विभाग- सातवा : अर्थशास्त्र–आफ्रिका
अलसानी पेदन्ना - हा तेलगू कवि नंदवडीक नियोगी ब्राह्मण होता. याच्या बापाचें नांव चोकन्ना. याचा जन्म बेलारी प्रांतांतील दुपाड तालुक्यांतील दोरनाला नामक खेड्यामध्यें झाला. यानें लहानपणीं संस्कृत आणि तेलगू भाषेचा अभ्यास करून त्या दोन्हीं भाषांचें उत्कृष्ट ज्ञान संपादन केलें, आणि लवकरच ह्या दोन्ही भाषांत तो काव्यें करूं लागला. पुढें थोडक्याच काळांत हा कृष्णदेवरायलू याचा बाप जो नरसिंह रायलू त्याच्या दरबारामध्यें कवि या नात्यानें राहिला. नरसिंह रायलू याच्या मरणानंतर कृष्णदेव रायलू हा गादीवर बसला. तेव्हां त्यानें ह्या कवीस आपल्या दरबारांतील “अष्ट दिग्गजां” पैकीं एक नेमिलें. पेदन्ना याचें तेलगू काव्य त्यांतील माधुर्यामुळें फार लोकप्रिय झालें.
“स्वारोचिषमनुचरित्र” हें काव्य त्यानें मोठ्या श्रमानें रचिलें. या काव्याच्या प्रस्तावनेंत कृष्णदेवरायानें मुसलमानांवर जो जय मिळविला, त्यासंबंधीं रायाच्या पराक्रमाचें वर्णन आहे. मनुचरित्राखेरीज पेदन्नाचा रामस्त व राजमनामक रामाच्या स्तुतीनें भरलेला एक ग्रंथ आहे, असे मि.कावेल्ली व्यंकट रामस्वामी यांनीं आपल्या दक्षिणेंतील कविचरित्रामध्यें म्हटलें आहे. परंतु त्या संबंधी दुसरा कोठेंहि उल्लेख आढळत नाहीं. सदर कावेल्ली व्यंकटरामस्वामी “अद्वै तसिध्दांतम्” नांवाचा तत्वज्ञानविषयक ग्रंथहि पेदन्नानेंच लिहिला असें म्हणतात. पेदन्नानें हरिकथासार काव्य लिहिल्याबद्दलहि ते लिहितात व त्यासंबंधीं पेदन्नाचा छंद:शास्त्रावरील जो “रंगरा छंद” ग्रंथ आहे, त्यांत उल्लेख सांपडतो. याप्रमाणें एकंदर पेदन्नाचे ग्रंथ आहेत. पेदन्नाचीं काव्यें अति मधुर असल्यामुळें तीं सर्वत्रांस आवडतात. एके दिवशीं पेदन्नानें आपला आश्रयदाता जो महापराक्रमी कृष्णदेव रायलू याच्या विनंतीवरून एक श्लोक म्हणून दाखविला त्यामध्यें त्यानें आपलें संस्कृत आणि तेलगू भाषेचें अप्रतिम ज्ञान दाखवून दरबारांतील सर्व कविमंडळीस थक्क करून सोडिलें. संस्कृतांतील काव्यांच्या भाषांतराखेरीज त्या काल, पावेतों कोणी स्वतंत्र असें काव्य लिहिलें नव्हतें व त्यावेळेस पेदन्ना यानेंच स्वतंत्र असें काव्य “स्वारोचिषमनुचरित्र” हें लिहिलें. त्यामुळें त्याला सर्व विद्वानांनीं व स्वत:कृष्णदेव रायलूनें आंध्रकवितापितामहलू हीं पदवी दिली. मनुचरित्राचें रंगांधिरोहण झाल्यानंतर कवीस पालखींत बसवून गांवांत मिरविलें, त्यावेळीं प्रथमत: पालखी उचलतांना राजानें स्वत:खांदा दिला असें म्हणतात. एकदां सभेंत यानें राजाच्या सांगण्यावरून बत्तीस चरणांची कविता कशी असावी या विषयावर एक उत्पलमालिका एकदम रचिली. या उत्पलमालिकेंत अशी खुबी आहे कीं तिच्या बत्तीस चरणांपैकीं प्रत्येक चरणाचें प्रथमाक्षर व द्वितीयाक्षर एकच आहे. शिवाय अर्धी मालिका केवळ संस्कृतप्रमाणें व अर्धी केवळ तेलगूप्रमाणें दिसते. यावर खूष होऊन रायान त्याच्या पायांत आपल्या हातानें सोन्याच्या तोडा अडकविला.
पेदन्ना यानेंच प्रथमत: मुसुलमानी शब्द तेलगू भाषेंत मिसळण्याच्या प्रयत्न केला व त्यांचेंच अनुकरण त्याच्या मागून झालेल्या त्याच्या व्यवसायबंधूंनीं केलें. कृष्णदेवराय हा शके १४४६ मध्यें मरण पावला, त्यावेळेस त्याच्या संबंधानें पेदन्नानें जे दु:खोद्गार काव्यरूपानें काढिले ते अप्रतिम होत. त्यांमध्यें कवीनें करूणरसाची कमाल केली आहे. पेदन्नानें रायाचे जे सहस्त्रावधि गुणानुवाद गाइले ते त्याजवर केवळ रायानें केलेल्या अपरिमित उपकारांबद्दल नसून कृष्णरायानें तेलगू वाङ्मयावर, तेलगू कविमंडळावर आणि तेलगु देशावर जे अपरिमित उपकार केले त्यांबद्दल आहेत.
कृष्णदेवरायाच्या मागून त्याचा जावई रामराजा गादीवर बसला त्याची या कवीविषयीं मोठी पुज्यबुध्दि होती. हा कवि आपल्या मर्जीस येईल तेव्हांच कविता म्हणत असे. राजाच्या सांगण्यावरून तो कधींहि म्हणत नसे. ह्याला त्या वेळेस एखाद्या मांडलिक राजाप्रमाणें लेखीत असत. देवरायानें याला पुष्कळ अग्रहार दिला होता. पैकीं कोकाट गांव हें मुख्य होय. हा जन्मत: जरी स्मार्त होता, तरी अद्वैतमतावादी होता. हा कवि आपला आश्रयदाता मरण पावल्याननंतर फार दिवस पावेतों जगला नाहीं. लवकरच इ. स. १५३५ सालामध्यें आपली जन्मभूमी जी दोरनाला तेथें हा मरण पावला. ह्या कवीचीं काव्यें जेथें म्हणून तेलगू भाषा बोलतात व जाणतात त्या सर्व ठिकाणीं आढळतात. अलसानीं पेदन्ना यास तो जिवंत असतांनां जितका मान मिळाला तितका दुसर्या कोणत्याहि तेलगू कवीस अजून पावेतों मिळाला नाहीं [ तेलगू वाङ्मय-शं. सा. परशाकृत ].