १.१ लक्ष होतो. राजधानीच्या ठिकाणीं एक तुरूंग आहे.
राजपुतान्यांतील संस्थानांमध्यें अलवारचा नंबर १२ वा लागतो. लिहितांवाचतां येणार्या लोकांचें प्रमाण शेंकडा २.७ आहे. येथील शाळांची संख्या १०३ असून त्यांत ५५०७ मुलें मुली इ. स. १९०४ सालीं शिकत होत्या. शिक्षणाप्रीत्यर्थ ६५००० रू. खर्च होतात. ह्या संस्थानांत १२ इस्पितळें आहेत. इ. स. १८७० च्या सुमारास देवी काढण्याचा उपक्रम करण्यांत आला व बहुतेक लोक आपखुषीनें देवी टोंचून घेतात. ( इं. गॅ. ऑफ इंडिया पु. ५ )
शहर. - अलवार संस्थानची राजधानी. दिल्लीच्या नैऋत्येस ९८ मैलांवर राजपुताना- माळवा रेल्वेचें हें स्टेशन आहे. २७० ३४’ उत्तर अक्षांश. व ७६० ३६’ पूर्व रेखांश. एक्क्याखेरीज गांवांत जाण्यास कोणतेंच वाहन नाहीं पण स्टेटकौन्सिलच्या सेक्रेटरीस लिहिलें असतां संस्थानी वाहनें व इतर सर्व सोयी मिळतात. याचें पूर्वीचें नांव अलपूर ( ‘मजबुत शहर’ ) असें होतें असें कोणी म्हणतात. कोणी अरबलपुर किंवा अरवली शहर ( अरवली पर्वतापासून निघालेलें नांव ) हें नांव असावें असें म्हणतात. जनरल कनिंगह्याम असें म्हणतो कीं ‘सालवा” जातीच्या नांवापासून सालवा पुरा-सालवार-हलवार व नंतर अलवार असें नांव पडलें असावें. लोकसंख्या (१९२१ साली) ४४७६० होती.
प्रेक्षणीय इमारती.-एकोणीसाव्या शतकाच्या पूर्वार्धांत महाराव राजा बन्निसिंग यानें बांधलेला राजवाडा व महाराव राजा बखतावर सिंग याची छत्री या होत. तरंग सुलतानच्या स्मरणार्थ इ. स. १३९३ सालीं बांधलेलें जुनें थडगें असून येथील कांहीं जुन्या मशीदीवर शिलालेख आहेत. रेल्वे स्टेशनजवळ फत्तेजंग याचें थडगें आहे. परंतु इ. स. १५४७ मधील नागरी लिपींत लिहिलेल्या त्यावरील शिलालेखाबरून ही इमारत पूर्वी हिंदूंची असावी हें स्पष्ट होतें.
येथें म्युनसिपालिटी इ. स. १८७१-८२ पासून आहे. तिचें सालीना उत्पन्न ६०००० रूपये व खर्च ५३००० रूपये आहे. शहराच्या नैऋत्येस सुमारें ६ मैलांवर सिलिसेर नांवाचा तलाव इ. स. १८४४ मध्यें महाराव राजा बन्निसिंग यानें बांधलेला आहे. यांतील पाणी दोन कालवे खणून शहरांत आणलें असून त्याचा उपयोग सरकारी व खाजगी बागांनां पाणी पुरविण्याकडे होतो. गांवांत लेडी डफरिन हास्पिटल, अलवार हायस्कूल व मिशनरी संस्था आहेत. कापड विणणें व पगड्या रंगविणें हे दोन मुख्य धंदे दिसतात. मिठापासून कांच तयार करून त्याच्या बांगड्या व बाटल्या तयार करण्यांत येतात. दगडी नक्षीकामहि येथें होतें. निर्गत माल म्हणजे सूत, तेलाचें बीं पगड्या व जोडे; व आयात मालांत साखर, तांदूळ, मीठ, गहूं, बार्ली, लोखंड वगैरे जिन्नस येतात. अलवार स्टेट बर्कशाप व एक बर्फाची फॅक्टरीं असे दोन कराखाने येथें आहेत. ( इ. गॅ. ५-१९०८; अर्नोल्ड डिरेक्टरी ).