विभाग- सातवा : अर्थशास्त्र–आफ्रिका
अली-राजपुर, सं स्था न-(मध्य हिंदुस्थान.) भोपावर एजन्सींतील एक संस्थान. उ. अ. २२० ०’ ते २२० ३४’ व पू. रे. ७४० १८’ते ७४० ३४’. क्षेत्रफळ ८२६ चौरस मैल. अली हें किल्ल्याचें नांव, व राजपुर हें राजधानीचें नांव हीं दोन्हीं मिळून या संस्थानास वरील नांव मिळालें आहे. उत्तरेस मुंबई इलाख्यांतील पंचमहाल जिल्हा; दक्षिणेस नर्मदा नदी; पश्चिमेस रेवाकांठा एजन्सी व पूर्वेस भोपावर एजन्सींतील कांहीं ठाकुराती. प्रदेश डोंगरावर असून जंगल विपुल आहे. उन्हाळा व हिवाळा हे दोन्ही ऋतू कडक असून पाऊस सरासरी ३५ इंच पडतो.
पूर्वीचा इतिहास विश्वसनीय नाहीं. जोधपूरच्या घराण्यांतील कोणी उदेदेव अथवा आनंददेव हा या संस्थानचा मूळ पुरूष असून इ. स. १४३७ सालीं अली येथें यानें किल्ला बांधला असें म्हणतात. तथापि जोधपूर राजघराणें हा संबंध मानीत नाहींत. आनंददेवाचे नातू गुगलदेव आणि केसरदेव हे होते. पैकीं गुगलदेव यास अली-राजपुर व केसरदेव यास जोबट संस्थान मिळालें. इ. स. १८१८ सालीं राणा प्रतापसिंहाच्या तर्फे मुशाफर मकराणी हा कारभार पहात होता. प्रतापसिंहाचा काल झाल्यावर त्याच्या मुलातर्फे जसवतसिंग हाच कारभार पहात असे. पुढें धार संस्थान व हें संस्थान यांमध्यें कांहीं लढा उपस्थित झाला. पण इ. स. १८२१ सालीं ब्रिटिश सरकार, धार संस्थान व हें संस्थान यांची आपसांत तडजोड होऊन तो तंटा मिटला. जसवतसिंग सन १८६२ सालीं मरण पावला त्यानें मृत्युपत्रांत संस्थानाची आपल्या दोन मुलांमध्यें वांटणी व्हावी असें लिहून ठेवलें. पण ब्रिटिश सरकारनें तें मृत्युपत्र बाजूस सारून वडील मुलगा गंगदेव यास गादीवर बसविलें. पण इ. स. १८७१ सालीं त्याच्या नालायकीमुळें त्यास पदच्युत करून त्याचा धाकटा भाऊ रूपदेव यास गादी दिली. हा सन १८८१ सालीं मरण पावला. यास संतान नव्हतें, तेव्हां सोंडवा ठाकुर वंशातील विजयसिंग यास ही गादी दिली. यावेळी फुलमालच्या जितसिंग ठाकुरानें भिल्लांनां चिथवून बंड करण्याचा घाट घातला होता. पण तें ताबडतोब मोडून टाकण्यांत आलें. इ. स. १८९० मध्यें विजयसिंग मृत्यु पावल्यावर त्याचा चुलतभाऊ प्रतापसिंग यास गादी मिळाली. याचें इंदोर येथील डेली कॉलेजमध्यें शिक्षण झालें असून त्यास राणा हा किताब आहे व ९ तोफांच्या सलामीचा मान आहे.
येथील लोकसंख्या १९२१ ते ८९३६४ होती. गेल्या वीस वर्षांत लोकसंख्या जवळ जवळ दुप्पट झालेली दिसते. खेडीं-३०७ जमीन चांगली नसून भिल्ल व भिलाण यांची वस्तीं फार असल्यामुळें उत्पन्न येत नाहीं. हे लोक स्वत:च्या गरजेपेक्षां जास्त पिकविण्याच्या भानगडीत पडत नाहींत. आगगाड्या, रस्ते वगैरे सोयी नसल्यामुळें व्यापार फारसा नाहीं.
संस्थानचे पांच परगणे आहेत:- भाब्रा, राठ, नानपुर, छकताल आणि चांदपुर. प्रत्येक परगणा कमाविसदार याच्या हाताखालीं असतो. या संस्थानिकास पहिल्या वर्गाच्या मॅजिस्ट्रेटचे अधिकार आहेत. ब्रिटिश कायदाच येथें चालतो.
अगदीं अलिकडे वसूल धान्यामध्यें होत असे. हल्ली साधारण एक लाख रूपये उत्पन्न आहे. संस्थानास ८६०० रूपये खंडणी दिली जाते.
गां व.- अली-राजपुर हें संस्थानांतील मुख्य गांव आहे. उ. अ. २२० ११’ आणि पू. रे ७४० २२’ समुद्रसपाटीपासून उंची ९७०० फूट. लोकसंख्या (१९०१) ३९५४ मुशाफर मकराणी यानें ही राजधानी केली. (इं. गॅ.).