विभाग- सातवा : अर्थशास्त्र–आफ्रिका
अलीवर्दीखान. - याचा बाप मिर्झा महंमद हा तुर्कोमन असून, तो प्रथम राजपुत्रअझमशहा याचा नोकर होता; पण पुढें तो वारल्यावर १७०७ मध्यें मिर्झा दिल्लीहून कटकला गेला. तेथें मुर्शिदकुलीखानाचा जावई सुजाउद्दीन ( सुजाखान ) याच्या आश्रयाला राहिला. सुजाउद्दिनानें मिर्झाचा पुत्र महंमदअल्ली याला राजमहालाचा फौजदार केलें व बादशहाकडून मनसबी व अलीवर्दीखान ( अल्लावीर्दी खान ) ही पदवी व मागाहून महाबतजंग ही दुसरी पदवी मिळवून दिली. येणेंप्रमाणें अलीवर्दीखान हा आरंभीं बंगालचा नबाब सुजाउद्दीनखान, याच्या पदरीं एक लहानसा नोकर होता, पण पुढें चढत त्यानें व त्याचा वडील भाऊ हाजी महंमद यानें नबाबाच्या राज्यकारभारांतहि आपला शिरकाव करून घेतला. पुढें नबाबानें अलीवर्दीखानास बहार प्रांताची व्यवस्था सांगितली. तेथें अलीवर्दीखानाने डोईजड राजांची पुरी खोड मोडली. शिवाय पाटणा व मोंगीर यांच्या दरम्यान चकवार नांवाचे शूर हिंदू लोक रहात होते त्यांच्याशी लढून अलीवर्दीखानानें पुष्कळ नवीन कर बसविले व अनेक कपटें करून त्यांचा नि:पात केला. मध्यंतरी पुष्कळदां त्याच्या अफगाण फौजेनें शिरजोरपणा दाखविला असतां त्यानें त्या सर्वांचाहि कपटानें मोड केला. इकडे दरबारांत लांच वगैरे भरून त्याची सुजाउद्दिनाच्या विरूध्द खटपट चालूच होती. शेवटीं १७३९ त दिल्लीहून परभारें अलीवर्दीखानाची नेमणूक बहार प्रातावर स्वतंत्रपणें झाली याच सुमारास सुजाउद्दीन एकाएकीं मरण पावला; त्यास त्याच्या दरबारीं असलेला अलीवर्दीखानाचा वडील भाऊ हाजी महंमद याने ठार मारलें असें म्हणतात. नबाबाचा पुत्र व वारस सर्फराजखान हा असून तो डाक्का येथें राहत असे व नबाबाचा जावई मुर्शिदकुलीखान हा ओरिसाचा नायब सुभेदार होता. सुजाउद्दीन मरण पावल्यावर त्याचा पुत्र सर्फराजखान याची त्याच्या जागीं नेमणूक झाली. पण तो सर्वांशीं उद्दामपणानें वागू लागल्यानें त्याच्या विरूध्द जिकडे तिकडे गुप्त बेत सूरू झाले. ही संधि साधून अलीवर्दीखानानें बंड करून सर्फराजखानास एका लढाईंत ठार केलें ( हि. स. ११५३=इ. स. १७०४ ). शिवाय त्यानें मुर्शिदकुलीखानावरहि हल्ला करून त्यास ओरिसांतून हांकून लाविलें. त्यावेळीं मुर्शिदकुलीखानाचा मीरहबीब नांवाचा एक अरबी मनुष्य दिवाण होता. त्यानें अलीवर्दीखानाकडे येऊन त्याच्या पदरीं चाकरी धरली. सर्फराजखानाची जी कांहीं मालमत्ता व जडजवाहिर अलीवर्दीखानाच्या हातीं लागलें, त्यांपैकीं कांहीं भाग मोंगल दरबारांतील अमीरउमरावांस देऊन, अलीवर्दीखानानें बंगाल प्रांताची नबाबी पटकावली. इ. स. १७४० च्या सुमारास बंगाल, बहार व ओरिसा या तीनहि प्रांतावर अलीवर्दीखानाची सत्ता प्रस्थापित झाली होती.
