विभाग- सातवा : अर्थशास्त्र–आफ्रिका
अल्हाजन - अरबी गणितज्ञ आणि शास्त्रज्ञ. हा अकराव्या शतकांत होऊन गेला. याचा जन्म वसरा शहरांत व मृत्यु कायरो शहरी १०३८ सालीं झाला. टालेमीच्या अल्माजेल्ट नांवाच्या ग्रंथाचें ज्यानें भाषांतर केलें त्याहून हा अल्हाजन भिन्न आहे. यानें एकदां अशी बढाई मारली कीं, “नाइल नदीच्या पुरापासून बचाव करून पाण्याचा पुरवठा नियमित रीतीनें करून देणारें यंत्र तयार करितां येण्यासारखें आहे.” ही वार्ता ऐकून त्या वेळेचा खलीफ हकीम यानें त्याला बोलावून नेलें. परंतु तेथे गेल्यावर हे कार्य होण्यासारखें नाहीं असें पाहून व खलिफाचा रोष होऊं नये म्हणून त्यानें वेडयाचें सोंग घेतलें व ह्या सोंगाची संपादणी त्यानें हकीमाच्या मृत्यू (१०२१) पर्यंत चालविला. टालेमीच्या कालानंतर प्रथमच यानें दृकशास्त्रा (ऑप्टिक्स) मध्यें शोध लाविले. सूर्यचंद्रादिक खस्थ पदार्थ क्षितिजाजवळ असतांना मोठे कां दिसतात याचें कारण त्यानें प्रथमतः सांगितले. नेत्रांतून कांहीं किरण निघून पदार्थावर पडतात व नंतर आपणांस दिसतें अशी जी प्राचीन शास्त्रज्ञांची समजूत होती ती चूक आहे व त्याऐवजीं पदार्थांतून किरण निघून ते नेत्रांत जातात असें त्यानें दाखवून दिलें. प्रकाशाच्या वक्रीभवनासंबंधानें त्यानें लेख लिहिले आहेत. हवेंतून प्रकाशकिरण जात असतांना त्यांचें वक्रीभवन होतें व त्या योगानें संधिप्रकाश उत्पन्न होतो असें त्यानें सिद्ध करून दाखविले. अंतर्वक्र आरशासंबंधाने त्यानें विवेचन केलें आहे. टृकशास्त्रावरील त्याच्या ग्रंथाचें लॅटिनमध्यें भाषांतर विटेलो यानें सन १२७० सालीं केलें. मध्ययुगांत या ग्रंथाची पुष्कळच प्रशंसा केली जात असे. यानें भूमितीवर बरेंचसें लिहिलें आहे असें दिसतें. हे लिखाण १८३४ सालीं सेडिलॉटेनें पॅरिसच्या बिब्लिओथेक नॅशनेलमध्यें छापलें. दुसर्या कित्येक विषयावरील याचे ग्रंथ आक्डफोर्ड व लंडन येथील ग्रंथालयांत ठेविलेले आहेत. (ए. ब्रि.)