विभाग- सातवा : अर्थशास्त्र–आफ्रिका
अल्जीरिया – (आफ्रिका) आफ्रिकेच्या उत्तरेस असलेली एक फ्रेंच वसाहत.
सीमा- उत्तरेस भूमध्यसमुद्र; पश्चिमेस मोरोक्को; दक्षिणेस साहारा; व पूर्वेस टयुनिसिया. पूर्वपश्चिम लांबी ६५० मैल व उत्तरद. रुंदी ३२०-३८० मैल. क्षेत्रफळ १८४४७४ मैल. याचे राजकीयदृष्टया तीन विभाग केलेले आहेत. (१) पश्चिमेस, ओरान (२) पूर्वेस, कान्स्टंटाईन व (३) मध्यें अल्जीरिया.
भू पृ ष्ठ व र्ण न, किनारा - अल्जीरियाचा किनारा रुक्ष व रोगट आहे. पश्चिमेच्या अर्ध्याभागीं किनाऱ्यावर टेकडयाचा एक तटच बनलेला आहे. व जेथें जेथें अंतः प्रवहांनीं यांत खिंडारें पाडलीं आहेत, तेथें तेथें सपाट वाळवंट असतें. डेलेज व फिलिपव्हिल या दोन गावांमधल्या किनाऱ्यावर जणूं काय समुद्रांतूनच पर्वत निघाले आहेत असें वाटतें. फिलिपव्हिलच्या पूर्वेस हे पर्वत किनाऱ्यावर नसून अंतःप्रदेशांत हटलेले दिसतात. फक्त बोना व लाकॉले या दोन बंदरांमध्ये समुद्रकांठचा भाग सखल व वालुकामय आहे. बाकीच्या ठिकाणीं तटासारखे डोंगर आहेत. या किनाऱ्यावर अल्जीरिया नांवाचा उपसागर असून बरीच आखातें आहेत. त्यांपैकीं मुख्य पश्चिमेकडून पूर्वेकडे (१) ओरान, (२) आरझू (३) बोजी, (४) स्टोरा, (५) बोना हीं होत. किनाराइतका जरी मोठा व लांबीचा आहे तरी म्हणण्यासारखीं चांगलीं बंदरें फार थोडीं आहेत. फार प्राचीन काळापासून येथें चांचे लोक राहत असत. उन्हाळयांत पूर्वेकडच्या वाऱ्याबरोबर दाट धुकें येऊन तें किनाऱ्यावर पसरलेलें असतें व हिवाळयांत उत्तरेंकडचे वारे या किनाऱ्यावर जोरानें आदळतात.
किनाऱ्याच्या दक्षिणेकडच्या प्रदेशाचे स्वाभाविकदृष्टया तीन विभाग होतात. किनाऱ्यालगतचा व त्याच्याशी समांतर असलेला डोंगराळ प्रदेश. यांत प्रवाहांनीं फार खोल खोदिलेले भाग दिसतात व कित्येक ठिकाणीं सुपीक सखल भागहि आहेत.या डोंगराळ प्रदेशास अरबी भाषेत रेल असें नांव आहे. याच्या पलीकडे साधारण ३००० फूट उंचीचें पठार आहे. हें सपाट आहे व कित्येक ठिकाणीं त्यांत खाऱ्या पाण्याचीं सरोवरें आहेत. यापलीकडे व याच्या दक्षिणेस मोठा अटलस नांवाचा पर्वत व या पर्वताच्या पलीकडे साहाराच्या वाळवंटाचा प्रदेश आहे.
व र्ण न - अल्जीरियाचें थोडक्यांत वर्णन करावयाचें म्हणजे किनाऱ्यापलीकडे त्याच्याशीं समांतर असलेला डोंगराळ प्रदेश; यांत छोटया अटलस पर्वताच्या रांगा आहेत. या रांगांच्या पलीकडे एक उंच पठार व त्याच्या दक्षिणेस महान अॅ्टलस हा पर्वत म्हणजे साहारीच उत्तरेची अर्थात अल्जीरियांच्या बाजूची सीमा होय.