अलीवर्दीखानाची पहिलीं अकरा वर्षें मराठ्यांच्या बंगालवर स्वार्या होत होत्या त्यांच्याशीं लढण्यांत खर्च झालीं. त्यानें आपल्या पुतण्याचा व मुलीचा मुलगा सिराजउद्दौला (सुराज उद्दौला) याजकडे कटक प्रांताची सुभेदारी दिली होती. सिराजउद्दौल्याच्या जुलमी वर्तनामुळें इ. स. १७४२ मध्यें त्या प्रांती बंड उपस्थित झालें ( ग्रांटडफ. ) यावेळीं सिराज उद्दौल्याचें वय निरनिराळ्या ग्रंथकाराप्रमाणें कमींत कमी चार वर्षांचें व जास्तींत जास्त पंधरा वर्षांचें निघतें ). तें मोडण्याच्या कामांत अलीवर्दीखान गुंतला असतां रघूजी भोंसल्याचा दिवाण भास्करपंत यानें सुमारें १२००० फौजेनिशीं बहार प्रांतांत स्वारी करून लुटालूट करण्यास आरंभ केला. कटक प्रांतांतील बंड मोडून अलीवर्दीखान मुर्शिदाबादेस येत असतां त्याला मराठ्यांच्या स्वारीची ही बातमी समजली. तो चार हजार फौज व चार हजार पायदळ घेऊन मराठ्यांचा प्रतिकार करण्यासाठीं आला, परंतु मराठ्यांनीं त्याच्या सैन्याची इतकी दुर्दशा केली कीं, तो कटवा येथें परत आला तेव्हां, त्याजजवळ पुरते ३००० लोकहि राहिले नसतील. अगदीं पहिल्याच हल्ल्यांत त्याचा सरदार मीरहबीब हा मराठ्यांच्या हांती सांपडला. याच्या मदतीनें पुढें त्यांनीं मुर्शिदाबाद येथील धनाढ्य सावकार जगतशेट अलमचंद याची पेढी लुटून सुमारें अडीचकोट रूपये आणले, व हुगळी शहर व कटव्यापासून मिदनापुरच्या आसमंतांतील भागापर्यंत सर्व स्थळें हस्तगत करून घेतलीं. यावेळीं अलीवर्दीखानानें मोंगल बादशहा व बाळाजीबाजीराव याची मदत मागितली. त्यानें याच वेळीं बाळाजीकडे कांहीं पैसाहि पाठविला होता; परंतु अयोध्येच्या नबाबाच्या लबाडीमुळें तो मार्गांतच लुटला गेला. तथापि अलीवर्दीखान सर्वस्वीं दुसर्याच्याच मदतीवर अवलंबून राहिला नाहीं. त्यानें एके रात्रीं हुगळी व अदजी या नद्या नावांचे पूल बांधून ओलांडून तो कटवा येथील मराठ्यांच्या छावणीवर अचानक चालून आला, व भास्करपंताचा पाठलाग करून त्यास आपल्या मुलुखांतून हांकून लाविलें. तथापि अदजी नदी ओलांडून जात असतां कांहीं अपघात होऊन त्याचे १५०० लोक त्या नदींत बुडून मरण पावलो. दुसर्या वर्षी रघूजी भोंसलें जातीनें बंगाल प्रांतीं स्वारीस आला. परंतु या वेळीं मोंगल बादशहाच्या निमंत्रणावरून बाळाजी बाजीराव अलीवर्दीखानाच्या मदतीस आला, व बादशहानें ठरवून दिलेली रक्कम देण्याचें अलीवर्दीखानापासून वचन घेऊन त्यानें रघूजीस बंगाल प्रांतांतून घालवून दिलें ( १७४३ ) [ रघूजी भोंसले पहा ]
इ. स. १७४४ चा पावसाळा संपल्यानंतर रघूजी भोंसल्याचा दिवाण भास्करपंत यानें २०,००० फौज बरोबर घेऊन ओरिसाच्या मार्गे बंगाल प्रांतांत स्वारी केली. तेव्हां अलीवर्दीखानानें सलूख करण्याच्या भिषानें भोंसल्याच्या मुख्य मुख्य सरदारांस आपल्याकडे मेजवानीस बोलावून त्या सर्वांचा विश्वासघातानें खून केला. यानंतर रघूजीची फौज, रघूजी गायकवाड नांवाचा मागें छावणींत, राहिलेला एकटाच सरदार, आल्या वाटेनें वर्हाडांत परत घेऊन गेला.
