विभाग- सातवा : अर्थशास्त्र–आफ्रिका
अलेक्झांडर झार, प हि ला ( १७७७-१८२५ ) ह्या रशियाच्या बादशहाचा बाप ग्रँडड्यूक पॉल पेट्रोव्हिच व आई वर्टेबर्गच्या फ्रेडरिक यूजेनची मुलगी मेरी फेडोरोव्हना ही होय. याच्या विचित्र स्वभावामुळें याची कारकीर्द इतिहासांत महत्त्वाची व मनोरंजक झाली आहे. त्याच्या लहानपणाच्या परिस्थितीचा व शिक्षणाचा त्याच्यावर परस्परविरोधी असा विलक्षण परिणाम झाला होता. त्याच्या एका शिक्षकानें त्याला रूसोच्या तत्त्वांचा उपदेश केला होता. पुढें एका लष्करी गव्हर्नरनें त्याला रशियांतील अनियंत्रित झारशाहीचे धडे शिकविले होते; त्याच्या वडिलांनीं त्याच्यांत लष्करी बाण्याबद्दल आवड उत्पन्न केली होती. याप्रमाणें राजकारणांतील परस्परविरूध्द तत्त्वांच्या उपदेशामुळें त्याच्या राजकीय धोरणांत अत्यंत चंचलता आली. यावरूनच नेपोलियन त्याला “अस्थिरवृत्तीचा बायझन्टाईन” म्हणे; मॅटरनिक तर त्याला वेडाच म्हणत असे. पुढें पुढें त्याचें मन उदास झालें होतें व कोणत्या वेळीं एकदम मन भडकून त्याच्या हातून काय भयंकर कृत्य होईल याचा नेमच राहिला नव्हता. १८०१ मध्यें आपल्या बापाचा खून करून तो राज्यावर आला तेव्हां प्रथम त्याची. बुध्दि सरळ होती व आपल्या राजकीय आकांक्षा फलद्रुप करण्याच्या कामास तो नेटानें लागला. आपल्या बापाचे जुने मंत्री त्यानें कायम ठेवले होते; पण आपल्या तरूण मित्रांचें एक अंतस्थ मंडळ स्थापून देशांतील सुधारणेच्या नव्या योजना त्यानें तयार केल्या त्या सर्व इंग्लंडच्या वळणावर होत्या. पण रशियांतील लोकस्थिति तितकी तयार नसल्यामुळें प्रत्यक्ष कृतींत त्या सुधारणा फारशा उतरूं शकेनांत. गुलामगिरीची पध्दत चालू असल्यामुळें बहुतेक लोक रानटी स्थितींतच होते. अशीं निराशा झाल्यामुळें आरंभींचीं शुभ चिन्हें सर्व फुकट जाऊन कारकीर्दीच्या अखेरीस रशियन लोकांची स्थिति अधिकच शोचनीय झाली. त्याला कारण लोकांपेक्षां झारच अधिक होय. प्रजास्वातंत्र्याच्या त्याच्या कल्पनाच चुकीच्या होत्या. खरोखर पाहतां, आपण मोठे उदार व लोककल्याणवादी म्हणून मिरविण्यांतच फक्त त्याला आनंद वाटे; पण स्वत:च्या हातातील अधिकार गमविण्याची त्याची बिलकुल इच्छा नव्हती. अनियंत्रित राजशाही व खरीखुरी लोकशाही या दोन सुर्या एका म्यानांत कधींच राहूं शकत नाहींत याची त्याला बरोबर कल्पना न झाल्यामुळें त्याची दिशाभूल झालेली होती. देशांतील कायद्यांनां कोडाचें स्वरूप देण्याचा त्यानें उपक्रम केला. पण अखेरपर्यंत तें काम अर्धवटच पटलें. जाणूनबुजून नसलें तरी त्याचें प्रत्यक्ष आचरण पूर्ण अरेरावीचें होतें; बुध्दिमान व कर्तृत्ववान माणसांच्या हातींहि स्वतंत्र अधिकार देण्याची इच्छा नव्हती; लोकांवर विश्वास नव्हता. याकरतां आपल्या सुधारणांचे प्रत्यक्ष प्रयोग त्यानें दूरदूरच्या पोलंड, फिनलंड, बाल्टिक प्रांत वगैरे ठिकाणीं करून पाहिले. खुद्द रशियांत त्यानें नवें मंत्रिमंडळ निर्माण केलें, सेनेटला खरेखरे अधिकार दिले, परंतु अखेर हे नामदारलोक झारचे व त्याच्या दोस्ताचे हुकूम बजावणारे हस्तक बनले. शिक्षणप्रसारार्थ स्थापलेल्या नव्या युनिव्हर्सिट्यांतील स्वातंत्र्याची सुव्यवस्था व जुनें शुध्द वळण या नांवाखालीं गळचेपी करण्यांत आली व लष्करी वसाहती करून शेतकर्यांवर जुलूम करण्यांत आला. आर्चबिशप, बिशप, प्रीस्ट या सर्वांनां झारनें आपलीं मतें प्रसृत करण्यास भाग पाडलें.
