विभाग- सातवा : अर्थशास्त्र–आफ्रिका
अल्पाका - दक्षिण अमेरिकेंतील खूर असणारा एक उंटासारखा प्राणी. अल्पाकांचे मोठाले कळप तेथें पाळण्यांत येतात व समुद्रसपाटीपासून १४००० ते १६००० उंचीवर असणाऱ्या अँडीझ पर्वतावरच्या कुरणातून सर्व वर्षभर चरतांना तें दिसतात. ओझ्याचे प्राणी म्हणून ते गणले जात नसून, त्यांच्या लोंकरीमुळेंच त्यांनां महत्त्व देण्यांत येतें. अमेरिकन इंडियन लोक अल्पाका लोंकरीचीं ब्लँकिटें व झगे करितात. लोकरीचा रंग साधारणपणें काळसर पिंगट किंवा काळा असून ती बरीच लांब म्हणजे जमीनीला लागण्याइतपत सुध्दां असते. उंचीमध्यें अल्पाका हे लामा प्राण्यापेक्षां बरेच कमी असतात, तथापि त्याच्या सारखीच यांना थुंकण्याची वाईट सवय असते.
कापडाच्या धंद्यांत अल्पाक हें नांव दोन निरनिराळया वस्तूंनां दिलें जातें. मुख्यतः पेरू देशातील अल्पाका प्राण्यांच्या केसांनां किंवा लोकरीला हा शब्द लावितात. तथापि सरसकट एक प्रकारच्या विणीला हें नाव लावितात; मग तें विणलेलें कापड अल्पका लोंकरीचें असो वा नसो. कधीं कधीं बाजारांतलें अल्पाक कापड मोहेर, आयस्लंड किंवा बारीक इंग्लिश लोंकरीचेंहि असतें. सामान्य गिर्हाइकाला अल्पाका प्राण्याच्या लोंकरीपासून केलेलें आल्पाक कापड व मोहेर वगैरे अन्य लोंकरीपासून केलेलें नकली अल्पाक यांच्यातील फरक कळत नाहीं.
लामा, अल्पाका, ग्वानाको आणि विकूना या चार दक्षिण अमरिकेंतील अंगावर लोंकर असणाऱ्या प्राण्यांपैकी अल्पाका आणि लामा हे दोन कायते माणसाळलेले प्राणी आहेत. अल्पाका व विकूना हे लोंकरीकरितां फार महत्त्वाचे असे प्राणी गणले जाताता. अल्पाका प्राण्याला लोंकर पुष्कळ व उत्तम अशी येते तर विकूनाची लोंकर बारीक व मऊ असते. १९ व्या शतकाच्या आरंभी अल्पाका लोंकरीचा धागा सुमारें १२ इच असे. ही तीन वर्षांची वाढ असे. पण आज एकदोन वर्षाची वाढ देखील याच्या निम्याहून अधिक असते. हुशार अमेरिकन बायका अल्पाका लोंकरींचे वर्गीकरण रंग आणि गुण यांवरून करितात. युनायटेड किंगडमध्यें येणारी अल्पाका बहुधां काळी आणि पिंगट रंगाची असते. पांढरा, करडा अशा प्रकारचे रंगहि बनविण्यांत येतात. अल्पाका लोंकर केंसासारखी तुळतुळीत असते. पण तिच्या मऊपणामुळें व सुरेखपणामुळें तिचें लांब सूत काढण्याला फार सोपें जातें.
अल्पाका लोकरींचे कापड तयार करण्यास सुरुवात कशी झाली, याचा इतिहास फार मनोरंजक आहे. यूरोपमध्यें व्यापारी माल म्हणून अल्पाकाचा प्रवेश होण्यापूर्वी पुष्कळ शतकें पेरूंतील इंडियन लोक याचें निरनिराळया प्रकारचें कापड तयार करीत. स्पेनमध्यें प्रथम हिची आयात झाली असावी; नंतर तेथून फ्रान्स आणि जर्मनी या देशांतून तिचा धागा नेण्यांत आला. १८०८ च्या सुमारास प्रथमच इंग्लंडमध्यें अल्पाकचें सूत काढण्यांत आलें; पण पुढें पुष्कळ वर्षेपावेतों हिची विशेष प्रगती झाली नाही; याचें कारण काम करण्याला अवघड असा हा माल आहे अशी लोकांची समजूत झाली. १८३० मध्यें हॅलिफॅक्सजवळ राहणाऱ्या बेंजामिन आउट्रम नांवाच्या माणसानें पुन्हां हिचें सूत काढण्याची खटपट केली पण ती पुन्हं अयशस्वी ठरली. १८३६ च्या सुमारास ब्रँडफर्ड बाजारांत सुताची उभी वीण जेव्हां प्रचारांत आली तेव्हांपासूनच अल्पाकाचें कापड होण्यास खरी सुरुवात झाली. सुताची उभी वीण व मोहेर किंवा अल्पाक यांची आडवी वीण याच्या योगानें कापड बनविण्याची पद्धत कोठून प्रचारांत आली हें सांगतां यावयाचें नाहीं. पण हीच पद्धत टायटस सॉल्ट नांवाच्या तरुण ब्रँडफर्ड व्यापाऱ्याला अल्पाकाचा उत्तम रीतीनें उपयोग करण्याला फारच उपयोगी पडली. अजूनहि ब्रँडफर्डहून अल्पाक सूत व कापड मोठया प्रमाणात निर्गत होतें.
सर टायटस साल्ट व इतर ब्रँडफर्डचे व्यापारी यांनी अल्पाकचें निरनिराळया प्रकारचें कापड तयार करण्यात जें यश संपादन केलें, त्यामुळें अल्पाक लोंकरीची मागणी बरीच वाढली, पण इंडियन लोकांना ती पुरविता येणें अगदीं अशक्य झालें. कारण अल्पाक प्राण्यांची तेवढी निपज वाढविणें कठिण होतें. इंग्लंड व इतर यूरोपियन देशांत अल्पाका बकरी तयार करण्याच्या बऱ्याच खटपटी झाल्या पण त्यांत यश आलें नाहीं. अल्पाका आणि लामा प्राण्यांच्या संयोगापासून तयार करण्यांत आलेला हुअॅरिझो नांवाचा माल लिव्हरपूरच्या बाजारांत ठेवलेला असतो. अल्पाका आणि विकूना यांचे संयोग यशस्वी झाले नाहीत.