प र्व त - या देशांत अटलस पर्वतच्या रांगा पसरल्या आहेत, असे वर सांगितलेंच आहे. या रांगांचे दोन विभाग केलेले आहेत. असें वर सांगितलेंच आहे. या रांगांचे दोन विभाग केलेले आहेत. मोठा अॅ्टलस हा साहाराच्या उत्तर सीमेवर आहे; याचें शेलिया हें सर्वात उंच शिखर ७६११ फूट उंच आहे. छोटया अॅ्टलसच्या रांगा पूर्व-पश्चिम दिशेनें किनाऱ्याशीं समांतर पसरल्या आहेत. या रागांची उंची ३७०० ते ५५०० फूट आहे.
न द् या - अल्जीरियांच्या प्रदेशांत पुष्कळ नद्या आहेत पण त्याच्या प्रवाहाची लांबी फार थोडी आहे. त्यांचा उगम किनाऱ्यालगतच्या पर्वतांत होऊन त्यांचा प्रवाह खडकांतून गेला आहे. पावसाळयांत या नद्यांमुळें दळणवळणास बराच अडथळा होतो. शेलीफ ही मुख्य नदी आहे, तिचा उगम मोठया अॅ्टलसमध्यें होऊन ती लहान अटलसच्या रांगेतून वहात जाऊन भूमध्यसमुद्रास मिळते.
स रो व रें - अल्जीरियांत खाऱ्या पाण्यांची सरोवरें व दलदलीच्या जागा फार आहेत. उत्तरेस किनाऱ्यालगत असलेलीं-फेझरा बान जवळ; सेवखा व एलमेल्हा- आरनच्या दक्षिणेस पठारांत- पश्चिमेस पश्चिम शाट, दक्षिणेस, शाट-एल जेरिड; व शाट मेलरिर. ऊन पाण्याचे झरेहि येथें पुष्कळ आहेत. त्यांत औषधी चुन्याचा क्षार असतो. गुयेलमाजवळ सर्वांत आश्चर्यकारक असा झरा आहे. यास दोन बाजूंनी पाणी येतें व ज्या ठिकाणीं ह्या प्रवाहांचा संगम होतो, तेथें राक्षसी शंकू, पाण्यातील चुना साचून तयार झालेले आहेत. या सरोवरांतील पाणी नेहमीं उकळत असतें. या शंकूविषयीं फार मनोरंजक दंथकथा प्रसिध्द आहे. एका अरबानें आपली बहीण फार सुंदर होती म्हणून तिच्याशींच त्यानें लग्न लाविलें. लग्न लाविलें. लग्न चाललें असतां, ईश्वरी कोपामुळें जमिनींतून आधणाचें पाणी येऊन यांच्या अंगावर पडलें व तो अरब व त्याची बहीण यांचे दगडांत रूपांतर झालें.
ह वा मा न - एकंदरींत येथील हवा उष्ण आहे. निरनिराळया भागीं उष्णतामान, देशमानाप्रमाणें बदलत जातें. किनाऱ्यावरच्या भागाची हवी सौम्य असते. जानेवारी महिन्यांत थंडी फार असते. पठारांत व उंच डोंगराळ मुलुखांत हिवाळा फार कडक असतो. डिसेंबरपासून मार्चपर्यंत फार पाऊस पडतो. झुलै, ऑगस्ट व सप्टेंबर महिन्यांत उन्हाळा फार असतो. मे ते सप्टेंबरपर्यंत मधून सिरोक्को नांवाचे उष्ण वारे वाहतात. हवेंत जिकडे तिकडे वाळू पसरलेली असते. दलदलीचा भाग सोडून एकंदरींत येथली हवा निरोगी आहे. असें म्हणण्यास कांहीं हरकत नाहीं. दलदलीचा भाग बुजवून पाणी काढण्याचें काम सुरू आहे.
प्रा णी - या प्रदेशामध्यें असलेलें प्राणी (१) हिंस्त्र-तरस, रानडुक्कर, कोल्हें (सिंह पूर्वी होते पण आतां आढळत नाहींत); (२) पाळीव- मेंढया, उंट, घोडे, खेचरें; (३) इतर- माकडें व तांबूस हरिणें; (४) पक्षी- गिधाड, क्रौंच गरूड, शहामृग, घुबड, इ. पक्षी आहेत; साप, विंचू, कासव हेहि बरेच आढळतात; टोळांचा उपद्रवहि आहे.
