विभाग- सातवा : अर्थशास्त्र–आफ्रिका
अलेक्झांड्रिया - ( आफ्रिका. ) इजिप्तचें भूमध्य समुद्रावरील मोठें बंदर, व प्राचीन काळापासून फार प्रसिध्द असलेलें शहर. उ. अ. ३१० १२’ आणि पू. रे. २९० १५’. येथून केरो शहर रेल्वेनें १२९ मैल दूर आहे.
प्रा ची न अ ले क्झां ड्रि या - ग्रीक अमदानींत या शहराचे तीन भाग होते ते येणेंप्रमाणें:-यहुदी लोकांनीं वसाहत केलेला भाग, हा भाग ईशान्येस होता; इजिप्शियन लोकांनीं व्यापिलेला र्हाकोटीस भाग व ग्रीकलोकांचा ब्रुचेयुम भाग, याशिवाय रोमन अमदानींत ब्रुचेयुम भागाच्या लगत सरकारी कामगारांचें राहण्याचें ठिकाण असे.
पूर्वी हें शहर एक लहानसें बेट असून यास फेरोस म्हणत असत. हें बेट एका अरूंद बांधानें किनार्यास जोडलें गेलें होतें. सॅब्रोच्या अमदानींत म्हणजे ख्रिस्त पूर्व पहिल्या शतकाच्या उत्तरार्धांत येथें १४ इमारती होत्या त्या येणेप्रमाणें: ( १ ) राजवाडा; ( २ ) नाटकगृह, याचा सीझरनें एके वेळीं किल्ल्या सारखा उपयोग केला होता; ( ३ ) जलदेवतेचें देवालय, हें वरील नाटकगृहासमोर होतें; ( ४ ) अँटनीनें बांधलेली टिमोनियम नांवाची इमारत, ( ५ ) सीझरियम; ( ६ ) शिलेखाना; ( ७ ) देवघेवीचा चौक; ( ८ ) गोदी; ( ९ ) अखाडा ( १० ) पॅलेस्ट्रा; ( ११ ) शनीचें देवालय; ( १२ ) चंद्राचें देवालय; ( १३ ) पदार्थसंग्रहालय व ( १४ ) सेरापियम नांवाचें देवालय. फॅरोस बेटावर ४०० फूट उंचीचें दीपगृह होतें. याची जगांतील ७ आश्चर्यांमध्यें गणना होतें, येथें ३०००० नागरिक असून पुष्कळ गुलामहि होते.
इतिहास - हें शहर ख्रिस्ती शकापूर्वी ३३२ व्या वर्षी प्रसिध्द अलेक्झांडर बादशहानें वसविलें. त्यापूर्वीहि या बंदराची कीर्ति सर्वत्र होती. ख्रि. पू. २००० वर्षांपासून दक्षिण हिंदुस्थान व इजिप्त यांमध्यें जो व्यापार चाले, त्याला हें ठिकाण अतिशय सोयीचें व महत्त्वाचें होतें. अलेक्झांड्रीयाच्या टालेमी राजाच्या उत्तेजनापासून ज्योति:शास्त्राच्या इतिहासांत नवीन काल सुरू झाला. येथें एक भव्य वेधशाळा बांधण्यांत आली ( दीक्षित-भारतीय ज्योतिश्शास्त्र पा. ३४९-५० ). अलेक्झांड्रियाचे ग्रीक लोक सुप्रसिध्द आहेतच. पुढें व्यापाराच्या योगानें एकाच शतकांत याची इतकी प्रगति झाली कीं हें रोम शहराची बरोबरी करूं लागलें. ८० सालीं हें रोमन लोकांच्या ताब्यांत आलें. ४७ व्या वर्षी सझिर यानें क्लिओपाट्राच्या सहवासांत येथें कांहीं दिवस घालविले. इ. स. २१५ मध्यें कॅरेकाल्ला बादशहानें या शहरास भेट दिली. याच बादशहानें अलेक्झांड्रिया येथें जी लोकांची कत्तल केली त्यामुळें हिंदुस्थानचा या बंदराशीं चालणारा मोठा व्यापार प्रत्यक्षपणें थांबला असें सांगण्यांत येते ( जे. आर. ए. एस्. १९०७ पा. ९५४ ) पुढें १७९८ सालीं फ्रान्सराज्यक्रांतीच्या वेळेस नेपोलियन यानें या शहरावर स्वारी करून तें काबीज केलें. १८०१ पर्यंत हें फ्रान्सच्या ताब्यांत होतें. पुढें १८०१ सालीं येथे इंग्रज व फ्रेंचांचें तुमुल युध्द होऊन इंग्रजांनीं हें सर केलें.
पुढें ओटोमन अमदानींत इजिप्त मध्यें फार बेबंदशाही माजल्यामुळें हें शहर लयास जाऊन यांत अवघी ४००० लोक वस्ती राहिली. परंतु महंमदअली यानें यास पुन्हां उर्जितदशेस आणिलें. इस्माईलपाशानें येथें म्युनिसिपालिटीची स्थापना केली. १८८२ मध्यें हें शहर व इजिप्त देश इंग्रज सत्तेखालीं आले. या शहरांत खोदलें असतां पुष्कळ इमारती व इतर जुन्या वस्तु सांपडतात.