अंतस्थ राज्यकारभाराप्रमाणें यूरोपीय राजकारणांतहि पुढाकार घेण्याची झारला महत्त्वाकांक्षा होती; परंतु क्षेत्रांत आपल्या अरेरावी इच्छेस फारसा वाव नाहीं असा त्याला कटु अनुभव आला. राज्यावर आल्याबरोबर त्यानें पॉलचें ( आपल्या बापाचें ) धोरण पार बदलून इंग्लंडशीं तह केला. ऑस्ट्रियाबरोबर बोलणें सुरू केलें व प्रशियाच्या तरूण फ्रेडरिक विल्यम राजाची व विशेषत: त्याच्या सुंदर राणीची मैत्री संपादण्याकरतां प्रशियाशीं तह केला. फ्रान्समधील रिपब्लिक व नेपोलियनबद्दल त्याचा ग्रह प्रथम फार अनुकूल होता. परंतु पुढें लाहार्पनें पॅरिसची समक्ष स्थिती पाहून लिहिलेल्या पुस्तकाच्या वाचनानें व प्रत्यक्ष पॅरिसमध्यें खुनादि घडणार्या गोष्टीमुळें त्याचें मन पार बदलेले. आणि ‘यूरोपवर जुलूम करणार्या व जगाची शांतता नष्ट करणार्या’ नेपोलियनबरोबर त्यानें युध्द सुरू केलें. त्याकरितां यूरोपीय राष्टांचा एक संघ बनविण्याची कल्पना त्यानें पुढें मांडली. कोणत्याहि राष्ट्रानें ह्या संघापुढें आपल्या तक्रारी मांडल्याशिवाय युध्द सुरू करूं नये, केल्यास सर्वांनीं मिळून त्याचें पारिपत्य करावें, वगैरे नियम त्यानें सुचविले. तिकडे नेपोलियननें या कल्पनातरंगांत वाहाणार्या झारला आपल्या मैत्रीच्या जाळ्यांत अडविण्याचे प्रयत्न चालविले होते. त्यानें व्हिएन्ना घेतल्यावर व ऑस्टर्लिझच्या विजयानंतर पुन्हां पुन्हां झार बरोबर मैत्रीचें बोलणें चालविलेंच होतें. ‘फ्रान्स व रशिया यांचा तंटा होण्याचें भूगोलदृष्ट्या कारणच नाहीं; तर दोघांनीं मिळून सर्व जगावर सत्ता गाजवावी’, अशा गोडगोड कल्पना तो झारपुढें मांडीत होता. नंतर जेनाची लढाई जिंकल्यावर पोल लोकांनां, तुर्कांनां व पर्शियनांनां त्यानें झारविरूध्द चिथवलें; प्रत्यक्ष रशियांत झारच्या भावाचा पक्ष नेपोलियनला अनुकूल होऊन तहाकरतां ओरड करूं लागला. तरीहि झारनें नेपोलियनशीं युध्द पुकारलें; पण त्यांत प्रथमच फ्रेडलंडमध्यें रशियन सैन्याची नेपोलियननें दाणादाण उडवून दिली. तेव्हां झारला तह करणें भाग पडून दोघे बाहशहा टिलसिटला एकत्र जमले; तेथें प्रत्यक्ष भेटींत नेपोलियनच्या अलौकिक बुध्दिमत्तेमुळें व उदारपणाच्या नुसत्या गप्पांनींच झार इतका दिपून गेला कीं, तो नेपोलियनच्या पूर्ण कह्यांत गेला. मग जग जिंकण्याच्या व पूर्वेकडील सर्व देशांचा बादशहा होण्याच्या लांबलांब गप्पा होऊन शेवटीं दोघांचा तह झाला. नेपोलियननें मोठ्या सढळ हातानें झारला फिनलंड व डॅन्युब नदीच्या कांठचा प्रदेश देऊन टाकला.
