विभाग- सातवा : अर्थशास्त्र–आफ्रिका
अवतंसक – एक बौद्ध सूत्रग्रंथ. याचीं दोन चिनी भाषांतरें उपलब्ध आहेत: एक पांचव्या शतकांत बुद्धभद्रानें केलेलें, व दुसरें शिक्षानंदाचें. या दोन्ही भाषांतरांत दिलेलीं ठिकाणें एकमेकांशीं जुळतात; पण शिक्षानंदाच्या भाषांतरांत ज्याठिकाणीं ‘चौ—ले’ हें नाव आलें आहे, त्याऐवजी बुद्धबद्राच्या ग्रंथांत ‘पिएन—यि’ असा शब्द आहे. चौले हें देशनाम म्हणून, व पिएन—यि हे सरहद्दीवरील जंगली लोकांकरितां म्हणून योजिलें आहें. महासन्निपातसूत्र (याचें तात्सि—किंग नावाचें चिनी भाषांतर नरेंद्रयशसनें इसवी सन ५८९—६१८ यांमधील काळांत केलें आहे.) यामधील सूर्यगर्भसूत्रांत बुद्धच्या प्रवासस्थळांची जी यादी आहे, ती अवंतकसूत्रांतील यादीशीं बहुतेक जुळते; पण ज्या ठिकाणीं अवतंसक्रांत चौले हें नाव येतें त्या ठिकाणीं सूर्यगर्भांत ‘यू—त—इएं’ (खोतान) असें नांव सापडतें. तेव्हा चौले, पिएन—यि व यू—तइंए हीं तीन्हीं नावें एकाच देशांची कीं काय असा प्रश्न उद्भवतो. बारकाईने पाहता या तीहींमधील क्षेत्रस्थान ‘निइओयु—त ओयु’ (गोशीर्ष) हेंच आहे, म्हणून एकाच प्रांताला हीं तिन्हीं नावें दिलीं असावीत असें अनुमन करण्यास हरकत नाहीं.
अवतंसकसूत्र प्रथम नागार्जुनानें नागदेशांत संशोधिलें असें म्हणतात. याचा एक चिनी प्रकाशक प्रस्तावनेंत त्वांग—लुग—शु (नागक्रोशुन) येथील बुद्धभिक्षूंस तें नागराजमंदिरांत सापडलें असून, त्यांत ४८ प्रकरणें होतीं, असें लिहितो. शिक्षानंद, या सूत्रांत फक्त ३९ प्रकरणें तो देतो (जे आर.ए.एस. १६ पृ ३२६; वासिलज्यू— बुद्धि— स्मस, जर्मन भाषांतर पा. १२८ पहा.) तारानथाच्या मतें मूळ १००० प्रकरणें होतीं (तारानाथ पा. ९८). परंतु मातृष्ट (अश्वघोष) व असंग याच्या दरम्यानच्या धामधुमीच्या काळांत हे सूत्र ३८ प्रकरणांवर आलें. बुद्धभद्राच्या भाषांतरांत ३४ प्रकरणें असून ६० पोट प्रकरणें आहेत. वर सागितल्याप्रमाणें शिक्षानंदी भाषांतरांत ३९ प्रकरणें आहेत; व पोट प्रकरणें ८० आहेत.
आतां याचा काळ कोणता तें पाहूं. न्नागार्जुनानें हें संशोधिलें असें धरल्यास प्रथम नागार्जुनाचा काल ठरविला पाहिजे. नागार्जुन शातवाहनाचा समकालीन होता. कारण त्यानें शातवाहनास पत्र पाठविल्याचें प्रसिद्धच आहे. अशा प्रकारें सर्व बाजूंनी विचार करितां असें दिसून येतें कीं, हें सूत्र ख्रिस्तशकारंभीं लिहिलें असावें. ललितविस्तर या ग्रंथात यासंबंधी आलेल्या उल्लेखाचा व यांतील खरोष्ट्री लिपिचा विचार करितां वरचाच काळ नक्की करावा लागेल. (लेव्ही— इं. अँ. १९०६)