विभाग- सातवा : अर्थशास्त्र–आफ्रिका
अल्बेरोनि गिथुलिओ, (१६६४— १७५२) एक स्पॅनिशइटालियन मुत्सद्दी व कार्डिनल. याचा बाप माळी होता. हा पाहिल्यानें पायझेंसा येथील ख्रिस्ती देवालयांत छडीदाराचें (व्हर्जर) काम करीत असे. पुढें यानें बार्नि या बिशपची मर्जी संपादून धर्मोपासकाची जागा पटकाविली. यानंतर तो आपल्या आश्रयदात्याच्या मुलाबरोबर रोम शहराला गेला. स्पेनच्या गादीच्या वारसाहक्काबद्दल झालेल्या युध्दांत यानें इटालींतील फ्रेंच सेनापतीची कामगिरी बजाविली व या योगें याचें राजकारणपटुत्व लोकांच्या निदर्शनास आलें. १७७१ त हा फ्रेंच सेनापति व्हेंडोम याचा चिटणीस होऊन त्याच्याबरोबर स्पेनमध्यें गेला. यानंतर दोनवर्षांनीं याला काउंट (सरदार) करून पाचव्या फिलिपच्या दरबारांत पार्माचा प्रतिनिधि म्हणून नेमण्यांत आलें. पुढें स्पेनच्या बादशहाचें पार्माच्या एलिझाबेथ फर्नेस इच्याशीं लग्न झाल्यावर हा तिच्या वतीनें बर्याच योग्यतेस चढला. हा अनुक्रमें राजाच्या सल्लागार मंडळाचा सभासद, मालागाच्या धर्मगुरूच्या जागांवरून चढत जाऊन १७१५ त मुख्य प्रधान व कार्डिनल झाला. स्पेन देशांतील अंतस्थजकातींची ठाणीं उठवून त्याचें सांपत्तिक पुनरुज्जीवन करणें, इंडीज बेटांतील व्यापारावरील निर्बंध काढून टाकून तेथें खुला व्यापार सुरू करणें, जमाबंदीची पुनर्घटना करणें, या सुधारणा करून जो द्रव्यसंचय होईल त्याचा विनियोग पांचव्या फिलिपच्या इटाली व फ्रान्स भागांतील आकांक्षा पूर्ण करण्यांत करावा असे यचे बेत होते. परंतु याचा वरील बेत राजाच्या व राणीच्या उतावळेपणानें सिद्धीस न जातां उलटें स्पेन देशावर संकट ओढवलें व याकरितां १७१९ मध्ये याला हद्दपार व्हावें लागलें. यानंतर हा इटालींत जाऊन राहिला. तेथें याचें १३ व्या इनोसेंट पोपच्या निवडणुकींत अंग होतें. १७३० त ७व्या क्लेमंट पोपनें याला आपल्या राव्हेन्नाचा प्रतिनिधि नेमलें. १७४० मध्यें हा पायसेंझा येथें जाऊन राहिला. तेथें याला ७ व्या क्लेमंटनें महारोग्यांच्या दवाखान्याचा व्यवस्थापक नेमले होतें. पण पुढें याने हा दवाखाना मोडून तेथे ७० गरीब विद्यार्थ्यांची सोय होईल असें उपाध्येपणा शिकविण्यकरिता एक विद्यापीठ स्थापन केलें. हा १६ जून १७५२ रोजी मरण पावला. यानें आपल्या मृत्युपत्रांत आपण काढलेल्या संस्थेस सहा लक्ष डुकॅटची देणगी दिल्याचें लिहून ठेवलें होतें.
[ए.ब्रि. अल्बेरोनीचें १७१९ पर्यंतचें चरित्र त्याच सालीं हेग येथें जीनरूसेट डिमीसींने प्रसिद्ध केलें. पिआसेंझा येथील अल्बेरोनीनें स्थापिलेल्या कॉलेजांत शिकलेल्या स्टी—फॅनो बर्सानी नांवाच्या एका धर्मोपदेशकानें १८६१ मध्यें याचें आयुष्य स्वतः रेखाटलें. अल्बेरोनीचीं पत्रेंहि १८९२ सालीं प्रसिद्ध झालीं आहेत ]