व न स्प ती - दक्षिण यूरोपांतील बहुतेक झाडें येथें आहेत, उदा. ओक, पाईन फर, एल्म, अॅश, अॅलिव्ह व बुचांची झाडें. फळफळावळ- अंजीर, द्राक्षें, नारळ इ.
लो क - १९११ च्या खानेसुमारीवरून पाहातां एकंदर लोकसंख्या ५४९२५६९ असून तीपैकीं ५६८५७२ फ्रेंच. १३४४७६ स्पॅनियर्ड व ३६६६१ इटालियन होते. ही संख्या पौरस्त्य, पाश्चिमात्य व आफ्रिकन लोक मिळून झालेली आहे. पाश्चिमात्य लोकांत फ्रेंच, स्पॅनिश, इटालियन ज्यू व थोडे बहुत इंग्रज व जर्मन, यांचा समावेश होतो. उरलेल्या सदराखालीं (१) वर्बर, (२) मूर- हे दुसऱ्या जातींच्या मिश्रणानें झाले आहेत, (३) अरब, (४) गुलाम म्हणून आणिलेले निग्रो, (५) माझेबाईट- ही एक बर्वर लोकांचीच पोटजात आहे व (६) तावरंग-ही देखील बर्बर लोकांची पोटजात आहे, हे येतात. पूर्वी तुर्क लोक पुष्कळ होते. पण त्यांना फ्रेंच सरकारनें परत स्वदेशीं पाठविले.
ल ग्न री त - ह्या प्रांतांतील लोकांत एखाद्या मनुष्याच लग्न करण्याचा विचार झाला म्हणजे तो आपली आवडती कुमारिका राहत असेल तेथें आपलीं गुरें हांकीत नेतो. ती मुलीच्या आईबापांनी पाहिलीं म्हणजे ते व ती कुमारिका त्या पुरुषास लग्न करण्याबद्दल आपली खुषी दर्शवितात. नंतर जातींतील सर्व स्त्रियांस जेवमावळ देण्यांत येते. भोजनोत्तर वधू वराच्या घोडयावर बसून त्यांच्या घरीं जाते. घराच्या दरवाज्यापाशीं ती उरतांच तिला एक काठी देतात; ती ती जमिनींत रोंविते व एक गाणें म्हणते. त्यांतील आशय असा की, ज्याप्रमाणे ही कांठी जमिनीत पक्की बसली आहे,त्याप्रमाणें मी माझ्या नवऱ्याला पक्की बांधली गेलें आहे. बळाचा उपयोग केल्यावांचून ही जशी भुईंतून बाहेर निघणार नाहीं, तशीच मीहि मरण आल्याशिवाय नवऱ्याच्या तांब्यातून सुटणार नाहीं; अथवा त्याच्या माझ्या प्रीतींत अंतर पडणार नाहीं; नंतर नवऱ्यानें सांगितलेली कोणतीहि गोष्ट करण्यास मी तयार आहे, असें दाखविण्याकरितांच कीं काय ती वधू नवऱ्याचीं गुरें पाण्यावर घेऊन जाते, व त्यांस पाणी पाजून आणिल्यावर घरांत प्रवेश करिते. मग उभयता खाण्यापिण्यांत व आनदांत कालक्रमणा करितात. सदरहू लोकांत लग्नाचा ठराव मित्रांचा मध्यस्तीनें होतो. लग्न ठरलें म्हणजे वराकडून वधूकडे नजराणे पाठविण्यांत येतात व तिच्या नातलगांनां मेजवान्या दिल्या जातात. वर सांगितल्याप्रमाणें लग्नकृत्य आटोपल्यावर त्या सर्वास वरपक्षाकडून आणखी एक जेवणावळ देण्याची चाल हे. ती जेवणावळ झाली, म्हणजे समारंभ संपला. (अलोनी- लग्नविधी व सोहोळे)
मु ख्य श ह रें व बं द रें - राजधानी व मुख्य बंदर अल्जीरिया हेंच होय. याशिवाय ओरान व कॉन्स्टंटाईन हीं त्या त्या राजकीय विभागाचीं मुख्य शहरें आहेत. यांशिवाय मुख्य बंदरें- बोना, मॉस्टाग्रॅनम, फिलिपव्हिल, शेरडेली वगैरे.
