विभाग- सातवा : अर्थशास्त्र–आफ्रिका
अलीबहादूर - हा बाजीरावाचा पुत्र समशेर बहादर यास त्याची बायको मेहरबाई हिच्या पोटीं झालेला मुलगा. यासच कृष्णसिंग असेंहि नाव होतें. याचा जन्म १७५८ त झाला असें रियासतकार म्हणतात; पण भारत-इतिहास-संशोधक-मंडळाच्या अष्टम संमेलनप्रसंगीं ‘मस्तानीची वस्तवानी’ म्हणून जो निबंध वाचण्यांत आला त्यांत याचा जन्म १७६० सालीं समशेर बहादूर निजामावरील मोहीमवर जात असतां झाला असें म्हटलें आहे तो बापापेक्षांहि शूर व पराक्रमी निघाला. महादजी शिंदे उत्तर हिंदुस्थानांत प्रबल झाला तेव्हां त्यास शह देण्याकरितां नाना फडणिसानें स. १७८८ सालीं महादजीस मदत करण्याच्या भिषानें अलीबहादरास फौज देऊन तिकडे पाठविलें. त्यानें तेथें (बुंदेलखंडांत) पराक्रम करून पाऊणकोटीचा मुलूख काबीज केला. त्या वेळचीं त्यांचीं पत्रें स. १७८८ पासून १७९० चीं इतिहाससंग्रहांत छापिलीं आहेत (मराठी रियासत, मध्यविभाग पृ. ४३७-३८). गुलाम कादरच्या छळापासून बादशहाची मुक्तता करण्याकरितां इ. स. १७८८ सालीं राणेखान दिल्लीस गेला तेव्हां अलीबहादर हा त्याजबरोबर होता ग्रांटडफ) त्याच वर्षी हिंमतबहाद्दर नांवाच्या गोसावी लष्करी अधिकार्यास शिंद्यांचे शिपाई कैद करून नेत असतां तो पळून अलीबहादराकडे आला तेव्हां यानें त्यास आश्रय दिला व महादजीनें त्याला आपल्या स्वाधीन करण्याविषयीं यास म्हटलें असतां, नाना फडणिसाकडून तसा हुकूम आल्याशिवाय मला हिंमतबहादरास तुमच्या हातीं देतां येत नाहीं अशी कांहीं तरी सबब सांगून यानें त्याचा बचाव केला; व नाना फडणिसांकडून हिंमतबहादरासंबंधीं कांहीं पत्र येऊन पोंचण्यापूर्वीच यानें हिंमतबहादरास गुप्तपणें सोडूनहि दिलें. (कित्ता, पृ. ३४). सन १७९२ सालीं हिंमतबहादरानें अलीबहादराच्या मनांत बुंदेलखंड काबीज करण्याची गोष्ट भरविल्यावरून त्या दोघांनीं मिळून तें काम हातीं घेतलें. बर्याच प्रयासाअंतीं त्यांनीं एकदांचें त्या प्रांतीं आपलें ठाणें दिलें. परंतु त्यांनां शेजारच्या राजांशीं लढण्याचें व जिंकलेल्या मुलुखांतील बंडें मोडण्याचेंच काम कित्येक दिवसपर्यंत अव्याहत करावें लागलें (कित्ता पृ. ७५). अलीबहादरानें बुंदेलखंडांत मिळविलेल्या मुलुखांपैकीं कांहीं तर पूर्वीपासूनच पेशव्याचा होता. व कांहीं यानें नवीन मिळविला होता. नवीन मिळविलेल्या मुलुखास हा स्वत:ची जहागीर म्हणावीत असून पेशव्याची सार्वभौम सत्ता त्याला मान्य होती [ कित्ता पृ. २३५-३६ ]. नाना फडणिसाच्या परवानगीनें त्यानें सागरच्या ईशान्येस बांदा येथें आपलें वास्तव्य केलें; आणि पुण्याहून लोक नेऊन तेथें अठरा कारखाने स्थापिले. गोरे नांवाचा एक इसम त्यानें तेथें आपल्या दिवाणगिरीवर नेमला होता. त्याच्या घराण्याचे वंशज हल्लीं बांदा येथें आहेत. अशा रीतीनें बांद्याची जहागीर नाना फडणिसाच्या वेळेस स. १७८८ त उत्पन्न झाली. कलिंजर किल्ला घेत असतां अलीबहादर स. १८०२ सालीं मारला गेला. त्याची स्त्री बादशहा बेगम लहानपणींच वारली. तिच्याशिवाय दुलज बेगम व बक्षी बेगम अशा आणखी दोन बायका त्यानें केल्या होत्या. त्यांपैकी दुलज बेगमचा मुलगा समशेरबहादर व बक्षीबेगमचा झुल्पिकारअली [ मराठी रियासत, मध्यविभाग. पृ. ४३७-३८. ] यांशिवाय रहिमतबिबी नांवाची अलीबहादरची एक रक्षा होती. (भा. व. पु. २, मस्तानीचा वंश).