विभाग- सातवा : अर्थशास्त्र–आफ्रिका
अवचितगड — हा तटबंदी किल्ला रोहे (जिल्हा कुलाबा) गांवापासून तीन मैलांवर कुंडलिका नदीच्या उत्तरतीराच्या बाजूला आहे. तो ९७७ फूट उंचीवर असून त्याची तटबंदी ६०० यार्ड लांब व ८०० ते १००० फूट उंचीवर आहे. किल्ल्यावर जाण्यास एक रोह्याच्या बाजूनें व एक मेढें या गांवच्या बाजूनें अशा दोन पायवाटा आहेत. वाटोळे बुरूज चांगले दगड बसवून बांधले असून दक्षिणेकडील एका बुरुजाच्या भिंतीत शके १७१८ (इ.स. १७९६) मधील एक शिलालेख आहे. त्यांतील मराठी मजकुरास आरंभ “श्रीगणेशायनमः श्रीजयदेव शके १७१८ नलनाम संवत्सरे चैत्र शुद्ध प्रतिपदा” अशा प्रकारें आहे. उत्तरेकडील बुरुजापासून सुमारें ५० यार्डांवर सहा फूट लांबीची तोफ आहे व तिच्या पलीकडे थोडया अंतरावर आणखी दोन तोफा आहेत. किल्ल्यावर काहीं पडक्या इमारती आहेत, त्यांत सदर ही इमारत मोठी व चांगली असावी असे वाटतें. पूर्वेकडील तटाच्या दरवाज्यानजीक असलेल्या सदर कचेरीच्या इमारतीचें फक्त जोते शिल्लक आहे. या इमारतीच्या दक्षिणेस अंतर्दुर्ग उर्फ बालेकिल्ला आहे, त्याची दक्षिणोत्तर लांबी ३०० यार्ड व पूर्वपश्चिम रुंदी १०० यार्ड आहे. बालेकिल्ल्याचा तट चांगला जड असून प्रत्येक कोंपर्यावर बहुकोनी बुरूज आहे. शिवाय मध्यंतरीं वाटोळे लहान लहान बुरूज आहेत. उत्तरेकडील तटाला दोन दरवाजे व दक्षिणेकडील तटाला एक दरवाजा आहे. बालेकिल्ल्यावर एक मोठें पाण्याचें टाकें असून त्याला एका बाजूनें आंत उतरण्यास पायर्या आहेत. त्याच्या शेजारीं दक्षिणेच्या बाजूस सता लहान टांकी आहेत. येथें बापूजी हवलदाराची समाधि आहे. तिला सरकारकडून ३२ रुपयांची नेमणूक आहे. समाधीसमोर एक दीपमाळा आहे, तिच्या पायथ्याशीं बापूराव पाशिलकराचा पुतळा खोदलेला आहे. बालेकिल्ल्याच्या नैॠत्य कोंपर्याला एक महादेवाचें देऊळ असून त्यांत गणपति, पार्वती व विष्ण यांच्याहि सुंदर खोदलेल्या मूर्ती आहेत.
अवचितगड, हा सुरगड, पालीचा किल्ला व भोराईचा किल्ला यांच्याबरोबरच कर्नल प्रॉथरच्या सैन्यानें १८१८ फेब्रुवारींत जिंकून घेतला. हा किल्ला मूळ शिवाजीनें शेख महमंद नावाच्या कारागिराकडून बांधविला होता असें म्हणतात. [संदर्भ ग्रंथ— कुलाबा गॅझियटर]