मोरोक्कोच्या सीमेजवळ नेमुर्ज बंदर आहे. याच्या पूर्वीच्या नांवाचा, जामा- एल गाझौर गांवांच्या लोकांचे वसतिस्थान असा अर्थ होतो. आरजूच्या पूर्वेस टेनेज नावाचें एक गांव आहे. या गांवीं रोमन लोकांची एक वसाहत होती. त्याचप्रमाणें जिजेली येथेंहि रोमन वसाहत होती.
सेटिफ ही पूर्वी एक रोमन वसाहत होती पम सध्यां हें एक पेठेचें ठिकाण आहे. रोमन लोकांच्या वेळचे अवशेष अजून येथें सापडतात. बाटना हे लष्करी ठाणें आहे.
पु रा ण व स्तु सं शो ध न - अल्जीरियांत प्रास्तर संस्कृतिकाळने अवशेष फार सापडतात. कोलिया, हलेमकेच, व मेशेराफा ही गांवें असल्या अवशेषांकरतां प्रसिध्द आहेत. कुबेररुमिया, हें इजिप्तची प्रसिध्द राणी क्लियोपॅट्रा व अॅन्टनी यांची मुलगी क्लिओपॅट्रा सेलीनी, हीचें थडगें आहे. ही जगा कोलिया येथें आहे. अशाच प्रकारचें थडगें कॉन्स्टंटाइन शहराजवळ आहे. असलीं थडगीं दुसऱ्या काहीं ठिकाणीहि आहेत.
शे ती - फार प्राचीन काळापासून या देशाची सुपीक जमीनीविषयीं फार प्रसिध्दी आहे. दोनतृतीयांशाहून अधिक लोकांचा धंदा निव्वळ शेतीचा आहे. फ्रेंच सरकारचा अंमल सुरू झाल्यापासून नलिकाकूप प्रचारांत आले व त्यायोगानें बरीच जमीन नवीन लागवडींत आली आहे.
गहूं, जव व ओट हीं मुखय पिकें आहेत. निरनिराळया प्रकारची फळफळावळ व भाजीपाला येथें तयार होतो. माशांचा व्यापार चालतो, पण हा मोठया प्रमाणावर नाहीं. कापूस व तंबाखूचें उत्पन्न वाढतें असून १९१८ मध्यें २४००० टन तंबाखू पिकली. पठारी प्रदेशांत अल्फाचें पीक पुष्कळ होतें. ग्रेटब्रिटनमध्ये कागद करण्यासाठीं तो पाठविला जातो.
ख नि ज प दा र्थ - अल्जीरियांत व विशेषतः कान्स्टंटाईन भागांत खजिन संपत्ति विपुल आहे. लोखंड, शिसें, तांबे व जस्त हे धातू सापडतात. फास्फेट खाराच्या खाणी सेटीफ, गुलेमा व ऐनबेइडा गांवीं आहेत. दगडी कोळशाच्या खाणीहि आढळल्या आहेत.
व्या पा र - सर्व व्यापार फ्रेंच गलबतांतून चालतो. निर्यात- मेंढया, बैल, घोडे, लोकर, कातडीं, फळफळावळ, गवत, तेलें, धान्यें, मद्य, लांकूड, तंबाखू वगैरे. आयात साखर, काफी, यांचिक सामान कापड, चिनी मातींची भांडीं वगैरे. १९२० सालीं २५३५०००००० फ्रँक किमतीची आयात व १४४२०००००० फ्रँकची निर्यात झाली.
आ ग गा डया व ता रा यं त्रें - अल्जीरियांत सुमारें सव्वादोन हजार मैल आगगाडीच रस्ता केला आहे. साहाराचा भाग सोडून जिकडे तिकडे तारायंत्र सुरुं केले आहे.
