विभाग- सातवा : अर्थशास्त्र–आफ्रिका
अल्ह - महोबा (बुंदेलखंड) येथील राजपुत्र. अल्ह व उदल हे बुंदेलखंडातील प्रसिद्ध वीर असून त्यांच्या उत्पत्तीचा थोडक्यांत वृत्तांत पुढील प्रमाणें आहेः—
चंदेलराजा परमार यानें सर्व हिंदुस्थान जिंकिलें, त्यानें जिंकिलेल्या शहरांपैकी महोबा हें पहिलें होय. तेथील राजा बास देव याला तीन मुली होत्या; पैकी सर्वात मोठी मलंदे हिजशीं परमारनें स्वतः विवाह केला. दुसर्या मुलींचीं नांवे दिवला व तिलका अशीं होतीं. एके दिवशीं राजा कजरीच्या अरण्यांत शिकारीकरतां गेला असतां, आई बापांनीं टाकलेलीं दोन मुलें त्याला आढळलीं. त्या मुलांना आपल्या हत्तीवर घेऊन तो महोबा येथें आपल्या राजधानीस परत आला. आपल्या बायकोच्या विनंतीवरून त्यानें त्या दोघांना दत्तक घेतलें व त्यापैकीं दसराजाचा (यश—राजाचा) दिवलाबरोबर व वत्सराजाचा तिलकाबरोबर विवाह लावून दिला. त्या दोघांनांही मुलें झाली. दसरा जाला दिवलापासून अल्ह व उदल असे दोन मुलगे झाले.
अल्ह हा मुसुलमानांचा कर्दनकाळ होता. त्याच्यावर कालीमातेंचा वरदहस्त असे असें सांगतात. अद्यापहि लष्करी बराकींतून हिंदी शिपायी ढोलक्याच्या तालावर अल्हगीत म्हणतांनां दिसतात.
नैनागडचा राजा इंदरमन याची बहीण सोनवती हिला अल्हानें मागणी घातली होती. इंदरमनच्या मनांत आपल्या बहिणीनें मुळींच लग्न करू नये असें असल्यामुळें तिला मागणी घालणार्या कित्येक लोकांनां त्यानें कैदेंत ठेविलें होतें. परंतु उदलनें आपल्या भावाच्या वतीनें इंदरमनाशीं पुष्कळ लढाया करून त्याला ठार मारिलें व अखेर अल्ह आणि सोनवती यांचा विवाह झाला.
अल्हखंड नांवाच्या अल्हाच्या विवाहगीतांत उदलनें इंदरमन बरोबर केलेल्या लढाईंचे सविस्तर वर्णन दिलेलें आहे. अल्हखंडाच्या अनेक आवृत्ती मुंबईस प्रसिद्ध झाल्या आहेत. हें काव्य भोजपुरी भाषेंत लिहिलेंले असून त्याचें इंग्रजींत भाषांतर झालेलें आहे. (इ. अँ. पु. १४ बीलचा कोश.)
चंदाचा पृथ्वीराज रासा यांत अल्ह याच्या विषयी कांहीं निराळी माहिती आहे. ती अल्हखंडाशीं कितपत विरोधक आहे, व त्यास पूरक कितपत आहे हें तपासलें गेलें नाही. पृथ्वीराजरासेंतील माहिती मराठींतील लोकहितवादींच्या पृथ्वीराज चव्हण या पुस्तकांत समाविष्ट केली आहे ती अशी:— महोबाचा राजा परमाल याच्या पदरीं अल्ह व उदल हे दोन मोठे पराक्रमी सरदार होते. त्यांच्याबद्दल राजाचा ग्रह कांहीं दरबारी लोकांच्या चहाडयामुळें वाईट बनला होता. पृथ्वीराज चव्हाणाचे कांहीं सैनिक महोबोच्या राजोद्यानांत शिरून पुंडाई करूं लागले, तेव्हां राजाज्ञेनें उदल यानें त्यांचा ताबडतोब नाश केला. तथापि परमाल याला संतोष व वाटून त्यानें अल्ह व उदल यांना हद्दपार केलेंच, ते कनौजचा राजा जयचंद याच्या दरबारीं मोठया मान्यतेनें राहिले असतां, इकडे पृथ्वीराजानें आपल्या लोकांची महोबाच्या राजानें दुर्दशा केली म्हणून, चंदेल प्रांतावर स्वारी केली. त्या वेळीं युवराज ब्रह्माजित् याने महोबादरबारच्या सरदारास मोठें स्फुरण आणलें व पृथ्वीराजास तोंड दिलें; पण पराभव टळला नाहीं, तेव्हा राणीच्या सल्ल्यावरून परमाल राजानें अल्ह व उदल यांनां मोठया सत्कारानें बोलावणें धाडिलें. तेंहि मागचा अपमान विसरून महोबाला आले; व परमाल घाबरून कलंजर किल्ल्यांत लपून बसला असतांहि या दोघा बंधूंनी मोठया निकराचें युद्ध केलें. उदल अलोट शौर्य गाजवून धारातीर्थी पडला. पण अल्ह हा गोरखनाथाच्या वरामुळें अमर असल्यानें त्याच्यापुढें पृथ्वीराजाचा टिकाव लागेना. त्यानें मोहनास्त्र सोडून राजाचें सर्व सैन्य निद्रावश केलें.तेव्हां चंदगाटानें कालिकेला प्रसन्न करून घेतलें व शिवगण आतताई याला अल्ह याच्याबरोबर झुंझावयास लाविलें. पुढें गोरखनाथ स्वतः प्रकट होऊन, त्यांनीं अल्हाला शस्त्र खालीं ठेवून आपल्या बरोबर चलण्यास सांगितलें. अल्हनें गुर्वांज्ञा मान्य केली, तेव्हां युद्ध थांबलें; अशी कथा ‘पृथ्वीराज रासा’ या ग्रंथांत आढळते. उत्तर हिंदुस्थानांत या अल्ह— उदल लढाईचें पुस्तक सर्वत्र वाचिलें जातें व प्रत्येक शहरीं व स्टेशनावर विकत मिळतें लोकाहतवादी— पृथ्वीराज चव्हाण.]