विभाग- सातवा : अर्थशास्त्र–आफ्रिका
अलीबाग तालुका - ( मुंबई इलाखा. ) कुलाबा जिल्ह्याच्या वायव्येकडील तालुका. उ. अ. १८० २९’ आणि १८० ३९’ व पू. रे. ७२० ५१’ आणि ७३० ५’. क्षेत्रफळ १९३ चौरस मैल. या तालुक्यांत ३ गांवें व १७७ खेडीं आहेत. मुख्य ठिकाण अलीबाग. लोकसंख्या (१९११ सालीं) ८०८६२ जमीन महसूल उत्पन्न १९०३-४ सालीं २.५२ लाख व इतर कर १७००० रूपये होतो.
या तालुक्यांत खारी जमीन पुष्कळ असून येथें उष्णतामान इतर तालुक्यांतील जागांच्या मानानें बरेंच असतें.
गांव.- (मुंबई इलाखा;) हें कुलाबा जिल्ह्याचें मुख्य ठिकाण असून समुद्रकाठीं मुंबईच्या दक्षिणेस एकोणीस मैलांवर आहे. उ. अ. १८० व ३९’ पू. रे. ७२० ५३’. लोकसंख्या (१९२१) ५२५३.
इतिहास. - १७व्या शतकांत अली नांवाच्या श्रीमान मुसुलमानानें येथें पुष्कळ विहिरी व बागा तयार केल्या त्यांपैकीं कांहीं अद्यापि अस्तित्वांत आहेत. त्याचें नांव या गांवास मिळालें आहे सतराव्या शतकाच्या अखेरीस या बागेच्या जागीं आग्रथांनीं गांव वसवून तें आपलें मुख्य ठाणें बनविलें. त्यामुळें आंग्रयांच्या भरभराटीच्या वेळीं या गांवाला विशेष महत्त्व होते. पुढें १८४० पासून अलीबाग हें कुलाबा जिल्ह्याचें मुख्य ठिकाण बनलें. अलीबागच्या वायव्येस हिराकोट नांवाची किल्लेवजा मोठीं इमारत आहे, ती कान्होजी आंग्रे यानें १७२० मध्यें बांधली असें म्हणतात. अलीबागचा किल्ला किनार्यापासून सुमारें एक फर्लांग आंत समुद्रांत आहे. हा पूर्वी मराठ्यांचे सरदार आंग्रे यांच्याकडे होता. किल्ल्याच्या नैऋत्येस दोन मैलांवर एक अदमासें साठ फूट उंचीचा दगडी मनोरा गलबतांनां इशारत देण्याकरतां उभारलेला आहे. त्याठिकाणीं असलेली उथळ खडकाळ जागा समुद्रास भरती आली असतांना दिसत नाहीं. याठिकाणीं पुष्कळ गलबतें दगावलीं आहेत. दीड मैलावर एक तलाव तयार करून तेथून पाणी आणलें आहे. पूर्वेस सागरगड किल्ला व कनकेश्वर हें उंच डोंगरावरचें देवस्थान आहे. दक्षिणेस चौल गांवाकडील टेकड्यांत अनेक बोध्द लेणीं आहेत. येथील नारळीच्या व कलमी आंब्याच्या बागा प्रसिध्द आहेत. येथें व्यापार बराच चालतो. येथील म्युनसिपालिटीची स्थापना सन १८६४. त झाली. तिचें उत्पन्न (१९०३-०४) -११००० रू. मुंबई वेधशाळेची लोहचुंबक शाखा येथें आणली आहे. येथें जिल्ह्याच्या, तालुक्याच्या कचेर्या, हायस्कूल वगैरे आहेत. मे महिन्यांत येथील सर्वांत अधिक उष्णतामान ९५.२ डिग्रीपर्यंत चढतें, व हिवाळ्यांत ८०.० पर्यंत उतरतें. समुद्रकांठीं अगदीं मोकळ्या हवेंत हा गांव असल्यामुळें येथील हवापाणी जिल्ह्यांतील इतर सर्व ठिकाणापेक्षां अधिक चांगलें आहे. गोड्या पाण्याकरितां दी रायल अलिबाग वॉटर वर्क्स या नांवाचा नदीस धरण बांधून तलाव केला आहे. या कामाकरितां भाऊसाहेब (धुंडिराज विनायक) बिबलकर यांनीं २०००० रूपयांची देणगी दिली होती.
किल्ला.- हा अलीबागचा ( कुलाबा ) किल्ला शिवाजीच्या किल्ल्यांपैकीं एक होता, पण त्याला महत्त्व आंग्रयांच्या वेळीं विशेष आलें. त्याची दक्षिणोत्तर लांबी सुमारें ९०० फूट व पूर्व पश्चिम रूंदी ३५०फूट आहे. आंत गणपतीचें देऊळ, पद्मावंतीची समाधि, तळधर व विहीर आहे. शिवाय आंग्रयांचा पांच मजली थोरला वाडा होता तो हल्लीं पडला आहे. चैत्रांत येथें जत्रा भरते.