रा ज्य का र भा र - हा गव्हर्नर जनरलच्या हातीं असून तो अल्जर्स येथें राहतो. मात्र न्याय, धर्मोपासना, शिक्षण, खजिना व जकाती इतकीं खातीं खुद्द फ्रेंच प्रधानमंडळाच्या सत्तेखालीं आहेत. गव्हर्नरच्या मदतीला सरकारी कौन्सिल आहे. सन १९०० पासून अल्जीरियाला बजेटच्या बाबतींत बरीच स्वायत्तता मिळाली आहे. एक वसाहतवाल्यांचें, एक स्थायिक करभऱ्यांचे (टॅक्स पेसर्स) व तिसरें देश्य मुसुलमानांचें अशा तीन प्रतिनिधी मंडळापुढें गव्हर्नर-जनरल बजेट मांडतो व तें त्यांनीं पास केल्यावर फ्रेंच पार्लमेंटकडे पाठवितो. १९२२ सालचें बजेट ५९५०००००० पोंडंचे होतें. या देशाच्या उत्तर भागांत एक मुलकी व एक लष्करी अशा दोन राज्यकारभारपध्दती आहेत. मुलकी पध्दतीच्या क्षेत्रांत फ्रान्समध्यल्या सारखी व्यवस्था आहे. या क्षेत्राचे ओरान, आल्जर्स व काँस्टन्टाईन असे तीन भाग आहेत. त्यांत प्रीफेक्ट, जनरल कौन्सिलें व सबप्रीफेक्ट यांच्या हातीं फ्रान्समधल्याप्रमामेंच अधिकार आहे. या प्रत्येक भागाला दोन डेप्युटी व एक सीनेटर निवडून फ्रेंच पार्लमेंटांत पाठविण्याचा अधिकार आहे.
गेल्या महायुध्दंत फ्रान्सला मदत केल्यामुळें देश्य लोकांनां फ्रेंच सरकारनें अधिक राजकीय हक्क दिले आहेत. देश्य मुसुलमानांनां कायदेमंडळांत प्रतिनिधी पाठविण्याचे हक्क फ्रेंच नागरिकांच्या बरोबरीनें १९१९ च्या कायद्यानें देण्यांत आले. त्याच कायद्यानें महायुध्दंत सैन्य किंवा आरमारांत नोकरी केलेल्या व जमीनदार, शेतकरी किंवा परवानेदार व्यापारी असलेल्या व फ्रेंच भाषा लिहितां वाचतां येत असलेल्या इसमांनां किंवा फ्रेंच सरकारकडून सन्मानदर्शक चिन्ह मिळालेल्या देश्य इसमांनां फ्रेंच नागरिकत्वाचा हक्क अर्पण करण्यात आला. शिवाय पॅरिसमध्यें सल्लामसलत देणारी अल्जीरियन कमिटी स्थापून त्यांत देश्य लोकांनां सभासद करण्याचें फ्रेंच सरकारानें ठरविलें आहे.
ल ष्क रः - लष्करी व्यवस्थेच्या क्षेत्राचे तीन भाग असून प्रत्येकावर एकेक जनरल हा अधिकारी आहे. ते गव्हर्नर जनरलच्या हुकुमतीखालीं असतात, या भागांतील स्थानिक कारभार, काहीं ठिकाणी लोकनियुक्त म्युनिसिपलिटया, कांहीं ठिकाणीं सरकारनियुक्त म्युनिसिपालिटया, इत्यादि दोन तीन प्रकारच्या स्थानिक संस्थामार्फत चालतो.
अल्जीरियांतील देश्य लोक युध्दषप्रिय व स्वसंस्कृतियुक्त असल्यामुळें तेथें वसाहती करण्याचें काम अवघड गेलें. प्रथम सखल प्रांतांत व नंतर उंच डोंगरसपाटीच्या प्रदेशांत वसाहती झाल्य. इटालियन व स्पॅनियर्ड लोक वसाहत करण्यास बरेच आले. मोफत जमिनी व इतर सवलती देण्याचें ठरविल्यामुळें दक्षिण फ्रान्समधूनहि बरेच लोक वसाहती करण्यास आले.
ज मी न - मुसुलमान लोकांत मोठमोठया कुटुंबाची समाईक जमीन असते. कांही जमीन सरकारानें खालसा करून फ्रेंस लोकांस शेती करण्यास सवलतीनें विकत दिली आहे. फ्रेंच लोकांची शक्य तितकी जास्त वस्ती वाढविण्याची खटपट सुरू आहे.