परंतु हें सख्य फार वेल टिकलें नाहीं. नेपोलियननें प्रशिया अधिकाधिक गिळंकृत करण्याचें धोरण चालविलें, तें झारला पटेना. तथापि नेपोलियननें झारला आदरभावानें वागविण्याचें धोरण चालूच ठेविलें होतें.१८०८ आक्टोबर मध्यें पुन्हां दोघांच्या भेटी झाल्या व करार ठरलें. पण लवकरच नेपोलियनचा डाव झारच्या लक्षांत आला. जग जिंकण्याच्या बातांवर झुलवून मध्य यूरोपांत आपला पाय घट्ट रोंवण्याचा नेपोलियनचा इरादा त्यानें ओळखला; व तदनुसार आपलें धोरणहि बदललें. नेपोलियनला मदत करण्याचें त्यानें साफ नाकारलें. नेपोलियनलाहि झारबद्दल संशय होताच, व त्या बाबतींत खात्री करून घेण्याकरतां नेपोलियननें झारच्या सर्वांत धाकट्या बहिणीकरतां अगदीं अकल्पितपणें मागणी घातली. झारनें कांहीं दिवसांनीं बहिणीचें बालवय व झारमातेचा विरोध या दोन सबबींवर मोठ्या आदरयुक्त भाषेंत नकार कळविला. तेव्हांपासून दोघांमधील स्नेहभाव भराभर ओसरत चालला. पुढें काँटिनेंटल सिस्टिमनें’ रशियाच्या व्यापारास मोठा धोका बसू लागला, तेव्हां झारनें उघड शत्रुत्व स्वीकारलें. १८१२ मध्यें नेपोलियननें रशियावर जंगी स्वारी केली, मास्कोहि घेतले, तरी झार तह करीना. तेव्हां निराश होऊन परत येतांना रशियन सैन्यानें त्याच्या सैन्याचा फार नाश केला. ह्या एकंदर प्रकरणाचा झारवर परिणाम असा झाला कीं शेवटीं तो म्हणूं लागला कीं, “नेपोलियनशीं आतां मैत्री शक्य नाहीं.” एक तो नाहीतर मी, दोघानीं एकत्र नांदणें मात्र शक्य नाहीं. अखेर १८१५ मध्यें नेपोलियनचा पूर्ण मोड झाला तेव्हां झारला ‘निर्वीरमुर्वीतलं’ असें झालें.