अ र्वा ची न अ ले क्झां ड्रि या.- हें मॅरिऑटिस तळें व भूमध्यसमुद्र याच्यामध्यें असलेल्या जमीनीच्या तुकड्यावर वसलें आहे. याच्या पश्चिमेस व पूर्वेस अनुक्रमें रास एटटिन व केटबे हीं भूशिरें आहेत. जकातीचें नाकें व मोठमोठ्या वखारी या शहराच्या पश्चिम भागांत असून इतर मुख्य इमारती पूर्व व आग्नेय भागांत आहेत. पश्चिमबंदरावरील उतरण्याच्या ठिकाणाहून महंमदअलीच्या राजवाड्याकडे एक मोठा रस्ता जातो. येथील “ग्रँड स्केअर” नांवाचा भव्य चौक पंचकोनी असून याच्या सभोंवार झाडें लाविलीं आहेत, व याच्या मध्यभागीं एका राजपुत्राचा घोड्यावर बसलेला पुतळा आहे. या चौकाच्या समोर इटालियन पध्दतीच्या सुंदर इमारती आहेत. यांतील मुख्य म्हटल्या म्हणजे न्यायकचेरी, ओटोमनपेढी, इंग्रजी देवालय, आब्बास हिल्मी नाटकगृह वगैरे होत. शहराच्या पूर्वभागांत झिझिनिया नांवाचें नाटकगृह आहे. येथेंच म्युनिसिपालटीची इमारत असून एक पदार्थसंग्रहालयहि आहे. यांत प्राचीन ग्रीक, रोमन, इजिप्शियन वस्तूंचा संग्रह केला आहे. याशिवाय येथें रोमनकॅथोलीक पंथाचें प्रार्थनामंदिर, मशीद व खेदीव घराण्यांतील पुरूषांची थडगीं आहेत. शहराचा उत्तर भाग एतद्देशीय लोकांनीं व्यापिला आहे.
या शहराच्या पूर्वबंदरावरील समुद्र खडकाळ असून उथळ आहे. सर्व शहरभर आगगाड्यांचें व तारांचें जाळें पसरलेलें आहे हें शहर इजिप्त देशांतील व्यापाराचें केंद्रस्थान असल्यामुळें येथें इंग्रजी व इतर व्यापारी संघांची मुख्य ठाणीं आहेत. इजिप्त देशांतील आयात निर्गतमालापैकीं शेंकडा ९० मालाचा व्यापार या बंदरांतून होतो. मुख्य निर्गत माल म्हटला म्हणजे कापूस होय, व आयात मालांत सर्व तर्हेचें कापड, यंत्रें, इमारती, लांकूड व कोळसा हे जिन्नस येतात. १९२० सालीं येथें ५,६८,४०,००० पौंडाचा व्यापार झाला. या शहराची लोकसंख्या १९१७ सालीं ४,४४, ६१७ होती. येथील परकीय लोकांमध्यें ग्रीक, इटालियन, सीरियन, आर्मेनियन वगैरे लोक असून इतर पौरस्त्य व पाश्चात्त्य लोकहि येथें आढळतात. येथें अरबी शिवाय ग्रीक, फ्रेंच, इटालियन व इंग्रजी याहि भाषा प्रचारांत आहेत.
मुजुमदारांच्या ‘यूरोपचा प्रवास’ ( १९१५ ) या प्रवासग्रंथांत पुढील माहिती आढळते:-या प्रदेशांत बैलाऐवजी रेडे अगर उंट नांगरास जोडतात. शेतांतून तिळाचें पीक दिसतें. चारचाकी भारदारी गाड्या गुजराथेंतील गाड्यांच्या आकाराच्या पण १२-१४ फूट लांब असून त्यांस एक घोडा जोडलेला असतो. खेंचरांचे खटारेहि दिसले. यांचीं चाकें ७-७|| फूट व्यासाचीं असतात. या शहरांतील नवी वस्ती चांगली आहे. कॉफीगृहें भपकेदार आहेत. रॅमले वस्ती गांवापासून दूर असून येथें श्रीमंत लोक राहतात. येथील सर्व बंगले समुद्रकाठीं असून प्रत्येकाच्या सभोंवार उत्तम बागा असतात. येथील कॉफीगृहांतून यूरोपियन तर्हेचे व्हेरायटीचे खेळ होत असतात. आंत जाण्यास तिकिट पडत नाहीं. तरी तेथें कांहीं फराळाचे सामान विकत घेतलेंच पाहिजे असा रिवाज आहे. खेळ पाहण्याची फी फराळावर चढवितात. या कॅफेवजा थिएटरमध्यें निशाणबाजी कसरत, सिनेमा, गाणें, वगैरे एकामागून एक खेळ होतात. येथें “पॉम्पेचा पिलर” ( स्तंभ ) प्रेक्षणीय आहे. हा स्तंभ लालसर दगडाचा केलेला असून एकसंधी आहे. त्याची उंची सुमारें ७० फूट आहे. एका उंचवट्यावरील ओट्यावर हा उभा केलेला असून त्याच्या भोंवतांली तारेचें कुंपण घातलें आहे. आंत जाणारास फी ठेविली आहे.