न्या य - येथें दोन प्रकारच्या न्यायपध्दती अस्तित्त्वांत आहेत; एक स्थानिक व दुसरी फ्रेंच. मुख्य वरिष्ठ कोर्ट अल्जीरियांत आहे. मुसुलमान लोकांचे खटले त्यांच्या कायद्यानुसार काजी चालवितात; अपीलें मात्र फ्रेंच कोर्टाकडे असतात.
शि क्ष ण - शिक्षणाच्या देखील दोन पध्दती सुरू कराव्या लागल्या, एक मुसुलमानांकरितां व दुसरी युरोपियन लोकांकरतां. मुसुलमान लोक पाश्चात्य शिक्षणाचा तिरस्कार करतात.त्यांचें शिक्षण व्यवहारपयोगी नसून धार्मिक शिक्षणावर बरीच भर असते. स्थानिक शिक्षणक्रमांत सुधारणा करण्यासाठीं फ्रेंच सरकारनें बरेच प्रयत्न केले.
१९१७ सालीं या प्रांतांत १ विश्वविद्यालय, १६ दुय्यम शिक्षम संस्था व १३०५ प्राथमिक शाळा होत्या. पुरूष शिक्षकांलरितां दोन व स्त्रीशिक्षकांकरितां तीन अशा पाच शिक्षकशाळा होत्या.
इ ति हा स - स्वाभाविक दृष्टया अल्जीरिया, मोरोक्को व ल्युनिशिया या तीन प्रदेशांचे जर निरीक्षण केलें, तर असें आढळून येईल कीं, हे तीन प्रदेश मिळून खरोखर एकच देश होतो. वर दिलेले विभाग फक्त राजकीय सोयीकरता केले आहेत. या देशांच्या इतिहासाकडे जर लक्ष दिलें, तर आपणांस असें दिसून येईल की भूमध्यसमुद्रावर जी राजकीय तुफानें झालीं त्यांचा आघात या देशांवर झाला, ज्या ज्या राष्ट्रांनीं भूमध्यसमुद्रावर व त्या लगतच्या देशांवर सत्ता गाजविण्याचा प्रयत्न केला, त्या प्रत्येकानें हा देश जिंकण्याची शक्य तितकी शिकस्त केली.
फिनिशियन, रोमन, व्हॅण्डल, अरब, तुर्क व फ्रेंच लोकांनी येथें वसाहती केल्या सरतेशेवटीं फ्रेंच लोकांनीं हा देश जिंकून आपल्या राज्यास जोडिला. सोळाव्या शतकांत स्पेन व तुर्कस्तान हीं दोन राष्ट्रें प्रबळ होतीं व ह्या दोघांमध्ये अल्जीरिया व त्या लगतचे प्रदेश आपल्या ताब्यांत आणण्याच्या झगडयास सुरुवात झाली. त्यावेळच्या झगडयांचे पर्यवसान १५४१ सालीं, स्पेन लोकांच्या मोठया आरमाराचा तुफानांत नाश होऊन झालें आणि पुढें स्पॅनिश लोक जवळ जवळ गप्प बसले आणि देशाचें स्वामित्व तुर्कीकडे गेलें.
तुर्कांनीं या देशाचे तीन भाग केले व त्या प्रत्येकावर एक कामगार नेमिला व या सर्वांवर एक मुख्य अधिकारी नेमित असत. या पुढें दर तीन वर्षांकरितां एक मोठा अधिकारी (पाशा) पाठविण्याची चाल पडली. खरी सत्ता येथील लष्करी लोकांच्याकडे होती. या लोकांस अथवा वर्गास झानेसरीज असें म्हणत असत.
१८ व्या शतकापासून लष्करीवर्ग देशाचा मुख्य शास्ता निवडून नेंमीत असे. पुढें लवकरच या लष्करी लोकांनीं आपलें म्हणजे देशाचें स्वातंत्रय जाहीर केलें.
