विभाग- सातवा : अर्थशास्त्र–आफ्रिका
अलीपुरा - ( मध्यहिंदुस्थान ) बुंदेलखंड एजन्सीतील एक लहानसें सनदी संस्थान. क्षेत्रफळ ७३ चौरस मैल. हा गांव उत्तर अक्षांस २५० १०’ व पू. रेखांश ७९ २१’ यावर जी. आय. पी. रेलवेच्या झांशी-माणिकपुर शाखेच्या हरमालपुर स्टेशनपासून ९ मैलांवर आहे. येथें जहागिरदाराचा वाडा आहे.
उत्तरेस, दक्षिणेस व पूर्वेस संयुक्त प्रांताचा हमीरपूर जिल्हा व पश्चिमेस गरोली जहागीर. संस्थानिक रजपूत असून तो अग्निकुलापैकीं परिहार वंशाचा आहे असा समज आहे. इ. स. १७०८ सालीं कोणा गरीब दासानें पन्नाच्या संस्थानिकाची नोकरी धरली. त्याचा नातू अचलसिंग यास सन १७५७ सालीं पन्नाचा राजा हिंदुपत याचकडून हा भाग मिळाला. ज्यावेळीं बांदाच्या अलिबहादरानें बुंदेलखंड घेतलें त्या वेळीं त्यानें प्रतापसिंगास त्याच्या जहागिरीवर त्या वेळीं त्यानें प्रतापसिंगास त्याच्या जहागिरीवर कायम केलें. सन १८०८ सालीं ब्रिटिश सरकारनें देखील त्याचा हक्क शाबीत धरून त्यास सनद दिली. प्रतापसिंगास चार मुलें होतीं. सन १८३५ सालीं वडील मुलाकडे सर्व कारभार आल्यावर त्यानें जहागिरीचे चार वाटे केले; यामुळें बखेडे उत्पन्न झाले. या वांटणीची खबर ब्रिटिश सरकारास न दिल्यामुळें ब्रिटिश सरकारनें ही वांटणी रद्द केली. सन १८५७ सालीं हें घराणें ब्रिटिशांशीं राजनिष्ठ असल्यामुळें ५००० रूपयांची खिलात यास मिळाली. दत्तक घेण्याची सनद सन १८६२ सालीं मिळाली. छत्रपति सिंग हा १८७१ सालीं मालक झाला. हा दत्तकपुत्र आहे. इ. स. १८७७ मध्यें यास रावबहादुर, १८८७ मध्यें सी. एस. आय. आणि सन १९०३ मध्यें राजा हे किताब मिळाले. या जहागिरदारास राव हा वंशपरंपरेचा किताब आहे. १९११ सालीं लोकसंख्या १६१४६ होती. तीपैकीं १५१०३ हिंदु होते. एकंदर खेडीं २७.
लागवडीखालीं १८ चौरस मैल जमीन जंगल १० चौरस मैल व लागवडीलायक १५ चौ. मैल जमीन होती. जहागिरदार सर्व कारभार पहातो. फांशी, काळेपाणी इत्यादि जबर शिक्षा देण्यालायक मोठे खटले पोलिटिकल एजंट चालवितो. जहागीरदारास तो अधिकार नाहीं. एकंदर उत्पन्न ३०००० रूपये. (इं. गॅ. ५-१९०८).