विभाग- सातवा : अर्थशास्त्र–आफ्रिका
अल्निक - (इंग्लंड) नॉर्दबरलँडच्या बर्विक्, (अपॉन्- टीड) पार्लमेंटरी विभागांतलें एक बाजारी शहर व परगण्याचें ठिकाण. हें नॉर्थ- ईस्टर्न रेल्वेच्या एका शाखेवर लंडनपासून ३०९ मैलांवर आहे. जिल्ह्याची लोकसंख्या (१९०१) ६७१६ आहे. येथें एक किल्ला आहे व तो पर्सीच्या ताब्यांत १३०९ पासून आहे. एक दरवाजा, एक १२ व्या शतकांतली सुंदर नॉर्मन् कमान (आर्च), किल्ल्यामधील एक प्राचीन कूप, हे महत्त्वाचे प्राचीन भाग आहेत. हल्लीं किल्ल्यांत पुष्कळच बदल केलेला आहे. इटालीचे व अन्य देशचे कारागीर यांचीं कामें व ब्रिटिश, रोमन आणि इजिप्शिअन पुराणवस्तू यांचे सुंदर नमुने किल्ल्यांत आहेत. सुंदर उद्यानांत (पार्क) विल्यम दि लायन ऑफ स्काटलंड याचें एक स्मारक आहे. याच उद्यानांत दोन स्मारकमनोरे व एक ब्रिटिश दगडी खोली आहे. कोटाचे अवशेष अजून दृष्टीत्पत्तीस येतात. सेंट मायकेलचें देवालय जुनें आहे. अर्वाचीन सेंटपॉलचें देवालय प्रेक्षणीय आहे. अॅबे शिवाय उद्यानांत आणखी अवशेष सापडतात. येथें सेंट लीओनार्डचा दवाखाना होता. डन्स्टनबरो किल्ल्याचे अवशेष जवळच दिसून येतात.
दारू गाळणें, तंबाखू व तपकीर तयार करणें, मासे धरण्याच्या दोऱ्या तयार करणें, धान्य व दळणें, हे मुख्य धंदे आहेत. वास्तविक अल्निक हें एका डिस्ट्रिक्ट बोर्डाच्या क्षेत्रांत येते. परंतु चिरवहिवाटीनें कें म्युनिसिपालिटी असणारें एक शहर झालेलें आहे. ह्या शहराच्या फ्रीमेनचें एक संयुक्त मंडळ (बॉडी कार्पोरेट) असतें परंतु शहराच्या कारभारांत त्या मंडळाला कांही सत्ता नाही. ह्या मंडळाला १८८२ च्या कायद्यान्वयें ५०० पौंडाहून जास्त रक्कम मात्र द्यावी लागते. तिचा उपयोग कार्पोरेशनच्या शाळा (कार्पोरेशन स्कूलस्) चालविण्याकडे करितात.
मूळ अल्निक हें गिल्बर्ट टायसनच्या मालकीचें होतें. नंतर त्याचा मुलगा मेल्यमुळें राजानें त्याच्या मुलीसह तें आयव्हो डि व्हेसीला दिलें. आयव्होचा एक वंशज विल्यम् डि व्हेसी हा १२९७ मृत्यू पावला. त्याला संतान नव्हतें. म्हणून ही जहागीर डरह्याम्च्या बिशपला मिळाली. त्यान १३०९ त ती सर हेन्री पर्सीला विकली.त्याच्या वंशांत ती अद्यापि चालत आहे. किल्ला सुमारे ११४० त युस्टेस फिट्झ जॉन ह्यानें बांधला असें म्हणतात. वेगवेगळया प्रसंगी मिळालेल्या सनदांनी बाजार व जत्रांची परवानगी ह्या शहराला मिळालेली आहे. कातडें कमावणें आणि कापड विणणें हे पूर्वी मुख्य धंदे होते. अल्निकनें पार्लमेंटांत कधीहि प्रतिनिधी पाठविले नाहींत. (ए.ब्रि.)