किनाऱ्यावरच्या राहणाऱ्या लोकांचा धंदा चांचेपणाचा होता व त्यांचा उपद्रव व्यापारास फार होत असे. या लोकांचें पारिपत्य करण्यासाठीं वेगवेगळया राष्ट्रांनीं लढाऊ जहाजे पाठवून या लोकांना वेळींच शिक्षा केल्या.
१८१८ सालीं इंग्रजांनीं लढाऊ गलबतें पाठविलीं. १८१९ सालीं फ्रान्स व इंग्लंड या दोन राष्ट्रांनीं चांचेपणास आळा घालण्याकरितां एक स्वारी केली पण तिचा परिणाम तात्पुरता झाला. १८२० सालीं एका चमत्कारिक कारणानें फ्रेंच लोकांस हा देश जिंकण्यासाठी प्रयत्न करणें भाग पडले. अल्जीरियांतील वाक्री व बुशनाक या दोन यहुदी व्यापाऱ्यांनीं फ्रेंच सरकारास धान्य पुरविण्याचा करार केला, व पुढें कांहीं कारणानें फ्रेंच परराष्ट्रीय वकिलाच्या थोबाडींत हुसेनडेनें मारिली. हुसेनडे हा लष्करी वर्गाचा नायक (मुख्य) होता. हा अपमान म्हणजे आपल्या राष्ट्राचा अपमान झाला असें फ्रेंच लोकांस वाटून त्यांनीं मार्शल वोरमाट यास हुसेनडेचें पारिपत्य करण्यास पाठविलें. त्यानें हुसेनाचा पूर्ण पराभव करून या लष्करी वर्गातील बहुतेकांची तुर्कस्तानांत परत रवानगी केली व किनाऱ्यावरचीं काहीं बंदरें आपल्या ताब्यांत घेतलीं,
फ्रेंच सरकारनें इंग्रज सरकारशीं कांहीं तह केलें असल्यानें त्यांस एकदम अल्जीरिया जिंकण्याचें धाडस करतां येईना. त्यांनी एक गव्हर्नर या देशांतील फ्रेंच वसाहतीचें रक्षण करण्यासाठीं नेमिला. १८३० ते १८३७ पर्यंत फ्रेंचांचे धोरण फक्त आपल्या ठाण्यांचा बचाव करण्याचें होतें.
अब्दुल कादर चेंबंड - याच वेळीं अब्दुल कादर नांवाचा एक प्रख्यात पुरुष या देशांत होऊन गेला. धार्मिक वृत्तीबद्दल त्याची सर्वत्र ख्याति होती. त्यानें आपल्या देशांत एकी करून राज्यव्यवस्था सुरळीत चालू केली.त्याचें व फ्रेंच लोकांचें भांडण होऊन फ्रेंचांनां तह करावा लागला. या तहामुळें फ्रेंचांच्या ताब्यांत फक्त सहापैकी चार गांवें व त्यांच्या सभोंतालचा भाग येवढाच कायतो मुलूख राहिला. पुढें अब्दुल कादरने फ्रेंचांस अजिबात हाकलून देण्यासाठीं प्रयत्न चालविले. हें फ्रेंच सरकारास समजतांच पुन्हां युध्द सुरू झालें. या युध्दंत फ्रेंच सेनापति बुगो यानें आरान प्रांतांत स्वारी करून अब्दुल कादरचीं सर्व प्रकारच्या सामुप्रीची कोठारें दारूने उडवून दिलीं. मोरोक्कोच्या सुलतानानें या वेळीं अब्दुल कादर यास मदत केली, तेव्हां त्याचें पारिपत्य करण्याकरतां १८४४ सालीं बुगोनें टांजिअरवर भडिमार करून सुलतानाचा इसली येथें पराभव केला. फ्रेंच मोरोक्कोंत गुंतलें आहेत, असें पाहून, अब्दुल कादरनें पुन्हा आपल्या सैन्याची जुळवाजुळव करून सौदी ब्राहीम येथें फ्रेंचाचा पराभव केला, पण फ्रेंचाचें वाढतें सामर्थ्य पाहून व दुसरीकडून मदतीची आशा नाहींशी होताच तो १८४७ सालीं डिसेंबर महिन्यांत फ्रेंच सेनापतीच्या स्वाधीन झाला.
