विभाग- सातवा : अर्थशास्त्र–आफ्रिका
अलीगंज, त ह शी ल - ( संयुक्तप्रांत, ) इटा जिल्ह्यांतील पूर्वेकडील तहशील. हींत अझमनगर, बर्ना, पतियाळी आणि निधपुर हे परगणे आहेत. क्षेत्रफळ ५२९ चौरस मैल. उ. अ. २७० १९’ ते २७० ५४’. पू. रे. ७८० ५२’ ते ७९० १७’ लोकसंख्या (१९११) २२६३०१. हींत ५ शहरे व ४०८ खेडीं आहेत. पैकीं अलीगंज हें तहशिलीचें ठिकाण आहे. इ. १९०३-४ सालीं जमीन उत्पन्न २११००० रू. इतर कर ३८००० रू. नव्या पाहणींत जमीनीचें उत्पन्न २२९००० रू. झालें आहे. उत्तरेस गंगा नदी व दक्षिणेस काळी नदी आहे. येथें पाऊस फार पडत असल्यामुळें जमिनीचें फार नुकसान होतें. १८९८-९९ सालीं लागवडीखालीं एकंदर क्षेत्र २८७ चौरस मैल होतें, त्यापैकीं पाण्याखालीं ८५ चौ. मैल होतें. दक्षिण गंगा (लोअर गँजेस) कालव्याची फत्तेपूर शाखा या तहशिलींतून जाते. विहिरीच्या पाण्यावर एकंदर दोनतृतीयांश जमीन भिजते.
गां व.- (संयुक्त प्रांत.) वरील तहशिलीचें मुख्य ठिकाण. उत्तर. अ. २७० २९’ व पूर्व. रेखांश. ७९० ११’. लोकसंख्या (१९११) ६४३२. इटा गांवाच्या पूर्वेस ३४ मैलांवर हा गांव आहे. फरूकाबादच्या नबाबाच्या तैनातींतील एका खोजानें हा गांव बसविला. हा नबाब येथेंच रोहिल्याशीं चाललेल्या लढाईंत सन १७४८ सालीं मरण पावला. त्याचें थडगें येथेंच आहे. बहुतेक दुकानें मातीचीं बांधलेलीं आहेत. येथून धान्य व कापूस जमा करून ९ मैलांवरच्या ठाणादर्यागंज स्टेशनावर परगांवीं धाडण्याकरितां चढविण्यांत येतो. (इं. गॅ. ५-१९०८).