विभाग- सातवा : अर्थशास्त्र–आफ्रिका
अलेप्पो - (१) आशिया-तुर्कस्थानची एक विलायत. हींत उत्तर सिरिया व वायव्य मेसापोटेमिया हा प्रांत येतो. अलेप्पो, मराश व उर्फा असे तीन संजक या विलायतेंत आहेत. याचा अर्धा भाग डोंगराळ आहे. अलेक्झांड्रेटा हें एकच महत्त्वाचें बंदर आहे. निर्यात सरासरी १० लाख स्टर्लिंगवर व आयात याच्या दुप्पट किंमतीची होईल. येथील स्थायिक लोकवस्ती दहा लाख सुध्दां नसेल, पण आग्नेयभागांत बरीचशी तात्पुरती वस्ती दृष्टीस पडते. लोकसंख्येपैकीं १/५ ख्रिस्ती व बरेचसे मुसुलमान आहेत. या विलायतेंत ७१० मुस्लीम, २५० ख्रिस्ती व ३१० ज्यू शाळा आहेत.
( २ ) -विलायतची राजधानी. कुवैक दरींतील एका पठारावर हें शहर वसलें आहे. लोकसंख्या सुमारे २,५०,०००.
नवीन शहर कुवैक नदीच्या दोन्ही तीरांवर वसलेलें असून, जुनाभाग ३ मैल परिघ असलेल्या सॅरासन पध्दतीच्या कोटांत वसला आहे. येथें दोन महत्त्वाच्या मशीदि आहेत. पहिली उमावी अथवा झकारिया व दुसरी ककुन होय. येथील हवा थंड असून कोरडी व निरोगी आहे, येथें चेहर्यावर व हातावर एक तर्हेचे फोड उठतात. त्याचे चट्टे कायम राहतात. त्यांनां अलेप्पोबटन असें नांव आहे. हें युरोपिअन वकीलांचें राहण्याचें एक महत्त्वाचें ठिकाण आहे. हें शहर उत्तरसीरिया प्रांतांतील व्यापाराचें केंद्र असून येथें रेशमी कापसाचें व लोकरीचें कापड, सत्रंज्या, गालीचे, चामड्याच्या वस्तू वगैरे तयार होतात. सभोंवतालच्या जमीनींत द्विदल धान्यें, पिस्ते व इतर फळें पिकतात. तुर्क लोक याला धर्माचें व सत्तेचें केन्द्र समजतात. रायक येथें या शहराचा बैरूट-दमास्कस रेल्वेशीं संबंध जोडला आहे.
इ ति हा स व अ व शे ष भा ग. - हें शहर एका सुपीक मैदानांत असलेल्या आठ टेंकड्यांवर, समुद्रसपाटीपासून १४०० फूट उंचीवर वसलेलें आह. याला बेरोया हें मेसिडोनियन नांव सेल्युकस निकेटर यानें दिलें. याच नांवाखालीं याचा सेल्युसिड युध्दांत उल्लेख केलेला सांपडतो. अस्मोनियक लोकांशीं युध्द उकरून काढणारा मेनेलास याचा वध लिसीयसनें ख्रिस्तीशकापूर्वी १६४ वर्षी येथेंच केला. अँटी ओकस ग्रीपसचा खून करणारा जो हेरा क्लिआन याचा जन्म येथेंच झाला व त्यानें येथें इ. स. पूर्वी ९६ व्या वर्षी स्वतंत्र राज्यस्थापना केली.
चालीबॉन या नांवानें टॉलेमीनें या शहराचा उल्लेख केला असून तें चालीबोनिटीस या नांवाच्या जिल्ह्याचें मुख्य ठिकाण होतें असें तो म्हणतो. परंतु अरबांच्या हातांत जाईपर्यंत तें बेरो या नांवानेंच प्रसिध्द होतें. जुलिअनच्या पूर्वेकडील स्वारींत ( इ. स. ३६३ ) व इराणी लोकांच्या स्वारींत ( इ. स. ५४० ) तें याच नांवानें उलेखिलेलें आढळतें. हें दुसर्या खुश्रूनें इ. स. ६११ सालीं घेतलें. इ. स. ६३८ सालीं सारासनलोकांनीं काबीज केल्यानंतर या शहराला पुन्हां हलेप नांव प्राप्त झालें. भूकंपानें या शहराचें बरेंच नुकसान झालें. तरी व्यापार व भरभराट या दृष्टीनें शहराचें महत्त्व केव्हांच कमी झालें नाहीं. हें शहर पूर्व खलीफाच्या आधिकारांत असे. मध्यंतरीं बिझानशीयमचा बादशहा जॉन झिमीसीसनें कांहीं दिवस आपला अंमल बसविला होता. नंतर १०९० पासून १११७ पर्यंत सेलजुकानीं आपला अंमल यावर स्थापला. अलाउद्दीनानें ११८३ सालीं अलेप्पो घेऊन धर्मयुध्दांत महत्त्वाचें ठाणें म्हणून ते फार मजबूत केलें होतें. तार्तरलोकांनीं १२६० सालीं हें शहर घेतलें. नंतर मामेलूकांच्या हातीं गेलें. सरतेशेवटीं १५१७ सालीं तुर्क लोकांनीं हें काबीज केलें. त्यांच्या अमलाखालीं अलेप्पोचा व्यापार सुधारला. ब्रिटिश टर्की कंपनीनें पहिल्या जेम्सच्या कारकीर्दीत एक वखार येथें स्थापिली. केप मार्गानें हिंदुस्थानाशीं दळणवळण ठेवणारा जलमार्ग शोधून काढल्यामुळें येथील व्यापारास फार धक्का बसला. सुवेझचा कालवा तयार झाल्यापासून तर येथील व्यापार फारच बसला. त्या पूर्वीच या शहराचा र्हास होण्यास सुरूवात झाली होती. १८ व्या शतकाच्या शेवटीं व १९ व्या शतकाच्या प्रथमभागात य ठिकाणीं जानिझरी व शेरीफ या पक्षात भांडण चालू असे व कित्येक प्रसंगीं तें विकोपास जाऊन बराच रक्तपात होत असे. धरणीकंपानें व पटकीनेंहि या शहराचें बरेंच नुकसान झालें. केरोचा महमदअली यानें सीरिया प्रात जिंकून घेतला. ख्रिती लोकाची कत्तल १८५० व १८६२ सालीं झाली. एकंदरींत अबदुल मजीदच्या प्रधानानीं सीरियात ओटोमन सत्ता स्थापन केल्या. पासून अलेप्पोचा व्यापार भरभराटीस आला आहे.