यानंतर निरनिराळया टोळयांचा पाडाव करण्याचें व लहानसहान बंडें मोडण्याचें काम बरेच दिवस चालू होते. १८५१ सालीं बुमागला याचें बँड मोडले. इतकें झालें तरी अल्जीरिया पूर्णपणें फ्रेंचंच्या ताब्यांत गेला नव्हता, कॅबिलियाचा डोंगराळ प्रदेश जिंकावयाचा उरला होता. मुसलमान लोकांना चिथावून बंडें उभारण्याचें काम चालू ठेवले होतें, मोठमोठी घराणीं अजून फ्रेंचापासून तुटून राहत होती, त्यांची मनें आकर्षून, त्यांना फ्रेंचाचें खरे आधारस्तंभ करण्याचें काम तसेंच राहिलें होतें.
ए रँडन हा सेनापति, गव्हर्नर असताना १८५२ च्य सुमारास दक्षिणेंत एक दोन ठिकाणीं बंडें झालीं. या बंडाचा मोड वालिद शिदी शेख या घराण्याच्या मदतीनें झाला, रँडननें कोंबिलिय जिंकण्याचा निश्चय केला व तो त्या उद्योगास लागला. या डोंगराळ प्रदेशात तुर्कीची किंवा रोमन लोकांची देखील डाळ शिजली नाहीं, पण या शूर पुरुषानें दोन महिन्यांतच तो प्रदेश सर केला. पुढें वालिद सिदीशेख या घराण्यांतील एका पक्षाचें फ्रेंचाशीं वाकडें आलें, त्या पक्षाचा पुढारी सी- स्लीमन यानें बंड केलें, तें १८६४-१८७१ पर्यंत टिकलें. त्याचा मोड १८७१ सालीं झाला. य बंडाचें वास्तविक कारण पाहूं गेलें तर फ्रान्स देशांत त्या वेळीं जी राजकीय अस्वस्थता व बंडाळी माजली होती व त्यामुळें फ्रेंच सरकारची इभ्रत कमी झाली होती हें होय.
१८७० सालीं फ्रान्स देशांत प्रजासत्ताक, राज्य पुन्हां तिसऱ्यांदा स्थापन झालें, त्यावेळेपासून फ्रेंच सरकारनें आपल्या लोकांस अल्जीरियांत वसाहती करून राहण्यासाठीं सवलती देण्यास सुरुवात केली. या देशाच्या राज्य कारभाराची जबाबदारी फ्रेंच मंत्र्यांवर टाकिली, ही राज्यव्यवस्था तेथील लोकांस पसंत नव्हती, म्हणून १८९२ सालीं अल्जीरियांत गव्हर्नर जनरल नेमण्यांत आला व अल्जीरियाचा जमाखर्च फ्रान्स देशाच्या जमाखर्चापासून वेगळा काढण्यांत आला.
मोठया अटलसच्या पलीकडे साहाराच्या प्रदेशांत अजून जी कांहीं ठाणीं होतीं ती फ्रेंचांच्या ताब्यांत यावयाचीं होतीं. १८८२ त मझाब ठाणें सर केलें, १८८३ त वालिद सिदी शेख घराण्याच्या मोठया पातीनें फ्रेंचाशीं सख्य केलें, पुढें सात वर्षांनीं गुरारा, हुआट, टिटिकेट हीं साहारांतील ठाणीं फ्रेंचानीं घेतली. या वेळेपासून अल्जीरियांत शांतता राखून लोकांत व्यापार व शिक्षण यांचा प्रसार करून त्यांची सुधारणा करण्यास फ्रेंचांनीं आरंभ केला.
(संदर्भ ग्रंथ- फ्रान्सचे वार्षिक रिपोर्ट. अल्जीरियासंबंधी सामान्य माहितीचे वार्षिक रिपोर्ट. फॉरिन ऑफिस रिपोर्टस अॅन्युअल सीरीज, लंडन. कीन- आफ्रिका पु. १. प्लफेअर- बिब्लिओग्रफी ऑफ अल्जीरिया, लंडन १८८८. स्टॅन्फर्ड- अबाउट अल्जीरिया. स्टॉट-दि रियल अल्जीरिया. ए. ब्रि. स्टेटसमन्स ईयर बुक. वार्षिक.)