परंतु याच सुमारास झारच्या मनस्थितींत मोठें परिवर्तन होऊन त्याची वृत्ति गूढ व धार्मिक बनत चालली. ऐहिक गोष्टींबद्दलचा त्याचा दृष्टिकोन बदलून यूरोपमध्यें शांततां प्रस्थापित करण्याचें कामाकरतां देवानें आपली योजना केली आहे असें त्याच्या मनानें पक्के घेतलें. इव्हँजेलिस्ट पंथातील बॅरोनोस डी कुडनेर हिच्या नादीं लागून तिच्याजवळ पूर्ण विश्वासानें तो आपल्या अत्यंत गुह्य गोष्टी सांगू लागला; व ईश्वरी प्रेरणेंनें जगाच्या उध्दाराकरता मी झटत आहे, असें तो प्रतिपादन करूं लागला. टिलसिटच्या तहाची ज्यांना आठवण होती अशा मेटनिंकसारख्या लोकानां स्वार्थनिरपेक्षतेचें हें झारचें केवळ ढोंग आहे असें वाटलें. १८०८ मध्यें अखिल जग जिंकून त्यावर बादशाही गाजविण्याच्या गोष्टी व १८१३ मध्यें जगदुध्दाराचा गोष्टी, अशा दोन ध्रुवाइतक्या विरूध्द गोष्टी बोलणार्या झारवर कोणाचा कसा विश्वास बसावा ? शिवाय पुढें व्हिएन्नाच्या काँग्रेसमध्यें त्याच्या वर्तनावरून इतराचा संशय दुणावला आणि कॅसलरीगनें त्याची त्याबद्दल चांगली कानउघाडणी केली. तथापि झारच्या मनात कपट नव्हते असें आज खास म्हणता येतें. त्यानें स्थापन केलेल्या ‘होली अलायन्स’ लाहि कित्येकानीं नावें ठेविली आहेत तें योग्य नाहीं. त्यांत अलेझाडरचा हेतु खरोखर उदात्त व स्तुत्य होता. त्याच्या त्या धर्मनिष्ठ उदारतेमुळे यूरोपला खरोखरच फायदा झाला. फ्रान्सचे तुकडे पाडूं न देता तेथें राजा व प्रजा दोघाच्या हिताची राज्यव्यवस्था सुरू करण्याचें श्रेय त्याच्या कडेच आहे. स्वित्सर्लंडमध्यें शांतता राखण्याचें, जर्मनीचा आस्ट्रियापासून बचाव करून तेथे स्वतंत्र राज्यकारभार सुरू करण्याचें व पोलंडला राष्ट्रीय स्वातंत्र्य देण्याचें पवित्र कामहि झारनेंच केलेलें आहे.
१८१८ नंतर पुन्हा झारची मतें बदलूं लागलीं. खुद्द रशियातील क्रान्तिकारकाच्या गुप्त कटामुळें त्याला अपाय पोहोचूं लागला, तेव्हा त्याच्या उदात्त विचाराना धक्का बसला. पुढें नेपल्स, पीडमाँट येथेहि लोकांनीं बंडे उभारलीं; तेव्हां स्वातंत्र्य व राजकीय हक्क याचें लोकांनीं नसतें खूळ माजविलें आहे, तें राजांनीं नाहींसे करून टाकलें पाहिजे असें प्रतिपादन करणार्या मेटर्निकच्या तो पूर्ण कह्यात गेला व १८२० च्या नवंबरमध्यें त्यानें ट्रोपो प्रोटोकोलवर सही करून, कोणत्याहि देशाच्या अंत:कारभारात इतर राष्ट्रानां पडण्याचा हक्क आहे, हें तत्व मान्य केलें. पुढें ग्रीकांनीं तुर्कांविरूध्द स्वातंत्र्यप्राप्तीकरितां बंड केले, तेव्हां तुर्कांना यूरोपांतून हांकून देण्याचे वेडहि पुंन्हा त्याच्या मनात शिरलें. परंतु लवकरच १८२५ डिसेबर १ रोजीं तो मरण पावला, व राज्यकारभाराच्या भयंकर जुंवाखालून तो सुटला. पण त्यावेळीं रशियाची स्थिति अत्यंत वाईट होती; गुप्त हेर व पोलीस यांचा सुळसुळाट, लष्करांत असंतोष, पोलंडांत बंड, तुर्कांशीं बेबनाव, व रशियांत सर्वत्र गुलामगिरी ! खाजगी आचरणांत त्यांच्या अंगचे गुण दिसत. मनमिळाऊ स्वभाव, मोहक वाणी, साधी वागणूक वगैरे गुणांनीं युक्त असून तो कलाकौशल्याचा आश्रयदाता होता.