त्याच वर्षी म्हणजे इ. स. १७४४ तच अलीवर्दीखानाच्या चाकरींत असलेल्या अफगाण लोकांनीं बंड केलें, व अलीवर्दीखान त्यांचें बंड मोडण्यांत गुंतला आहे अशी संधिसाधून रघूजी भोंसल्यानेंहि ओरिसांत स्वारी केली. खानानें प्रथम आपल्या लोकांचें बंड मोडलें व नंतर तो रघूजीकडे वळला दरम्यान रघूजीनें कित्येक जिल्हे हस्तगत करून घेतले होते. परंतु याच सुमारास स्वत:च्या राज्यांतील बंडें मोडण्यास रघूजीस स्वदेशी जाणें भाग पडल्यामुळें, या मोहिमीचें काम तूर्त कांहीं दिवस बंद पडलें.
सरतेशेवटीं मराठ्यांच्या या स्वार्यांपासून आपली मुक्तत्ता करून घेण्यकरितां इ. स. १७५१ मध्यें अलीवर्दीखानानें उत्तरेस बालासोरपर्यंत कटकप्रांत भोसल्याच्या स्वाधीन केला, आणि बंगाल व बहार या दोन प्रांतांच्या चौथाईबद्दल त्यानें दरसाल बारा लक्ष रूपये देण्याचें कबूल केलें.
अलिवर्दीखानाच्या वयास या वेळीं सत्तर वर्षें उलटून गेलीं असून म्हातारपणांतील मनोदौर्बल्य त्याच्यामध्यें दिसूं लागलें होतें. मिर्झा महमूद उर्फ सिराजउद्दौला म्हणून त्याचा सर्वांत धाकट्या मुलीचा मुलगा होता त्याचे या अखेर अखेरच्या दिवसांत त्यानें फाजील लाड चालविले. इ. स. १७५० सालीं सिराजउद्दौल्यानें आपल्या आज्याविरूध्द बंड करण्याचें धाडस केलें पण अलीवर्दीखानानें त्याचा कांहीं राग मानला नाहीं, इतकेंच नव्हे तर त्यानें सिराजउद्दौल्यास आपला वारस म्हणून नेमून त्याचा राज्यकराभारांत हातहि राहूं दिला. अलीवर्दीखानानें राजकारणांत कितीहि दुष्कृत्यें केलीं असलीं तरी त्याचें खासगी आचरण अत्यंत नीतिशुध्द होतें व त्याचा राज्यकारभारहि समकालीन राज्यकर्त्यांशीं तुलना करता पुष्कळ व्यवस्थित होता.
येणेंप्रमाणें अलीवर्दीखान यानें बंगाल, बहार व ओडिसा या तीन प्रातावर १६ वर्षे सत्ता चालविल्यावर तो शनिवार ता. १० एप्रिल सन १७५६ ( रज्जब हि. स. ११६९ ) रोजीं मरण पावला. या वेळीं चाद्रवर्षाप्रमाणें त्यास ८० वें वर्ष होतें, व काहीं दिवस अगोदरपासून तो काम करण्यास असमर्थ झाला होता. त्याच्या प्रेताचें मुर्शिदाबाद येथें खुषवाग उद्यानांत त्याच्या आईच्या प्रेताजवळ दफन करण्यांत आलें. त्याच्यामागून सिराजउद्दौला अधिकारारूढ झाला.
[ संदर्भग्रंथ:-थॉर्नटनचा इतिहास; स्टुअर्ट हिस्टरी ऑफ बेंगाल, लंडन, १८१३; गाटडफ, हिस्टरी ऑफ दि मराठाज; मुसुलमानी व ब्रिटिश रियासत ]