विभाग- सातवा : अर्थशास्त्र–आफ्रिका
अलेप्पे किंवा अलपुलइ - (मद्रास) त्रावणकोर संस्थानांतील मुख्य बंदर उ. अ. ९० ३० व पू. रे. ७६० २०.तिनवेल्ली-क्किलान रेल्वेचें स्टेशन जें क्किलान त्याच्या उत्तरेस हें ४९ मैलांवर व कोचीनपासून ३५ मैलांवर आहे. लोक वस्ती (१९११) २५६६५. पाऊस सरासरी ११५ इंच पडतो. डच लोकांच्या पोरकड नांवाच्या बंदराशीं त्रावणकोर संस्थानच्या उत्तरेकडचा व्यापार होत असे त्यामुळें संस्थानचें नुकसान होऊं लागलें. त्यामुळें महाराजा रामवर्मानें हें बंदर अठराव्या शतकाच्या उत्तरार्धोंत बसविलें. तत्पूर्वी येथें वाळंवट होतें. हल्लीं येथें चांगला व्यापार चालत आहे. दरवर्षी सुमारें २८०५८५ टनेजचें नौकानयन (शिपिंग) या बंदरीं होतें. एक दीपगृह व गोदामांत माल नेण्याकरितां ट्राम्बे आहे. बर्याचशा तेलाच्या गिरण्या येथें चालतात. काथ्याच्या हातर्याहि पुष्कळ तयार होतात. येथून मुख्यत: खोबरें, नारळ, काथ्या, वेलदोडे, आलें व मिरी हे जिन्नस बाहेर रवाना होतात. तांदूळ, मुंबइचे मीठ, तंबाकू, धातू व कांहीं किरकोळ माल बाहेरून बंदरांत येतो.
डिस्ट्रिक्ट व सेशन्स जज्ज, मुनसफ, आणि पहिल्या व दुसर्या वर्गाचे मॅजिस्ट्रेट यांच्या कचेर्या आहेत. ‘बँक ऑफ मद्रास’ नांवाची एक पेढी आहे.