विभाग- सातवा : अर्थशास्त्र–आफ्रिका
अल्डरशॉट - (इंग्लंड) हँपशायरच्या बेसिंग्स्टोक पार्लमेंटरी विभागांतला एक जिल्हा. हा लंडनच्या नैॠत्येला ३४ मैलांवर आहे. लोकसंख्या (१९२१) २८७५६. इ.स. १८५३ त आल्डरशॉट कँप लॉर्ड हार्डिंगकडून स्थापिला गेला. नॉर्थ कँपला हल्ली मार्लबरोलाइन्स व साउथ कँपला स्टॅनहोपलाइन्स असें म्हणतात. रॉयल एंजिनीअर्स व आर्मीसर्व्हिस फौजेकरितां येथें बराकी आहेत. पांच पायदळाच्या बराकी व रॉयल आर्मी मेडिकल फौजेकरितांहि कांही बराकी आहेत. येथें आजारी माणसाकरितां दवाखाने स्थापन केलेले आहेत.
येथींल गटारें अगदीं अर्वाचीन पध्दतीचीं आहेत. येथें पाण्याचा कांही पुरवठ आल्डरशॉट वॉटर कंपनी करते.
फौजेंतील शिपायांसाठी केलेल्या इमारतीशिवाय किल्ल्यांतील शिपायांना उपयुक्त अशा इमारतीदेखील येथें आहेत. येथें लष्करी शिक्षणाच्या वेगवेगळया शाखांचे शिक्षण देण्याकरितां पुष्कळ शाळा आहेत. अल्डरशॉट आर्मी कोर चें हें मुख्य स्थान आहे. (ए.ब्रि.)